घरवापसी !

By सचिन जवळकोटे | Published: October 4, 2020 07:37 AM2020-10-04T07:37:31+5:302020-10-04T07:38:53+5:30

लगाव बत्ती

Homecoming! | घरवापसी !

घरवापसी !

Next

- सचिन जवळकोटे

या चिमण्यांनो.. परत फिरा रेऽऽ

‘थोरले काका बारामतीकर’ यांचा गेल्या दोन महिन्यांतील हा दुसरा दौरा. भलेही दौ-याचा हेतू सांत्वनापुरता होता. मात्र जवळच्या घराण्यांचे ऋणानुबंध जपणं अन् दूर गेलेल्या मंडळींशी जवळीक साधणं हीही पडद्यामागची भूमिका तेवढीच महत्त्वाची. भविष्यात ‘घरवापसी’ प्रोग्राम रंगला तर गेल्या पाच वर्षांत भरकटलेली पाखरं येऊ शकतात, पुन्हा आपल्या घरी. जणू ‘या चिमण्यांनो... परत फिरा रेऽऽ’सारखं... लगाव बत्ती..

चंद्रभागे’ची वळणं-वळणं..

 पंढरीतल्या ‘पंतांच्या वाड्या’वर तब्बल सहा-सात वर्षांनी ‘थोरले काका’गेलेले. सुरुवातीला ‘थोरल्या पंतां’च्या फोटोसमोर सारेच स्तब्ध राहिलेले. ‘बारामती’ अन् ‘पंढरपूर’च्या या दोन मोठ्या घराण्यांमध्ये भलेही राजकीय दुरावा निर्माण झाला असला तरी आतली भावनिक ओढ वाड्याच्या जुन्या भिंतींनाही समजून चुकलेली. ‘पंतां’च्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षाचे किती नेते वाड्यावर येऊन गेले, याची जेवढी कुजबुज झाली नसेल तेवढी ‘थोरल्या काकां’च्या भेटीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली.

या भेटीनंतर ‘भालके नानां’च्या बंगल्यावर जेवण्यासाठी ताफा गेला. ‘जास्त माणसं नकोत’ अशी ‘काकां’ची स्पष्ट सूचना असल्यानं केवळ तेरा नेत्यांनाच आत प्रवेश. याचवेळी तिथं ‘कल्याणराव’ही आले. मात्र तेरा जणांच्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं पोलिसांनी प्रवेश नाकारला. काही वेळ अस्वस्थपणे मोबाईल हाताळत अखेर ‘कल्याणरावां’नी तिथून गाडीकडं आपली दिशा वळविली.
आतमध्ये हा निरोप जाताच ‘नाना’ झटकन् बाहेर आले. त्यांनी ‘कल्याणराव कुठायंतऽऽ कल्याणरावऽऽ’ अशी दाढी कुरवाळत विचारणाही सुरू केली. अखेर ‘नानां’नी कॉल केला, तेव्हा तिकडून शांतपणे ‘कल्याणराव’ बोलले, ‘मी आता घरी जेवायला बसलोय. घ्या देवाचं नावऽऽ’.. विशेष म्हणजे याचवेळी ‘आत’मध्ये ‘कल्याणरावां’चं नाव घेऊन त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचं काम इमानेइतबारे सुरू होतं.

खरंतर, ‘कल्याणरावां’ना ‘नानां’च्या पंगतीत इंटरेस्ट नव्हता. त्यांना ‘थोरल्या काकां’कडून आपल्या ‘ताटात’ थकहमीची ‘बासुंदी’ ओतून घ्यायची होती. त्यासाठी संवाद साधायचा होता. अखेर जाताना ‘हेलीपॅड’वर ‘कल्याणरावां’नी भेट घेतलीच. अडचणीतल्या कारखान्याचा विषय मांडला. ‘थोरल्या काकां’नी म्हणे हेलिकॉप्टरमध्ये बसता-बसता ‘क-हाड’च्या ‘बाळासाहेबां’ना सांगावाही धाडला. ‘चंद्रभागा’ला केवळ ‘दहा खोकीं’नी काहीच ऊद होणार नाही, आणखी खोकी वाढवा, अशी सूचनाही केली गेली. तिकडं ‘काकां’चं हेलिकॉप्टर हवेत उडालं अन् इकडं आनंदानं ‘कल्याणरावां’चं विमानही.

