हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:05 IST2025-03-21T11:05:01+5:302025-03-21T11:05:23+5:30
विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते, ते निर्णय बदलण्याचाही त्यांनी सपाटा लावला आहे.

हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून सगळ्यांनाच धारेवर धरले आहे. जगातल्या अनेक देशांना तर त्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणानं जेरीस आणलं आहेच; पण स्वत:च्या देशातील लोकांनाही त्यांनी सोडलेलं नाही. विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते, ते निर्णय बदलण्याचाही त्यांनी सपाटा लावला आहे.
यासंदर्भात अमेरिकेतल्याच अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे, केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यानं घेतलेले निर्णय म्हणून ते बदलायचे आणि आपल्या मनाला वाटेल ते करायचं, त्यासाठी मागचा पुढचा काहीही विचार करायचा नाही, आपल्या स्वत:च्या देशावर, देशाच्या नागरिकांवर त्याचा वर्तमान आणि भविष्यात काय परिणाम होईल, हेदेखील न तपासता देशालाच अडचणीत आणणारे अनेक निर्णय ट्रम्प घेत आहेत.
जगातल्या अनेक देशांप्रमाणे अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षाला अनेक अधिकार आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहे, मग तो कोणताही गुन्हेगार असो. अगदी सर्वोच्च न्यायालयालाही त्यात हस्तक्षेप करता येत नाही. याच अधिकाराच्या अंतर्गत जो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस काही गुन्हेगारांना माफी दिली होती. त्यात त्यांचे पुत्र हंटर बायडेन यांचाही समावेश होता. त्यांच्यावर करचोरीचा आरोप आहे.
अर्थात बायडेन यांच्या या निर्णयावर अमेरिकेच्याही अनेक नागरिकांनी टीका केली होती. राष्ट्राध्यक्षांना माफीचा अधिकार असला तरी आपल्याच पुत्राला ‘निर्दोष’ ठरवताना एक चुकीचा पायंडा ते पुढे चालवित असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. ट्रम्प यांनी नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवले असून, त्यांनी बायडेन यांनी ज्यांना माफी दिली होती, त्यांची माफी रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थातच त्यांनी जर हा निर्णय घेतला तर बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांची फाइलही पुन्हा उघडली जाईल. ट्रम्प म्हणाले, बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत जे गुन्हे माफ केले तो प्रकारच अवैध आहे. त्यामुळे हंटर बायडेन यांच्या गुन्ह्यांची फाइल पुन्हा उघडू शकते. बायडेन यांनी अयोग्य मार्गानं ज्या ज्या गुन्हेगारांना माफ केलंय, त्या सर्वांना आता चौकशीला सामोरं जावं लागेल.
ट्रम्प एवढ्यावरच थांबलेले नाहीत, बायडेन यांचा यथेच्छ समाचार घेताना ते म्हणाले, राजकीय ठग आणि इतर अनेक खतरनाक गुन्हेगारांना माफ करताना बायडेन झोपेत होते. आपण काय करतोय, कशावर सही करतोय, हेदेखील त्यांना कळत नव्हतं. त्यांनी ‘ऑटोपेन’नं या सगळ्या सह्या केल्या आहेत. ऑटोपेन हे असं यंत्र आहे, जे सह्यांची हुबेहूब नक्कल करू शकतं. विशेषतः अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी हा पेन डिझाइन करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सह्यांसाठी ऑटोपेनच वापरत आहेत.
हंटर बायडेन यांच्यावर आरोप आहे की २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी टॅक्स भरलेला नाही. या काळात त्यांनी १४ लाख डॉलर्स (सुमारे १२ कोटी रुपये) टॅक्सचोरी केली आहे. ड्रग्ज, सेक्स वर्कर्स आणि अय्याशीसाठी त्यांनी हा पैसा वापरला तसंच अवैध पद्धतीनं बंदूक बाळगण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. हंटर यांच्यावरील या साऱ्या आरोपांची फाइल आता खुली होऊ शकते..