महाराष्ट्रीय बुद्धिवंत इतके मुर्दाड कसे?

By Admin | Updated: September 24, 2015 09:12 IST2015-09-23T21:54:40+5:302015-09-24T09:12:14+5:30

..आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना इशारे दिले, त्यांचा निषेध केला, पण ते थांबले नाहीत’ हे विधान आहे,सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचे पानसरे संदर्भातलं.

How to fool the Maharashtrant? | महाराष्ट्रीय बुद्धिवंत इतके मुर्दाड कसे?

महाराष्ट्रीय बुद्धिवंत इतके मुर्दाड कसे?

प्रकाश बाळ (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
‘..आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना इशारे दिले, त्यांचा निषेध केला, पण ते थांबले नाहीत’
हे विधान आहे, सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचं. पानसरे यांच्या संदर्भातलं. पानसरे यांच्या हत्त्येच्या प्रकरणात समीर गायकवाड या ‘सनातन’च्या साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत हे विधान मराठे यांनी केलं आहे. याच मुलाखतीत मराठे यांनी उघडपणं कबूल केलं आहे की, ‘आम्ही आमच्या साधकांना शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे.’ त्याचप्रमाणं डॉ. दाभोलकर हे ‘निरीश्वरवादी’ (एथीस्ट) होते, पानसरे हे ब्राह्मणांच्या विरोधात बोलत असत, अशी विधाने मराठे यांनी केली आहेत.
भारतातील कोणत्याही व्यक्तीला वा संस्थेला परवानागीविना शस्त्र धारण करण्याचा किंवा शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचा हक्क नाही. हा कायद्यानं गुन्हा आहे. जर ‘सनातन’ संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्तच उघडपणं कबूल करीत असतील, तर या संस्थेवर व श्री.मराठे यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणं हे घटनात्मकरीत्या सत्तेवर आलेल्या आणि कायद्याचं राज्य चालवण्याची शपथ घेतलेल्या सरकारचं कर्तव्यच आहे. अर्थात असं काही होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे.
...कारण आपल्या देशात जी राजकीय संस्कृती आकारला येत गेली आहे, त्यात अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असलेली राज्यसंस्था ज्यांच्या हातात आहे, ते नेहमीच राजकीय फायद्याची सोईस्कर भूमिका घेत आले आहेत. म्हणूनच ‘सनातन’ वा विद्वेष पसरवणाऱ्या इतर हिंदुत्ववादी संस्था अथवा इतर धर्मांतील अशा संघटनांंवर कधीच कारवाई होत नाही. भारतीय राज्यघटनेनं आपापल्या धर्माचा प्रसार, प्रचार व आचरण करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलं आहे. मात्र या स्वातंत्र्यावर ‘व्यापक समाजहिता’ची मर्यादा आहे. त्यामुळं विद्वेष पसरवण्याचं स्वातंत्र्य कोणालाच नाही. मात्र हवा तसा विद्वेष पसरवण्याचा परवाना, असंच आपण
भारतातील ‘सर्वधर्मसमाभावा’चं स्वरूप बनवलं आहे.
मात्र ‘सनातन’सारख्या संस्था जे विचार पसरवण्याचा प्रयत्न करीत असतात, त्याला समाजातून विरोध होणं आवश्यक आहे आणि तोच अशा विघातक प्रवृत्तींना कायमचा लगाम घालण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र समाजात असे वैचारिक मंथन घडवून ‘सनातन’ वा इतर कोणत्याही हिदुत्ववादी किंवा इतर धर्मांंच्या संघटनांचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
