ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी! मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली

By विजय दर्डा | Published: September 27, 2021 08:55 PM2021-09-27T20:55:38+5:302021-09-27T20:56:25+5:30

मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली, पाकच्या नाकालाही मिरच्या झोंबल्या. -  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह) ...

Great opportunity for India! Modi's US tour and quad increased China's uneasiness | ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी! मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली

ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी! मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली

Next

मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली, पाकच्या नाकालाही मिरच्या झोंबल्या.

-  विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीची दृश्ये तुम्ही टीव्हीवर पाहिली असतील तर मोदींची देहबोली ठळकपणे उठून दिसली असेल, हे नक्की! त्यांची नेमकी वक्तव्ये आणि त्यासाठी त्यांनी वापरलेल्या भाषेचीही नोंद तुम्ही घेतली असेल. जगातील सर्वात जुन्या आणि सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे नेते समोरासमोर बसले आहेत आणि बरोबरीच्या स्तरावर चर्चा चालली आहे, असेच एकूण दृश्य होते.
खरं तर वास्तव काय आहे हे बायडेन जाणून आहेत आणि मोदींनाही हे पक्के ठाऊक आहे की आव्हाने पुष्कळ असली तरी आपल्याला ही मोठी संधी आहे. राजकीय व्यूहरचनेची पावले योग्य दिशेने पडली तर हवा भारतासाठी अनुकूल दिशेने वाहू लागेल. जागतिक राजकारण ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट असते. दिसते ते असत नाही आणि असते ते दिसत नाही. दोन्ही नेते एकमेकांची प्रशंसा करत होते. मात्र दोघांच्याही मनात वेगळेच विषय घोळत असणार, हे नक्की! भारताच्या दृष्टीने सध्या अफगाणिस्तान चिंतेचा विषय आहे. कारण तिथे पाकिस्तानने आपला खेळ सुरु केला आहे आणि चीनही तयारच बसला आहे. अफगाणिस्तानातील संधी पाकिस्तान भारताविरुद्ध पथ्यावर पाडून घेईलच हे आपण जाणतो. ते रोखण्यासाठी अमेरिकेने आपले वजन वापरावे, अशी भारताची इच्छा आहे. (Great opportunity for India! Modi's US tour and quad increased China's uneasiness)

दुसरीकडे सध्या चीन आणि इराण या दोन्ही देशांनी अमेरिकेची डोकेदुखी वाढवली आहे. चीन अमेरिकी वर्चस्वाला आव्हान देत आहे. इराणनेही डोळे वटारणे सुरु केले आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून निघाली, तेव्हा इराणवर अफगाणिस्तानची नजर राहील, असा सौदा झाला होता, असे सांगतात. अर्थात गेली सत्तर वर्षे पाकिस्तानचे पालन पोषण करणाऱ्या अमेरिकेला हे माहीत आहे की अखेरीस चीनविरुद्ध भारतच उपयोगी पडेल. भारत हा मोठा देश आहे, मोठी बाजारपेठ नि मोठी ताकदही आहे. पाकिस्तान पूर्णपणे चीनच्या मांडीवर जाऊन बसलाय, हे अमेरिका पुरती जाणून आहे.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अब्जावधी डॉलर्स खाऊनही पाकने दहशतवादच माजवला, हेही अमेरिकेचे दुखणे आहेच! ओसामा बिन लादेनला पाकिस्ताननेच आसरा दिला होता. महत्त्वाचा मुद्दा हा की, या घडीला अमेरिकेला भारताची आत्यंतिक गरज आहे. जगातल्या या सर्वात मोठ्या बाजारपेठेला अधिक ताकद दिली तर चिनी बाजाराला शह देणे अमेरिकेसाठी अवघड नाही. बहुतेक अमेरिकी कंपन्या सध्या चीनमध्ये आहेत, त्या भारताकडे वळल्या तर चीनच्या आर्थिक साम्राज्यवादाला रोखणे शक्य होईल. दुसरा कुठलाही देश हे करू शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्याला अमेरिकेची गरज आहे हे भारतही जाणतो. पण सध्याची एकूण परिस्थिती ताकही फुंकून पिण्याची असल्याने दोन्ही देश भविष्याबद्दल स्पष्ट काही बोलायला कचरताना दिसतात.

