‘हलाहल’ लालू!

By admin | Published: June 10, 2015 12:33 AM2015-06-10T00:33:13+5:302015-06-10T00:33:13+5:30

हलाहल प्राशन करुन साऱ्यांनाच जीवदान देणाऱ्या आणि आपल्या कंठात ते विष साचवून ठेवणाऱ्या ‘नीलकंठ’ उर्फ हलाहल शंकराने आता नवा अवतार धारण केला असावा असे दिसते.

'Halaahal' lalu! | ‘हलाहल’ लालू!

‘हलाहल’ लालू!

Next


समुद्रमंथनातूनबाहेर पडलेले हलाहल प्राशन करुन साऱ्यांनाच जीवदान देणाऱ्या आणि आपल्या कंठात ते विष साचवून ठेवणाऱ्या ‘नीलकंठ’ उर्फ हलाहल शंकराने आता नवा अवतार धारण केला असावा असे दिसते. या नव्या अवतारातील त्याचे नाव अर्थातच लालूप्रसाद यादव! बिहारात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जातीयवादी पक्षाची म्हणजेच भाजपाची डाळ शिजू न देण्यासाठी आपण वाट्टेल ते विष प्राशन करायला तयार आहोत, हे त्यांचे उद्गारच त्यांच्या या नव्या अवताराची ग्वाही देणारे आहेत. अर्थात त्यांनी हे साहस तसे सुखासुखी वा स्वयंप्रेरणेने करण्याचे मनावर घेतलेले नाही. खरे तर भाजपाला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत डोके वर काढूच द्यायचे नाही, हा वज्रनिर्धार ज्या जनता परिवाराने फार पूर्वीच केला होता, त्यातील एक वज्र स्वत: लालूच होते. पण जनता परिवाराच्या वतीने म्हणजेच मुलायमसिंहांची सपा, नितीश-शरद यादव यांचा संयुक्त जनता दल आणि खुद्द लालूंचा राजद यांच्या एकत्रित प्रयत्नांनी बिहारात जे यश मिळू शकेल असे या साऱ्यांना वाटते, त्या यशानंतर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, अशी लालूंची अटकळ असावी. पण या अटकळीला पहिला विरोध झाला तो नितीशकुमार यांच्या छावणीतून. लालू आणि नितीश या दोहोंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा विचार करता, नितीश यांची कारकीर्द केव्हांही सरसच ठरावी. त्यातून ते बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री. त्यामुळे त्यांनाच भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर न्यावे, यावर बहुतेकांचे बऱ्यापैकी एकमत. लालूंना ते मान्य झाले नाही. त्यांनी फाटे फोडायला सुरुवात केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणे, त्यांच्या दृष्टीने बहुधा कमीपणाचे असावे. पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सौम्य शब्दात केलेली कानउघाडणी आणि अध्यक्ष सोनिया गांधी यांचा त्यास असलेला पाठिंबा बघून लालूंचे डोळे उघडले गेले असावेत. त्यातूनच मग त्यांनी नितीश यांच्या नेतृत्वास स्वीकृती दिली, असे दिसते. पण तिचे वर्णन त्यांनी विष प्राशनाशी करावे, हेच पुरेसे बोलके आहे. अर्थात आत्ताशी निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची आणि पर्यायाने जीत झाली तर मुख्यमंत्री कोणाला करायचे, यावर एकमत झाले आहे. ते होताना, ‘आगे का आगे सोचेंगे’ असा विचार नसेलच असे नाही. पण तरीही नेतृत्वाचा तिढा सोपा म्हणावा लागेल असे तिढे या पुढील काळात जागा वाटपावरुन निर्माण होऊ शकतात. परिवाराची खरी कसोटी तिथे लागणार आहे. नितीश यांना जास्तीच्या जागा देण्याचे हलाहल लालू कितपत पचवितात यावरच जनता परिवाराचे आणि संघ परिवाराचेही त्या राज्यातील भवितव्य अवलंबून राहील.

---------

चेन ना खिंचो
धावू लागलेली रेल्वे थांबविण्यासाठी वर्षानुवर्षांपासून उपलब्ध असलेली ‘पूल दि चेन, टू स्टॉप दि ट्रेन’ ही खास सोय आता इतिहासजमा होणार आहे. रेल्वे मंडळाने तसा निर्णयच घेतला असून या निर्णयानुसार रेल्वेच्या नव्या डब्यांच्या संरचनेत तर या सोयीला वजा केलेच गेले आहे पण अस्तित्वातील डब्यांमधली ही सोय निकामी करण्याचे कामदेखील सुरु केले गेले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत रेल्वे थांबविण्यासाठी पूर्वी तशी कोणतीही सोय नव्हती. रेल्वेचे सारे डबे स्वतंत्र आणि कर्मचाऱ्यांची संख्यादेखील तोकडी. परिणामी, प्रत्येक डब्यामध्ये धावती रेल्वे थांबविता यावी म्हणून एका साखळीची सोय केली गेली. ती ओढल्यानंतर रेल्वेचा चालक आणि रक्षक (गार्ड) या दोहोंना इशारा मिळे व गाडी थांबविली जाई. अकारण साखळी खेचणाऱ्यांना दंड आणि तुरुंगवास करण्याची तरतूदही केली गेली. पण साखळी ओढणे म्हणजे आपल्याला हवे तिथे गाडी थांबविण्याचा जणू परवाना अशी समजूत बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आदि राज्यांमधील प्रवाशांनी करुन घेतली. अर्थात त्याचा पाया पुन्हा गुंडगिरीचाच. एकीकडे ही गुंडगिरी आणि दुसरीकडे क्षुल्लक कारणांसाठीही साखळी खेचण्याचे प्रकार. त्यातून रेल्वेचे वेळापत्रक वारंवार मोडून पडू लागले. प्रवाशांनी इतर प्रवाशांचा आणि रेल्वेचाही खोळंबा करु नये म्हणून रेल्वे प्रशासनाने जनजागृतीच्या अनेक मोहिमा चालविल्या. पण स्थितीत काही फरक पडला नाही. सबब आता ही साखळी पद्धतच मोडून टाकली जाणार आहे. अर्थात दरम्यानच्या काळात संदेशवहनाची अत्याधुनिक आणि कार्यक्षम साधने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक डब्यात चालक आणि रक्षक यांचे मोबाईल क्रमांक ठळकपणे दिले जाणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक डब्यासाठी कर्मचारी तैनात केलेला असेल अशा कर्मचाऱ्यांकडे बिनतारी संदेशवहन यंत्रणा हजर असेल. त्यामुळे जेव्हां खरोखरीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली असेल, तेव्हां धावती गाडी थांबविण्याची गरज निर्माण झाली, तर ती थांबविता येईल. आपले गाव आले, आपले शेत आले तर राष्ट्रीय संपत्ती म्हणजे आपलीच संपत्ती या ‘आपुलकी’एएच्या भावनेने वागणाऱ्या आणि या संपत्तीला आपल्या अक्षरश: बोटावर थांबविणाऱ्या लोकांची कमालीची गैरसोय होईल, पण त्याला इलाज नाही.

Web Title: 'Halaahal' lalu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.