The idea of peace is to be taken from the United Nations | राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध

राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध

- डॉ. रविनंद होवाळ
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या छोट्या आवृत्तीची म्हणजे जगातील मोठ्या राष्ट्रांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाची स्थापना १0 जानेवारी, १९२0 रोजी युरोपात झाली होती. संपूर्ण जगावर आपली एक महत्त्वपूर्ण छाप सोडणाऱ्या या संघटनेच्या स्थापनेला या वर्षी १0 जानेवारीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. जरी या संघटनेत जगातील केवळ सव्वीस राष्ट्रेच सामील झालेली होती व सुमारे सव्वीस वर्षांनी या संघटनेचा अस्त झाला होता, तरी संपूर्ण जगावर झालेला तिचा परिणाम व तिच्या स्थापनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक घडामोडी भावी काळाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया आहेत. त्यामुळे या राष्ट्रसंघाच्या शंभरीच्या अनुषंगाने तत्कालीन परिस्थिती व सध्याच्या प्राप्त परिस्थितीचा तुलनात्मक आढावा घेणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.
१९२0 च्या पूर्वीची काही वर्षे जगभर वसाहतवाद व साम्राज्यवादाची तीव्र स्पर्धा युरोपातील प्रबळ राष्ट्रांनी सुरू केली होती. युरोपासह आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रांना गुलाम बनवून त्यांचे आर्थिक शोषण करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. यातून त्यांची भूक वाढून एकमेकांच्या ताटातल्या गोष्टीही स्वत:कडे खेचून घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला व त्यातूनच १९१४ ते १९१८ या काळात जगातील पहिले महायुद्ध झाले. या युद्धात जगातील सव्वीस देश सामील झाले. सुमारे सव्वाचार कोटी लोक या युद्धात गुंतवले गेले. त्यातील सुमारे ऐंशी लाख वीस हजार सैनिक आणि सहासष्ट लाख बेचाळीस हजार नागरिक असे मिळून सुमारे दीड कोटी लोक मृत्युमुखी पडले. या युद्धासाठी सुमारे अठ्ठावीस हजार कोटी अमेरिकी डॉलर्स एवढा खर्च झाला.


सतराव्या व अठराव्या शतकातील युरोपातील औद्योगिक क्रांतीमुळे तयार झालेला बेसुमार माल कुठे तरी चांगल्या भावाने खपवण्याची निकड, त्यातून होत गेलेले सशस्त्र संघर्ष, एकमेकांविरोधात करण्यात आलेले अनेक गुप्त करार व या गुप्त करारांतून वाढत गेलेला द्वेष, संशय आणि असुरक्षिततेचे वातावरण यामुळे महायुद्ध झाले, असे जगभरातले तज्ज्ञ सांगतात. पण हे सगळे युद्ध घडून गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले. तोपर्यंत वेळ त्यांच्या हातून निघून गेलेली होती. हे सर्व लक्षात घेतल्यास कोणत्या परिस्थितीत कशामुळे काय घडते व काय घडू नये यासाठी काय केले पाहिजे, हे आपल्याला समजू शकते. कळत नकळत आपल्या हातूनही देशाच्या बाहेर किंवा देशाच्या आत असे काही छोटे किंवा मोठे अपघात घडू नयेत, यासाठी आपण ते समजून घेणे गरजेचे आहे.
भेदभाव आणि अपमान यातून संघर्ष निर्माण होतो व हा संघर्ष आपलीही राखरांगोळी करू शकतो किंवा आपल्यालाही कमकुवत करू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या काळातील अमेरिकेच्या वर्तनातूनही एक मोठा बोध आपल्याला घेता येईल. या संपूर्ण काळात अमेरिकेने सशस्त्र संघर्षापासून स्वत:ला शक्य तितके दूर ठेवले होते. याचा परिणाम असा झाला की, पहिल्या महायुद्धात पडलेली आॅस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही सारी प्रबळ राष्ट्रे युद्धातील विध्वंस व नुकसानीमुळे दुर्बल झाली, तर अमेरिकेचा युद्धोत्तर काळातील जगातील सर्वाधिक प्रबळ राष्ट्र म्हणून उदय झाला. स्वत:ची प्रगती साधून घ्यायची असेल, तर अनावश्यक भांडखोरपणापासून किंवा युद्धज्वरापासून आपण शक्य तितके दूर राहिले पाहिजे.

१९२0 मध्ये स्थापन झालेला हा राष्ट्रसंघ १९४६ साली विसर्जित करण्यात आला. परंतु तत्पूर्वीच, २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजे सध्याच्या युनोची स्थापना करण्यात आली होती. हा दुसरा राष्ट्रसंघ शांतता संवर्धनाचे काम त्याच्या परीने सध्या करत असला, तरी त्याच्या कार्यपद्धतीबाबत काही प्रमाणात असंतोषही निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत १९२0 चा पहिला राष्ट्रसंघ अपयशी का ठरला, याची कारणमीमांसा आपण लक्षात घेतल्यास नव्या काळातील नव्या चुका आपल्याला मोठ्या प्रमाणात टाळता येतील. भविष्यात होऊ शकणारी मोठ्या प्रमाणातील मनुष्यहानी व वित्तहानीही कदाचित आपल्याला टाळता येईल. यातून देशांतर्गत व देशाबाहेरील मानवाधिकारांचे संरक्षण तर होईलच; पण वाचलेला पैसा लोककल्याणासाठी खर्च करण्याची ऐतिहासिक सुसंधीही आपल्याला प्राप्त होईल. युद्धानंतरच्या व्हर्साय तहातून विजेत्यांनी पराभूत जर्मनीवर तेहतीस हजार कोटी डॉलर्सची युद्धखंडणी लादली होती. पराभूतांच्या मनात यातून नकळतपणे अपमानाची एक ठिणगी पेटवली गेली. या ठिणगीतूनच पुढे दुसरे महायुद्धही झाले व त्यात सुमारे साडेसहा कोटी लोक मरण पावले.
पहिल्या राष्ट्रसंघाच्या शंभरीच्या निमित्ताने या आणि अशा आणखी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर आपल्या देशाला व उर्वरित मानवी जगाला अनावश्यक संघर्ष आणि तदनुषंगिक आपत्तींपासून दूर ठेवणे आपल्याला काही प्रमाणात तरी शक्य होईल, असे दिसते. सध्याच्या परिस्थितीत भारतासंदर्भात विचार करता भारतीय सीमेच्या आतील व बाहेरील भांडखोर प्रवृत्तीच्या लोकांना बाजूला ठेवून सीमेच्या आतील व बाहेरील शांततावादी लोकांना परिस्थितीचे नियंत्रण करण्याची संधी मिळवून दिल्यास शांतता प्रस्थापनेचे प्रयत्न यशस्वी ठरतील. हे करण्यात जर आपण कसूर केली, तर उद्या कदाचित पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्या सर्वांवर येऊ शकेल. त्यामुळे पहिले ते सावधपण, अशा सुधारित तत्त्वाचा सध्याच्या काळात आपण जाणीवपूर्वक स्वीकार केला पाहिजे, असे वाटते.
(प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान)

Web Title: The idea of peace is to be taken from the United Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.