इथे एक प्रश्न येतो :  भारताला अमेरिकेची जास्त गरज आहे की अमेरिकेला भारताची? माझ्या दृष्टीने दोघांना एकमेकांची गरज आहे, पण जास्त गरज अमेरिकेला आहे. कारण त्या देशाच्या सत्तेला आव्हान दिले जात आहे. बायडेन यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. अफगाणिस्तानातून अचानक बाहेर पडल्याने अमेरिकेवर जगाचा भरवसा राहिला नाही. ही गेलेली इज्जत भरून यायला बराच वेळ लागेल. त्यामुळेच भारतातही हा प्रश्न आता विचारला जातोय की, अमेरिकेवर किती विश्वास ठेवणार? आणि अमेरिकेशी दोस्ती करून रशियाला का दुखवायचे?

- मला वाटते रशिया आपला जुना भरवशाचा मित्र आहे. त्यालाही सांभाळले पाहिजे. प्राप्त परिस्थितीत भारताने कोणाचेही अंकित होणे  योग्य होणार नाही. अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या चौमुखी संवादाचा विषय असेल तर  त्यातून  चीनच्या साम्राज्यवादाला अडविण्यात नक्की मदत होईल. सैन्य तांत्रिकी क्षेत्रात आपल्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. चीनशी सामना करायचा तर तंत्रज्ञानात आपल्याला मदत लागेल. भारतीय कूटनीती या दिशेने योग्य पावले टाकत आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, आर्थिक बाबतीत आपण जितके सक्षम होऊ; युद्ध मैदान तितके दूर जाईल. ज्याच्याकडे धन, ज्ञान आणि विज्ञान आहे, त्यालाच जगात सध्या विचारले जाते.

आपले पंतप्रधान या गोष्टी उत्तमप्रकारे जाणतात. हे लक्षात ठेवूनच त्यांनी अमेरिकेतील पाच मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना भारताकडे आकर्षित करण्याचा हेतू त्यामागे होता. ‘अडोबे’चे शंतनू नारायणन, ‘जनरल ॲटोमिक्स’चे विवेक लाल, ‘क्वालकोम’चे क्रिस्तियानो अमोन, ‘फर्स्ट सोलार’चे मार्क विद्मान आणि ‘ब्लॅक स्टोन’चे स्टीफन श्वार्जमन यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा झाली. पैकी शंतनू आणि विवेक हे मूळचे भारतीय आहेत.

अडोबे ही माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातली मोठी कंपनी आहे. जनरल ॲटोमिक्स सैन्यासाठी लागणारे ड्रोन तयार करते. क्वालकाम साॅफ्टवेअर ही सेमी कंडक्टर, वायरलेस आणि फर्स्ट सोलार ही ऊर्जा क्षेत्रातील महारथी कंपनी आहे. या कंपन्या भारताबरोबर आल्या तर आपण लांब उडी मारू शकू.

मात्र या उड्डाणासाठी जागतिक सत्ता-संघर्षाचे सूक्ष्म आकलन अत्यंत गरजेचे आहे. आपण केवळ अमेरिकेच्या मोहात पडता कामा नये. आपल्यासाठी गरजेचे काय आहे, याचे विश्लेषण केले पाहिजे. जागतिक स्तरावरचे राजकारण  बुद्धिबळाच्या खेळासारखे असते. एका चालीमागे अनेक चाली जोडलेल्या असतात... पण एकच नेमकी चाल समोरच्याला गारद करायला पुरेशी असते.

Web Title: Great opportunity for India! Modi's US tour and quad increased China's uneasiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.