स्फोेटानंतर हिरोशिमा!
By Admin | Updated: August 2, 2015 04:53 IST2015-08-02T04:53:32+5:302015-08-02T04:53:32+5:30
स्फोेटानंतर हिरोशिमा! अणुबॉम्बचे परिणाम जगासाठी धक्का देणारे होते. आपल्या हातात आलेले अस्त्र केवळ युद्धातील एक अस्त्र नसून ते विनाशक असल्याची उपरती सर्वांना झाली.

स्फोेटानंतर हिरोशिमा!
- ओंकार करंबेळकर
स्फोेटानंतर हिरोशिमा! अणुबॉम्बचे परिणाम जगासाठी धक्का देणारे होते. आपल्या हातात आलेले अस्त्र केवळ युद्धातील एक अस्त्र नसून ते विनाशक असल्याची उपरती सर्वांना झाली. अणुबॉम्बच्या या परिणामांचा अनुभव घेऊनही अण्वस्त्रे तयार करण्याला व त्यातून तयार झालेल्या स्पर्धेला जग टाळू शकले नाही. अण्वस्त्राच्या वापरानंतर महायुद्ध थांबले पण त्याच्यानंतर शीतयुद्धाचा त्रासदायक काळ सुरू झाला. त्यातच क्युबा प्रकरण आणि व्हिएतनाम युद्धामुळे जग अशांतच राहिले. मध्यपूर्वेत इस्रायलच्या निर्मितीपासून झालेला तणाव आजही कायम आहे. रवांडा, सेब्रेनिका वंशच्छेद किंवा कुर्दांवर झालेल्या हल्ल्यांमधून आपण ज्यूंवर झालेल्या हल्ल्यांमधूनदेखील काहीच शिकलो नाही असा अर्थ निघतो. थोडक्यात, दुसऱ्या महायुद्धात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती आजही तुकड्या-तुकड्यांमध्ये होतच आहे. मात्र हिरोशिमाने बदलण्याचे ठरविले. अणुबॉम्ब आणि वादळामुळे शहरातील पायाभूत सुविधा पूर्णत: कोलमडल्या होत्या. त्या दुरुस्त करणे किंवा नव्याने निर्माण करणे हे प्राथमिक उद्दिष्ट्य होते. त्यासाठी १९४९ साली हिरोशिमा पीस मेमोरियल सिटी कन्स्ट्रक्शन कायद्याची निर्मिती करण्यात आली; त्याचप्रमाणे हिरोशिमा शांततेचे शहर (सिटी आॅफ पीस) असा दर्जा देण्यात आला आणि शहराच्या महापौरांना मेयर आॅफ पीस म्हटले जाऊ लागले. जे शहर विनाशकारी बॉम्बमुळे बेचिराख झाले ते जगभरामध्ये शांतता पसरविण्यासाठी प्रेरक केंद्र व्हावे यासाठी जपानने व जगाने प्रयत्न सुरू केले. शहरातील रस्ते, त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली. नागासाकी आणि हिरोशिमा यांनी एकत्र येऊन विकासाचे प्रयत्न केले; त्याची प्रेरणा जगातील अनेक शहरांना मिळाली. हिरोशिमाने जपानची सीमा ओलांडून शहर विकासासाठी संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेत होनोलूलू, रशियातील व्होल्गाग्राड, जर्मनीमध्ये हॅनोव्हर व कॅनडामध्ये माँट्रिआल शहरांना हिरोशिमाने भगिनी शहर केले आहे. कदाचित ही प्रगती पाहून अण्वस्त्रनिर्मितीच्या स्पर्धेला लगाम लागेल, त्यासाठी बेचिराख झालेल्या शहरांची माहिती आपण घ्यायलाच हवी.
ज्या शहरांमध्ये रशियाने अणुचाचण्या व प्रयोगशाळा उभ्या केल्या होत्या त्या कझाखस्तानसारख्या देशांमधील जागांची स्थिती आज अत्यंत भयानक म्हणावी लागेल इतकी वाईट आहे. कित्येक पिढ्यांना आजही जनुकीय आजारांना सामोरे जावे लागत आहे. अत्यंत शांतपणे मृत्यू अशा पिढ्यांना जवळ करतो आणि न केलेल्या पापांना ही मुले सामोरे जात आहेत. हिरोशिमा आणि नागासाकीतून आपण सर्व धडा घेऊ हीच अपेक्षा.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)