आता तुम्हाला वाटेल की, ‘थोरल्या काकां’ना गुपचुप भेटणारे ‘कल्याणराव’ भविष्यात राजकीय उलथापालथ घडवतील की काय? पण ते लय हुश्शाऽऽर. ‘रणजितदादा अकलूजकरां’पासून ‘देवेंद्रपंत नागपूरकरां’पर्यंत सा-यांना सांगूनच ते ‘बारामती’च्या ‘काका-दादां’ना भेटत राहिलेले. चंद्रभागेच्या वळणासारखं वळत राहिलेले.. लगाव बत्ती...

राजकारणात विरोध ..कारखान्यात एकी !

  सध्या जिल्ह्यातल्या कैक राजकारण्यांची अवस्था उसाच्या चिपाडासारखी झालीय. ऊस लयऽऽ ग्वाड; पण आतमंदी रसच नाय. कारखाना लयऽऽ मोठा; पण चालवायला पैका नाय. त्यामुळे मेटाकुटीला आलेले नेते सत्ताधा-यांच्या वळचणीला जाऊ लागलेले. ‘बारामती’चा रस्ता पाठ करू लागलेले. करमाळ्यातल्या ‘बागलांचे प्रिन्स’ आवर्जून ‘थोरल्या काकां’ना भेटू लागलेले. आता म्हणे ‘आदिनाथ’ चालविण्यासाठी ‘बारामतीकरां’नी पुढाकार घेतलाय. मात्र ‘बागलांचं देणं’ किती याचा हिशोब करता-करता ‘गुळवें’ची टीम पुरती थकून गेलीय.
 

बार्शीतही ‘आर्यन’ घेण्यासाठी ‘अजितदादा’ उत्सुक असल्याच्या चर्चेनं विरोधकांच्या भुवया उंचावल्यात. अनेकांना हे खरं वाटत नाही. मात्र ‘सर्वपक्षीय दिलीपराव’ राजकारणात काहीही करू शकतात, यावर त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. फक्त पार्टी-बिर्टी बदलण्याचा निर्णय आणखी चार वर्षांनंतरच; कारण त्यांचं नवं चिन्ह म्हणे ऐन इलेक्शनपूर्वी ठरतं !
  इकडं अक्कलकोटचे ‘सिद्रामप्पा’ही मुंबईत तळ ठोकून. ‘सुभाषबापूं’नी त्यांच्या कारखान्याचं काढलेलं ‘लिक्विडेशन’ कॅन्सल करण्यासाठी ते ‘अजितदादां’सोबत मिटिंगमध्ये दंग. ही सारी गुपितं वाचताना ‘लगाव बत्ती’चा वाचक होऊन जातो गुंग... कारण व्यासपीठावर एकमेकांना ‘चॅलेंज’ देणारे नेते स्वत:चा ‘व्यवसाय’ चालविण्यासाठी झटकन् बदलत असतात रंग. आलं का लक्षात? लगाव बत्ती...

जाता-जाता
‘थोरल्या काकां’सोबत ‘संजयमामा’ का नव्हते ?

‘थोरले काका’ जिल्ह्याच्या दौ-यावर असताना माढा-करमाळ्याचे ‘संजयमामा’ मात्र मुंबईत ‘अजितदादां’सोबत चर्चेत रमलेले. विषय काय होता माहिताय का तुम्हाला? जिल्ह्याचा नवा एसपी कोण असावा ! दुसरीकडं ‘अनगरकर’ही या दौ-यापासून दूर राहिलेले. त्यांच्या अनुपस्थितीची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये रंगली असली तरी ‘सध्याच्या काळात जास्त गर्दी नको. त्यामुळं मी आलं नाही तरी चालेल नां?’ असं ‘थोरल्या काकां’ना विचारूनच ‘थोरल्या पाटलां’नी ‘अनगर’मध्ये विश्रांती घेतलेली. आता त्यांना ‘कोरोनाची लागण’ची जास्त भीती होती की, ‘उमेश नरखेडकरां’ची पक्षाला लागलेली लागण, याची जास्त चीड होती, हे दोन्ही ‘छोट्या पाटलां’नाच माहीत. लगाव बत्ती...

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Homecoming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app