महानता कधीकधी अनुवंशिक असते

By Admin | Updated: April 16, 2015 23:39 IST2015-04-16T23:39:26+5:302015-04-16T23:39:26+5:30

काही महिन्यांपूर्वी मी कोलकाता येथे असताना लईक फतेहअली या लेखिका आणि समीक्षिकेच्या मृत्यूची बातमी वाचनात आली.

Greatness is sometimes genetic | महानता कधीकधी अनुवंशिक असते

महानता कधीकधी अनुवंशिक असते

काही महिन्यांपूर्वी मी कोलकाता येथे असताना लईक फतेहअली या लेखिका आणि समीक्षिकेच्या मृत्यूची बातमी वाचनात आली. मी तिचा प्रशंसक होतो. मी ज्या मित्रासोबत होतो, त्यांनी तिचे नावही ऐकले नव्हते. तेव्हा लईकच्या लेखनाबद्दल मी माझ्या मित्राला माहिती दिली (त्या ‘क्वेस्ट’ नावाच्या साहित्य पत्रिकेच्या संपादक होत्या आणि अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली होती.) त्या मोठ्या कुटुंबातून आलेल्या होत्या. ‘लईक या तय्यबजी होत्या’ असे मी माझ्या मित्राला सांगितले. त्यांची ओळख ‘पश्चिम भारताच्या टागोर’ अशी होती. म्हणजे त्या अशा कुटुंबातून आल्या होत्या, ज्या कुटुंबातील स्त्री आणि पुरुष हे कलेत तसेच सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध होते.
मी हे सांगत असताना मित्राच्या चेहऱ्यावर अविश्वासाची भावना पसरली होती. पण मी माझा मुद्दा स्पष्ट करीत उदाहरणादाखल काही नावे सांगितली. पहिले मोठे तय्यबजी होते बद्रुुद्दीन. ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तसेच सुरुवातीच्या काळात ते काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांच्या वंशातले ए.ए. फैजी हे टेनिसपटू तसेच विधिज्ञ होते. (इस्लामी कायद्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत). दुसरे होते सैफुद्दीन तय्यबजी जे राजकारणी तसेच समाजसुधारक होते. त्यानंतर पुरातत्ववेत्ते जाफर फतेहअली आणि नामवंत भारतीय मुत्सद्दी तसेच लेखक बद्रुद्दीन तय्यबजी, ज्युनियर हे होते.
माझी मित्र लईक फतेहअली ही बद्रुद्दीन तय्यबजीचे मोठे भाऊ शम्सुद्दीन तय्यबजी यांची वंशज होती. शम्सुद्दीन यांना एकच मुलगा होता अब्बास तय्यबजी. ते बडोदा संस्थानात मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी पुढे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. मिठाच्या सत्याग्रहात महात्मा गांधींना अटक झाल्यावर त्या सत्याग्रहाचे नेतृत्व अब्बास तय्यबजी यांनी केले होते. अब्बास यांचे पुतणे पक्षितज्ज्ञ सलीम अली हे होते. ते शम्सुद्दीन यांचे नातू होते तसेच भारतीय पक्ष्यांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली

