राजेंद्र दर्डा(‘एडिटर इन चीफ’ लोकमत वृत्तपत्र समूह) सत्तेचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने समजणारा माणूस म्हणजे बॅ. ए. आर. अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगाने निर्णय घेणारा एक तडफदार मुख्यमंत्री आणि एक दर्यादिल माणूस आपल्यातून निघून गेला आहे. निराधारांच्या मदतीसाठी सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना, साठ वर्षांवरील गरीब व्यक्तींना पेन्शन योजना, राज्यात हुतात्मा स्मारके उभी करणे असे अनेक निर्णय त्यांनी धडाधड घेतले. पोलिसांसाठी फुल पँट आणण्याचा निर्णयही अंतुलेंनीच घेतला होता. मुख्यमंत्रिपदाच्या अत्यंत कमी कालावधीत त्यांनी घेतलेले निर्णय राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवून गेले. मराठवाड्याच्या दृष्टीने तर त्यांनी भरीव कामगिरी केली. १९८२ हे साल औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या दृष्टीने विकासाचे एक सोनेरी पानच ठरले. ९ जानेवारी १९८२ साली औरंगाबादला ‘दैनिक लोकमत’चा शुभारंभ झाला तो बॅ. अंतुले यांच्या हस्तेच. ही गोष्ट आताच्या फार थोड्या लोकांना माहीत असेल. त्या वेळी मराठवाड्यातील नेते शंकरराव चव्हाण यांच्यासह शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील-चाकूरकर, स्वातंत्र्यसेनानी, लोकमतचे संस्थापक आणि तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा हेही आवर्जून उपस्थित होते. याच काळात औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ अंतुले यांच्यामुळे मिळाले. आज खंडपीठामुळे औरंगाबादचे वाढलेले महत्त्व आणि कोल्हापूर आणि पुण्याची खंडपीठासाठी चाललेली लढाई पाहता, त्यांनी घेतलेला औरंगाबादला खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय किती महत्त्वपूर्ण होता, हे लक्षात येईल. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचे विभाजन करून त्यांनी जालना आणि लातूर या जिल्ह्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. बजाजसारखी मोठी कंपनीही औरंगाबादेत आली. त्यांचा मला जवळचा सहवास लाभला. १९९९ साली आम्ही दोघे निवडणूक एकत्रितपणे लढलो. त्यांनी औरंगाबाद लोकसभा लढविली, तर मी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून लढलो. मला आठवते की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला १५ आॅगस्ट १९९९ रोजी दिल्लीत बोलावून ‘मि. दर्डा, यू हॅव टू कॉन्टेस्ट औरंगाबाद असेंब्ली सीट अॅण्ड युवर को-पार्टनर इज मिस्टर अंतुले फॉर औरंगाबाद लोकसभा सीट’ असे सांगितले. मी परत औरंगाबादला आलो. घरच्यांशी चर्चा केली. सर्वांचे मत पडले, की निवडणूक लढवू नये. त्यामुळे १८ आॅगस्टला मी माझा नकार कळविला. पक्षाचे नेते माधवराव शिंदे यांना तसा फॅक्सही केला. १९ आॅगस्ट १९९९ रोजी अंतुले औरंगाबादेत आले. त्यांचा मुक्काम विंडसर कॅसल हॉटेलमध्ये होता. माझा नकार त्यांना कळला होताच. ते स्वत: मला भेटायला प्रेसिडेंट पार्क हॉटेलमध्ये आले. ते माझ्या मातोश्रींशीही बोलले. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविली पाहिजे, असा आग्रहच त्यांनी धरला. शेवटी मी होकार दिला. तोपर्यंत पक्षाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला औरंगाबाद पश्चिमची जागा दिली होती. त्यांचे राम पेरकर हे उमेदवारही जाहीर झाले होते. अंतुलेंनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतुले, मी आणि राम पेरकर असे आम्ही तिघे जण क्रांती चौकातून एकाच वाहनातून रॅलीने निघालो. रॅली गुलमंडीवर असतानाच माझा एबी फॉर्म आला. मी आणि अंतुलेंनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरताना डॉ. रफिक झकेरियाही सोबत होते. पेरकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तीन आठवडे आम्ही एकत्र प्रचार केला. मी निवडून आलो. अंतुलेंना औरंगाबाद शहरातून ४१ हजारांची आघाडी मिळाली, तरीही दुर्दैवाने त्यांना इतर विधानसभा मतदारसंघांत कमी मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. मला आमदारकी त्यांच्यामुळेच मिळाली. माझे वडील स्व. जवाहरलाल दर्डा त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांचे अंतुलेंशी घनिष्ठ संबंध राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात भरीव आणि ठोस कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक लागतो. कमी कालावधीत ते प्रत्येकाच्या मनात घर करून गेले. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जबरदस्त होता. त्यांचे इंग्रजीबरोबरच मराठी भाषेवरही प्रभुत्व होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेतही ते सहजतेने मिसळत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रभावी होते. त्यांनी जातपात कधी मानली नाही. सर्वधर्मसमभाव हाच त्यांच्या राजकारणाचा पाया होता. मंत्रालयात प्रवेश करताच लॉबीत शिवाजी महाराजांचे जे भव्य तैलचित्र दिसते, ते त्यांनीच लावले. त्यांचा आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवराव सोळंकी हे त्या काळात इंदिरा गांधी यांच्या अगदी जवळ होते. मसुदा किंवा पत्र तयार करण्यामध्ये हे दोघेही अत्यंत निष्णात समजले जात. आज राजकीय क्षेत्रात जातीधर्माबद्दल जास्तच कुतूहल निर्माण झाले असताना त्यांच्यासारख्या सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची महती उजळून निघते. ते हिमतीने निर्णय घेत असत. निर्णय घेताना परिणामांना घाबरत नसत. त्याचवेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व दर्यादिल होते!
दर्यादिल नेता!
By admin | Updated: December 3, 2014 11:10 IST