पवारांच्या पार्टीची पॉवर किती?

By Admin | Updated: April 16, 2015 23:40 IST2015-04-16T23:40:51+5:302015-04-16T23:40:51+5:30

मध्यंतरी नगरमध्ये फेरी मारून गेलेल्या शरद पवारांनी काय राजकीय कांडी फिरवली कोण जाणे? पण पुन्हा एकदा पक्ष सचेत झाला आहे.

How much is the power of the party? | पवारांच्या पार्टीची पॉवर किती?

पवारांच्या पार्टीची पॉवर किती?

मध्यंतरी नगरमध्ये फेरी मारून गेलेल्या शरद पवारांनी काय राजकीय कांडी फिरवली कोण जाणे? पण पुन्हा एकदा पक्ष सचेत झाला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी सुरू झालेली छुपी साठमारी, त्याचीेच द्योतक ठरावी.

विधानसभेत चार आमदार जिंकूनही नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पत घसरली. गेले काही महिने चाचपडणाऱ्या राष्ट्रवादीला पुन्हा बळ देण्यासाठी शरद पवार नुकतेच नगर शहरात दिवसभर तळ ठोकून गेले. राष्ट्रवादीसाठी भविष्यकालीन राजकारण शिजविण्यासाठी हा दिवस त्यांनी खर्ची घातला. त्यामुळे काय कांडी फिरली कोण जाणे? पण, पुन्हा एकदा पक्ष सचेत झाला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी सुरू झालेली राजकीय साठमारी त्याचीच द्योतक ठरावी. नगर जिल्ह्यात पवारांच्या पार्टीची पॉवर किती, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणण्याचा मार्गही यानिमित्ताने मोकळा झाला.
शरद पवारांचा नगर जिल्ह्यावरील राजकीय स्रेह वादातीत ! त्यामुळे त्यांचे पाय इकडे वळले की काहीतरी घडणार हे निश्चित. यावेळी ते राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांच्या ‘घरवापसी’ मोहिमेचा प्रारंभ करून गेले. कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे हे या मोहिमेतील पहिले फलित. इतरांचे काय, हा प्रश्न अद्याप उत्तराशिवाय पडून आहे. पण सत्तेतील भाजपा-सेनेपेक्षा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी अधिक चर्चेत आहे. पवारांना नेमके हेच हवे असते ! काळे सोडून गेल्याने सेनेला काही फरक पडलेला नाही. चर्चेत आलेल्या राष्ट्रवादीत मात्र जिल्हाध्यक्षपदावरून स्पर्धा वाढली. या पदावर बसण्यास फारसे कोणी इच्छुक नसेल, अशीच अनेकांची धारणा होती. पक्षाचा जन्म झाल्यापासून सत्ता असल्याने आजवर या पदाची किंमत ‘भाजीत टाकल्या जाणाऱ्या कढीपत्त्याएवढीच’ होती. शिजवून झाले की जेवताना कढीपत्ता भाजीतून निवडून बाहेर काढला जातो, तेवढाच नगर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाचा आजवरचा वापर ! जो पालकमंत्री, त्याच्याच हातात पक्षाची दोरी हा अलिखित नियमच होता. सत्ता गेल्यावर या पदाचे वलयही संपले असेल, हा समज पदासाठी सुरू झालेल्या स्पर्धेने दूर केला.
निवडीसाठी लोकशाही पद्धत अवलंबली जाईल, अशी घोषणा पक्षाकडून झाली होती. मातब्बर इच्छुकांच्या गर्दीमुळे ही घोषणा हवेत विरली. निर्णय घेण्याचे अधिकार पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींकडे गेले आहेत. अर्थात, पक्षश्रेष्ठींनी नेमलेला अध्यक्ष बदलण्यास भाग पाडणारा जिल्हा म्हणूनही नगरची ओळख आहे. तेव्हा पवारांच्या ‘घरवापसी’ मोहिमेसाठी नवा अध्यक्ष पूरक ठरावा, यासाठी विशेष काळजी घेतली जाईल, हे ओघाने आलेच! सध्या माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख या पदासाठी इच्छुक आहेत. गडाख हे नाव अचानक पुढे आले. आजवर समाजकारणात व्यस्त असलेल्या प्रशांत यांचे नाव थेट राजकीय पदासाठी पुढे केले जाईल, याची कल्पना खुद्द त्यांच्याच समर्थकांना नव्हती. त्यामुळे या खेळीचे कनेक्शन शोधण्याचाही प्रयत्न राजकीयदृष्ट्या होणारच.
जिल्हा बँक मळलेल्या वाटेवर
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर नेते व्यस्त आहेत. जिल्ह्यातील सहकाराची नाडी हाती असलेल्या जिल्हा बँकेचे राजकारण पुन्हा एकदा मळलेल्या वाटेने मार्गक्रमण करीत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आव्हान उभे करतील म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात सावध होते. विखेंनी जाहीरपणे बँकेच्या राजकारणात अद्याप उडी घेतलेली नाही. बँकेतील सामना सरळ असतो. विखे-थोरात या दोन मातब्बरांच्या गटात नेते विभागले जातात. दोन्ही नेते काँग्रेसचे. पक्षीय भेद जिल्हा बँकेच्या राजकारणात बाजूला ठेवला जातो. विखे भाजपा नेत्यांसोबत मोट बांधतील, अशी चर्चा होती. पण नगर तालुका सेवा संस्था मतदारसंघातून भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले बिनविरोध झाले. त्यांनीही थोरात गटात थांबणेच इष्ट मानले. माजी आमदार चंद्रशेखर घुलेही अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाले. सहकारात खेळ नको, याची कारखानदार नेत्यांना जाणीव असल्याने यापुढील वाटचालही अशीच अपेक्षित गटात मोडणारी असेल का, याची उत्सुकता आहे.
- अनंत पाटील

Web Title: How much is the power of the party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.