समलैंगिक जोडप्याला प्रत्येकी १०० वर्षांची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:40 IST2024-12-30T08:39:13+5:302024-12-30T08:40:59+5:30
नैसर्गिक न्यायाचा त्यांचा हक्क मान्य करून त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही असे अनेक देश आहेत, जिथे समलैंगिक व्यक्ती आपल्या हक्कांच्या समर्थनार्थ हा लढा लढत आहेत...

समलैंगिक जोडप्याला प्रत्येकी १०० वर्षांची शिक्षा!
जगातल्या अनेक देशांत समलैंगिक विवाहांची चळवळ सुरू आहे. ‘समलैंगिक आकर्षण असणं चूक नाही. ते नैसर्गिक आहे. त्यामुळे आमच्यावर कोणतीही बंधनं न आणता, सर्वसामान्य लोकांप्रमाणे आमचाही विचार करून आम्हालाही समलैंगिक विवाहाची मान्यता मिळावी’, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून जगभरात ही चळवळ सुरू आहे. अलीकडच्या काळात त्याला व्यापक स्वरूप आलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून जगातील अनेक देशांनी आता समलैंगिक विवाहांना मान्यता दिली आहे.
नैसर्गिक न्यायाचा त्यांचा हक्क मान्य करून त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही असे अनेक देश आहेत, जिथे समलैंगिक व्यक्ती आपल्या हक्कांच्या समर्थनार्थ हा लढा लढत आहेत. इतर ‘प्रागतिक’ देशांप्रमाणे आम्हालाही समलैंगिक विवाहाचा अधिकार मिळावा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या भूमिकेकडे आता सहानुभूतीनं पाहिलंही जात आहे. बऱ्याच देशांत अजून ही मान्यता मिळाली नसली, तरी लोकांनी अशा लोकांना अगदीच वाळीत टाकणं बंद केलं आहे. आणखीही बऱ्याच देशांत आता ही मान्यता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीनं पाऊलंही टाकलं जात आहेत.
परंतु जगभरातील या चळवळीलाच नख लागेल अशी एक घटना नुकतीच अमेरिकेत घडली आहे. त्यामुळे सगळ्या जगातूनच याबद्दल टीकेचा वर्षाव होतो आहे. विल्यम झुलॉक आणि झॅचरी झुलॉक हे अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात राहणारं एक समलैंगिक जोडपं. त्यांचं राहणीमानही अतिशय अलिशान. कारण दोघांनाही पैशाची ददात नव्हती. ३४ वर्षीय विल्यम सरकारी कर्मचारी, तर ३६ वर्षीय झॅचरी हा बँकर. काही वर्षांपूर्वी या कपलनं एक अतिशय ‘प्रागतिक’ निर्णय घेतला. दोघांनी मिळून दोन मुलं दत्तक घेतली. त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढवण्याचा, त्यांना काहीही कमी पडणार नाही, यासाठीची सर्वतोपरी काळजी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या कपलनं घेतलेला निर्णय आणि त्या चौघांचे फोटो त्यावेळी माध्यमांत आणि सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात झळकले. चित्रातही शोभून दिसावेत असे हे फोटो. लोकांनी या कपलचं वारेमाप कौतुक केलं. हे कौतुक झेलता झेलता त्यांनाही आकाश दोन बोटं राहिलं. सोशल मीडियावर तर हे कपल जणूकाही सेलिब्रिटीच झालं.
पण.. या जोडप्यानं जे काही केलं, ते अख्ख्या मानवजातीला काळिमा फासणारं ठरलं. या दाम्पत्यानं जी दोन मुलं दत्तक घेतली, त्यांची सध्याची वयं आहेत अनुक्रमे दहा आणि बारा वर्षे. दोन्हीही मुलं अतिशय निरागस. पण या जोडप्यानं या मुलांचं बालपणच ओरबाडलं. जगाला दाखवताना त्यांनी ‘आपली मुलं’ म्हणून या दोघांना पुढे केलं, त्यांना दत्तक घेऊन स्वत:ची पाठ थोपटून घेतली, कारण ही दोन्ही मुलं एका अनाथालयातून त्यांनी दत्तक घेतली होती. सगळ्यांना वाटलं, आता या मुलांना चांगलं आयुष्य मिळेल, त्यांना ‘पालक’ मिळाल्यानं त्यांचं भविष्य आता मार्गी लागेल, पण कसलं काय?..
या दोन्ही मुलांवर त्यांच्या ‘पालकांनीच’ लैंगिक अत्याचार तर केलेच, पण इतरांनाही करायला लावले. त्यातून चांगला पैसाही उकळला. एवढंच नव्हे, या दोन्ही मुलांचं लैंगिक शोषण करतानाचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी आपल्या मित्रांना त्यांच्या ‘विशिष्ट’ कम्युनिटीवर शेअर केले. हे कमी म्हणून की काय, या दोघांनी हे व्हिडीओ पोर्नोग्राफीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांनाही विकले आणि त्यातूनही बक्कळ कमाई केली.
अगदीच अनपेक्षितपणे पाेलिसांना या प्रकरणाचा छडा लागला. पोर्नोग्राफी व्हिडीओ डाऊनलोड करत असताना एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी या दोघा बदमाशांच्या घरी धाड टाकली आणि त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
२०२२ मध्ये हे प्रकरण उजेडात आल्यानंतर अमेरिकेत आणि संपूर्ण जगातच यामुळे खळबळ माजली होती. अमेरिकन न्यायालयानं दोघांनाही नुकतीच शिक्षा सुनावली आहे. किती असावी ही शिक्षा? या दोघांचं कृत्य पाहता न्यायालयानं दोघांनाही प्रत्येकी शंभर वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात न्यायाधीश रँडी मॅकगिनले यांचं म्हणणं आहे, या दोघांनी इतकं नीच कृत्य केलं आहे की, कोणतीही शिक्षा यांच्यासाठी कमीच पडावी. यापेक्षाही कडक शिक्षा यांना देता आली असती, तर तीही मी दिली असती..
आणखी कठोर शिक्षा द्यायला हवी होती..
विशेष म्हणजे विल्यम आणि झॅचरी यांनी आपल्यावरील आरोप पूर्णपणे मान्य केले आहेत. जगभरातील समलैंगिक चळवळीतील कार्यकर्त्यांनीही या दोघांवर सडकून टीका केली आहे. अशा कृत्यामुळे या चळवळीलाच काळिमा लागला आहे, त्यांच्यावर अजूनही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे होती, असंही अनेकांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या दोघांना शंभर वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे लोकांनी न्यायाधीशांचंही कौतुक केलं आहे.