-डॉ. व्यंकटराव घोरपडेचीज तसा जगातील सर्वांत जुना पदार्थ. साधारण आठ हजार वर्षांपूर्वी इराकमध्ये याचा शोध लागला. हा शोधसुद्धा योगायोगानेच लागला. इराकमधील काही आदिवासी जमाती अतिरिक्त दूध साठविण्यासाठी पखालीचा (कातडी पिशवी) उपयोग करत. तेथील उष्ण हवामान व प्रवासातील हालचालींमुळे दुधाचे दह्यात रूपांतर होऊन त्यावरील निवळी ज्याला व्हे म्हणतात, ती तहान भागविण्यासाठी वापरत व शिल्लक दही प्रक्रियेने व मीठ वापरून उच्चतम प्रतीच्या प्रथिनांचा स्रोत म्हणून आहारात वापर करू लागले, तेच चीज म्हणून जगभर आहारात असते. यात मोठ्या प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम यासारखी खनिज द्रव्ये व जीवनसत्त्वे आहेत.चीज उत्पादनात अमेरिका, जर्मनी व फ्रान्स आघाडीवर आहेत. तेथे दैनंदिन आहारात चीज मोठ्या प्रमाणात वापरले जाते. उत्पादन व वापर यांचा विचार करून हे देश पुढील काळात आशिया खंडातील विकसनशील देशात चीज विक्रीसाठी प्रयत्नशील राहतील, असे एका अहवालातून स्पष्ट होत आहे. आपण दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलो, तरी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, उत्पादन व निर्यात यात खूप मागे आहोत. त्यात प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. वर उल्लेख केलेले देश एकूण दूध उत्पादनाच्या ४० टक्के दूध चीज उत्पादनासाठी वापरतात व हजारो प्रकारच्या चवीचे, आकाराचे व स्वादाचे चीज उत्पादित करून जगभर विकतात. खूप वर्षांची परंपरा लाभल्यामुळे त्या त्या कालखंडात लोकांच्या आवडीनिवडीनुसार त्यात बदल होत गेले. नैसर्गिक, कोरडे, प्रक्रियायुक्त व कमी चरबीयुक्त उत्पादन हे जगामध्ये वापरले जाते. स्वयंपाक किंवा अल्पोपाहारात त्याचा वापर केला जातो. ड्रायचीज हे बेकरी उत्पादने, पास्ता, बिस्किटे, तयार जेवण यात वापरता येते. देशाचा विचार केला तर केवळ ०.२ किलो प्रतिवर्ष आपण आहारामध्ये चीज खातो. त्याचे जगामध्ये प्रमाण सरासरी ७ ते ८ किलो प्रतिवर्ष असे आहे.देशांतर्गत शहरी भागात ब्रेडबरोबर चीज खाल्ले जाते; पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या शहरांपुरते डोसा, पावभाजी, पराठे यात मर्यादित स्वरूपात चीज वापरले जाते. प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज व विशिष्ट चवीचे चीज आपल्याकडे वापरले जाते. १९७०च्या दशकात ‘अमूल’ने चीज उत्पादन सुरू केले व १९९०च्या सुमारास त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. आज सुपर मार्केटसह छोट्या शहरांतील दुकानांतून चीज क्यूब, ब्लॉक्स, लिक्विड व चौकोनी तुकड्यात मिळते.
अतिरिक्त दुधापासून चीजनिर्मिती उत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:32 IST