डॉ. दाभोळकर ‘निरीश्वरवादी’ होते आणि म्हणून आमचा त्यांना विरोध होता, आता त्यांच्या पाठीराख्यांच्या मोहिमांनाही आम्ही विरोध करीतच राहणार, असा दावा या मुलाखतीत मराठे या ‘सनातन’च्या व्यवस्थापकीय विश्वस्तानं केला आहे. खरं तर ‘बिलिव्हर’ आणि ‘एथीस्ट’ या दोन्ही संकल्पना पाश्चिमात्य आहेत. ईश्वर मानणं व ईश्वराचं अस्तित्व न मानणं, असा त्याचा अर्थ आहे. आपण ज्याला ‘नास्तिक’ व ‘आस्तिक’ म्हणतो, त्याचा या दोन्ही संकल्पानशी काही संबंध नाही. हिंदू धर्मात ‘आस्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य मानणारे आणि ‘नास्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणारे. त्यामुळं हिंदू धर्मातील ‘नास्तिक’ हे ईश्वरवादी असू शकतात आणि वेदप्रामाण्य मानणारे ‘आस्तिक’ही निरीश्वरवादी असू शकतात.
हिंदू धर्माची जी आठ दर्शनं आहेत, त्यातील जैन, चार्वाक व बौद्ध ही तीन दर्शनं वेदप्रामाण्य मानत नाहीत, त्यामुळं ती ‘नास्तिक’ ठरवली गेली. पण ही दर्शनं मानणारे ईश्वराचं अस्तित्व नाकारतात, असंही नाही. त्यामुळं जर ‘सनातन’ खरंच हिंदू धर्म मानत असेल, तर दाभोलकर ‘निरीश्वरवादी’ आहेत, म्हणून ते धर्मविरोधक आहेत, असं ठरवताना, त्यांनी पाश्चिमात्य निकष वापरला की, वेदप्रामाण्याचा? आणि जर दाभोलकर वेदप्रामाण्य मानत असते, तरीही ते ईश्वराचं अस्तित्व नाकारत असते, तर ते ‘नास्तिक’ ठरले असते काय? तरीही ते ‘निरीश्वरवादी’ आहेत, म्हणून हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, असं ‘सनातन’ म्हणत असल्यास या संस्थेचा हिंदू धर्म खरा कोणता आणि या संस्थेला खरा हिंदू धर्म कळला तरी आहे काय, हे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाच नव्हे, तर एकूणच हिंदुत्ववादी परिवारालाच विचारले गेले पाहिजेत. त्यासाठी व्यापक प्रमाणावर वैचारिक घुसळण घडवून आणण्याची गरज आहे. अर्थात अशा प्रकारच्या वैचारिक घुसळणीमुळं आपण उघडे पडू, हे लक्षात आल्यावर, हिंदुत्ववादी परिवार गप्प बसणार नाही, हे खरंच. तेथेच ‘राज्यसंस्थे’चा
संबंध येतो. जर राज्यसंस्था तटस्थ, नि:पक्षपाती व
न्याय्य पद्धतीनं कारभार करणारी असेल, तर ती अशा वैचारिक मंथनाला मोकळा वाव देण्यास कटिबद्ध असायला हवी.
ईश्वराचं अस्तित्व अमान्य करण्याचा अधिकार आधुनिक जगातील घटनात्मक लोकशाहीत राहणाऱ्या नागरिकाला आहे की नाही, हा खरा या सगळ्या वैचारिक वादाच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे. मग तो नागरिक, हिंदू, मुस्लिम, खिश्चन, बौद्ध, जैन व इतर कोणत्याही धर्माचा वा पंथाचा असो. अल्लावर विश्वास नाही, असं म्हणणारा मुस्लिम इस्लामच्या दृष्टीनं पाखंडी ठरतो. तो धर्मद्रोह मानला जातो. ‘सनातन’ जे म्हणत आहे, ते हे पाखंडी ठरवण्याचं तत्व आहे. वस्तुत: ‘मी हिंदू आहे’, याचं कोणतंही ठोस लक्षण सांगता येत नाही. मी घरी बसून, देवळात न जातात, कोणतीही कर्मकांड न करता, हिंदू असू शकतो. ‘सनातन’सारख्या संस्थांना असा जो खरा हिंदू धर्म आहे, तो नको आहे. हेच व्यापक हिंदुत्ववादी परिवाराचं उद्दिष्ट आहे आणि ‘सनातन’सारख्या संस्था या व्यापक हिंदुत्ववादी परिवाराच्या ‘फायटींग आर्म’ आहेत. म्हटलं तर वापरता येतात ंिकवा वेळ पडल्यास हात झटकूनही टाकता येतात. तेच आज होत आहे.
देशातील प्रबोधनाची पहाट जेथे उजाडली, त्या महाराष्ट्रीय समाजातील बुद्धिवंंतच ‘सनातन’च्या अशा अधर्माला सरळ वैचारिक आव्हान न देण्याएवढे मुर्दाड बनले आहेत, हे दुर्दैवच!

Web Title: How to fool the Maharashtrant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.