शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘मला मायभूमी नाही’ ही बाबासाहेबांची वेदना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक समतेची संकल्पना जाती निर्मूलनाच्या सिद्धांतावर आधारित आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले ‘अ‍ॅनिहिलेशन आॅफ कास्ट’, ‘हू वेअर द शूद्राज’,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक समतेची संकल्पना जाती निर्मूलनाच्या सिद्धांतावर आधारित आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले ‘अ‍ॅनिहिलेशन आॅफ कास्ट’, ‘हू वेअर द शूद्राज’, ‘दी अनटचेबल्स’ या पुस्तकांतून तसेच त्यांनी केलेल्या वृत्तपत्रीय लेखनातून आणि शेकडो भाषणांतून त्यांनी जातिव्यवस्थेवर तर्कशुद्ध प्रखर असे बौद्धिक हल्ले केले. बाबासाहेबांना खरे तर जातिअंताद्वारे राजकारण, समाज, धर्म व अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांत समता व सहजीवन अभिप्रेत होते. ब्राह्मणशाही व भांडवलशाहीचा मुकाबला करणे याचा अर्थ त्यांना जातिविहीन नि वर्गविहीन शोषणमुक्त समाज हवा होता. जातिप्रथा हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीशी निगडित असल्यामुळे जातिव्यवस्थेला आधारभूत असणाºया धर्मग्रंथांना व हिंदू संस्कृतीला पूर्णपणे नकार दिल्याशिवाय जातिअंत होणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. जातिअंतासाठी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करतानाच बुद्धिवाद्यांनी जातिव्यवस्थेविरोधी लोकप्रबोधन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद करून ठेवले. शूद्र, आदिवासी, अस्पृश्य वर्गाने एक राजकीय आघाडी करून जातिसंस्थेविरुद्ध लढा उभारला पाहिजे, असे बाबासाहेबांचे सांगणे होते. बाबासाहेबांनी त्यांच्या ‘अ‍ॅनिहिलेशन आॅफ कास्ट’मधून (जातिनिर्मूलन) जातिसंस्थेची मूलभूत चिकित्सा करून जातिअंताचे प्रभावी उपायही सांगितले आहेत. यासंदर्भात थोर विचारवंत मधू लिमये लिहितात, ‘अ‍ॅनिहिलेशन आॅफ कास्ट’मध्ये बाबासाहेबांनी मांडलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्याशिवाय भारताचे सुप्त सामर्थ्य प्रकट होणार नाही; अन्यथा भारत आणि भारतीय संस्कृती यांच्या कपाळी विनाश लिहिलेला आहे. जितक्या प्रमाणात बाबासाहेबांचे महान विचार प्रत्यक्षात साकार होतील तितक्या प्रमाणात देशाचा विनाश टळेल. (डॉ. आंबेडकर : एक चिंतन, पृष्ठे - १२०) तेव्हा प्रश्न असा की, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील जातिअंत होऊन समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूभावाचा आपल्या समाजात उदय झाला आहे काय? नाही. मुळीच नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येथील जातिग्रस्त समाजव्यवस्थेने पदोपदी अपमान केला. त्यांना शिव्याशाप दिले. बाबासाहेब म्हणूनच म. गांधींना म्हणाले होते, ‘गांधीजी मला मातृभूमी नाही.’ बाबासाहेबांनी गांधीजींजवळ जी वेदना व्यक्त केली होती, त्या वेदनेत आजही फारसा फरक पडलेला नाही. कारण, आजही जातीय मानसिकतेतून देशभर दलित समाजावर अत्याचार होतच असतात. दलित माणसे शिक्षण घेतात, चांगले राहतात, आंबेडकर जयंती साजरी करतात, स्वाभिमानाने राहतात, गावकीची कामे नाकारतात. म्हणजे आपली पायरी सोडून वागतात, असे समजून त्यांच्यावर अत्याचार करणे हा जणू काही आपला मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे, असे मानून येथील जातिग्रस्त समाजव्यवस्था दलित समाजावर राक्षसी अत्याचार करीत असते. अशा स्थितीत दलितांनी अत्याचारविरोधी आवाज उठविला, तर त्यांना सुरक्षाकवच म्हणून लाभलेला अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा बदला, त्यांच्या सवलती बंद करा, अशी मागणी होताना दिसते. हे सारे प्रकार म्हणजे दलितविरोधी जातीय मानसिकतेचे भेसूर नि कुरूप नमुने आहेत; पण या अन्यायाविरुद्ध बहुसंख्याक समाज दलितांच्या बाजूने उभा राहावयास तयार नाही. असे का होते? तर आपणाकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे म्हणून! बाबासाहेबांच्या समग्र सामाजिक समतेचा संघर्ष पाहता ते प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरुद्ध लढत होते हे उघड आहे. त्यांची ती प्रस्थापितविरोधी लढाई अजूनही संपलेली नाही. जात संपलेली नाही. जातीच्या मुळाशी असलेल्या धर्मव्यवस्थेवर बाबासाहेबांनी घणाघाती हल्ले केले; पण जातीचा आधार असणारा धर्मच आज राजकारणात प्रभावी होत आहे. धर्मचिकित्सा करणाºयांच्या हत्या होत आहेत. जातीचे मोर्चे निघत आहेत. जातीचा अडथळा राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या आड येत आहे. अत्याचारातही जात शोधली जात आहे, अत्याचारविरोधी जातिधर्मनिरपेक्ष लढा उभारण्याची गरज कुणालाही वाटेनाशी झाली आहे. दलित अस्वस्थ आहेत. जातीमुळे ‘एक राष्टÑ-एक समाज’ उभा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत.दलित समाजावर एकीकडे अमानुष अत्याचार होत असताना दुसरीकडे दलितांची राजकीय चळवळ मात्र सत्ता, संपत्ती, नेतृत्वाचे हेवेदावे, अहंकार या समाजविघातक दुर्गुणांत गुरफटून छिन्नभिन्न झाली आहे. बाबासाहेबांची लेकरे त्यांच्याच पाऊलखुणा मिटवून शत्रूच्या गोटात शिरून आपला क्षुद्र स्वार्थ साधण्यात मश्गूल आहेत. आता तर दलित नेतृत्वाचे इतके वैचारिक अध:पतन झाले आहे की, भाजपच्या मांडीस मांडी लावून बसण्यातही काहींना धन्यता वाटत आहे. दलितांचे राजकीय संघटन फुटल्यामुळे आणि आंबेडकरी समाजातच बेकी वाढल्यामुळे खेडोपाडी दलित समाजावरील अत्याचार वाढले आहेत. कोपर्डी प्रकरणात मराठा समाज संघटितपणे रस्त्यावर उतरून स्वागतार्ह न्याय मिळवितो आणि दुसरीकडे दलित समाज फाटाफुटीत रमतो. बाबासाहेबांचे स्मरण करताना म्हणूनच सर्वांनी अंतर्मुख होऊन त्यांचा जातिअंताचा लढा गतिमान करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीस प्रणाम!बी.व्ही. जोंधळेज्येष्ठ विचारवंत