होती. पक्षितज्ज्ञ म्हणून जगभर त्यांचा लौकिक होता.
तय्यबजी यांच्या कुटुंबातील स्त्रियासुद्धा नावलौकिक मिळालेल्या होत्या. सलीम तय्यबजी या पश्चिम भारतातील मुस्लीम स्त्रियांपैकी पहिल्यांदा बुरखा टाकून दिलेल्या महिला कशा आहेत यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्या पहिल्यांदा भारताबाहेर गेल्या होत्या आणि शाळा, कॉलेजात शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. या अनुभवांबद्दल त्यांनी खूप लेखन केले होते. त्यांच्या पुढील पिढ्यातील लोकांनी आपल्या वंशाचे नाव उज्ज्वल ठेवले होते. अब्बास तय्यब अलींच्या मुलींपैकी शरीफा हमिद अली या महिलांच्या हक्कांबाबत जागरूक होत्या. दुसऱ्या रैहाना तय्यबजी या मीराबाईची भजने गात.
कोलकातातील तय्यबजी यांच्याबद्दल सांगताना त्यांची पार्श्वभूमी कशी आहे हे मी माझ्या मित्राला सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर तिटकारा स्पष्ट दिसत होता. पण त्यानंतर मला तय्यबजी यांच्या कुटुंबाची टागोर कुटुंबाशी मी जी तुलना केली होती, त्याच्या सत्यतेचे पुरावे मिळाले. महात्मा गांधींच्या पुस्तकांचे वाचन करताना मला त्यात गांधींनी १७ एप्रिल १९२० रोजी अब्बास तय्यबजी यांना लिहिलेले पत्र मिळाले. गांधींनी लिहिले होते, ‘टागोर आणि तय्यबजी ही भारतातील दुर्मीळ कुटुंबे होती.’
अर्थात टागोर कुटुंबीयांचे योगदान प्रचंड आहे आणि तशीच त्यांची ओळखही आहे. टागोर कुटुंबातील सर्वात प्रसिद्ध होते रवीन्द्रनाथ. ते कवी, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, संस्थांचे निर्माते तसेच नोबेल पुरस्कार विजेते होते. त्यांचा गांधी, नेहरूंवर मोठा प्रभाव पडला होता. रवीन्द्रनाथ हे महानच होते. पूर्वसूरींच्या खांद्यावर ते उभे होते. त्यांच्या कमाईवर आणि कर्तृत्वावरच त्यांच्या वंशजांची कलात्मकता उभी झाली होती. रवीन्द्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ हे प्रगतिशील सुधारक तसेच संपादक होते. रवीन्द्रनाथांचा वारसा संगीत दिग्दर्शक द्विजेन्द्रनाथ, अभिनेते व अनुवादक ज्योतिन्द्रनाथ, गायिका स्वर्णकुमारी आणि पहिले भारतीय आय.सी.एस. सत्येन्द्रनाथ या त्यांच्या मुलांनी पुढे नेला आहे.
त्यांची नंतरची पिढीदेखील गुणवत्तेत सरस होती. रवीन्द्रनाथांचे पुतणे अवनीन्द्रनाथ आणि गगनेन्द्रनाथ हे चित्रकार होते. त्यांची भाची सरलादेवी गायिका होती. तिने गांधींना इतके भारावून टाकले होते की तिला स्वत:ची आध्यात्मिक पत्नी करण्याचा त्यांनी विचार केला होता !
टागोर आणि तय्यबजी या कुटुंबांपैकी महान कोण? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मला तितक्याच लौकिकवान असलेल्या तिसऱ्या कुटुंबाची ओळख करून द्यायची आहे. हे तिसरे कुटुंब आहे अहमदाबादच्या साराभाई यांचे. त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत अंबालाल. ते कापड गिरणीचे मालक तसेच उदार होते. महात्मा गांधींचे ते खंदे समर्थक होते. महात्मा गांधींनी आपल्या आश्रमात एका अस्पृश्य मुलाला आसरा दिला म्हणून त्यांच्या देणगीदारांनी जेव्हा हात आखडता घेतला तेव्हा अंबालाल हे त्यांच्या मदतीला धावून आले होते.
अंबालाल यांची बहीण अनसूया ही गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होती. तिने गिरणी कामगारांच्या मुलांसाठी शाळा चालविली होती. १९१८ मध्ये तिने गिरणी कामगारांना योग्य वेतन मिळावे यासाठी संप पुकारला होता. त्या आपल्या भावाचा विरोध करीत होत्या. कारण अंबालालजी गिरणीमालकांचे प्रतिनिधित्व करीत होते. अनसूया यांनी लग्न केले नव्हते. पण सामाजिक प्रथांना उल्लंघून त्या शंकरलाल बँकर यांच्यासोबत लिव्ह-इन नात्यात राहात होत्या. शंकरलाल हे मजूर नेते तसेच गांधींचे अनुयायी होते.
अंबालाल साराभाई यांना सात अपत्ये होती. त्यापैकी चार जण खूपच असामान्य होते. ते होते अहमदाबाद येथे आय.आय. मॅनेजमेंटची संस्था स्थापन करणारे तसेच इस्रोचे जनक, विक्रम साराभाई, काश्मिरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या मृदुला साराभाई, नॅशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करणारे गौतम साराभाई आणि कॅलिको टेक्स्टाईल म्युझियमची निर्माती गिरा साराभाई.
गांधींना संधी मिळाली असती तर त्यांनी टागोर आणि तय्यबजी यांच्या रांगेत साराभाई यांनाही बसवले असते. ही तीन कुटुंबे दुर्मिळातील दुर्मीळ होती. त्यांच्यात बऱ्याच गोष्टी समान होत्या. सामाजिक सीमारेषा उल्लंघन करण्याची त्यांच्यात क्षमता होती. त्यांच्यात निर्मितीक्षमता होती. त्यांच्या कुटुंबातील महिला या स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. या एका लेखात त्यांच्यातील गुणांचे आणि क्षमतेचे वर्णन करणे अशक्य आहे.

रामचन्द्र गुहा
(विख्यात इतिहासकार)

Web Title: Greatness is sometimes genetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.