गांधी विचारांचा थोर भाष्यकार
By Admin | Updated: March 17, 2015 23:29 IST2015-03-17T23:29:05+5:302015-03-17T23:29:05+5:30
नारायणभाई देसाई यांच्या निधनाने गांधी विचार व गांधी चरित्र यांचा थोर भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

गांधी विचारांचा थोर भाष्यकार
नारायणभाई देसाई यांच्या निधनाने गांधी विचार व गांधी चरित्र यांचा थोर भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. गांधीजींनी ज्यांना आपले पुत्र मानले ते त्यांचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे नारायणभाई हे चिरंजीव होते आणि गांधीजींचे जीवन त्यांच्या आंदोलनातील नेतृत्वासह जवळून पाहण्याची व त्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली होती. गांधीजींविषयीच्या कोणत्याही प्रश्नावर अंतिम भूमिका मांडण्याएवढा मोठा अधिकार त्यांनी निरीक्षण व अध्ययन यातून प्राप्त केला होता. गेली काही वर्षे ते ‘बापूकथा’ सांगण्याच्या मोहिमेवर होते. ११७ शहरांत प्रत्येकी एक आठवडा त्यांनी सांगितलेली ही रसाळ गांधीकथा आता मराठी, गुजराथी व इंग्रजी भाषेतील अनेक खंडात उपलब्धही आहे. गांधीजींवर लिहिलेली एक लाखांवर पुस्तके आज जगातील सर्व भाषांत उपलब्ध आहेत. तरीही त्यात प्यारेलालजी, तेंडुलकर किंवा लुई फिशर यांनी लिहिलेली चरित्रे अधिक मान्यता पावली आहेत. नारायणभार्इंचा अधिकार या तोलाचा होता हे येथे लक्षात घ्यायचे. बापूंवर लिहिल्या गेलेल्या इतर चरित्रग्रंथांहून नारायणभार्इंचे लेखन वेगळे होते. इतर चरित्रे बापूंच्या राजकीय, सामाजिक वा सुधारणाविषयक अंगांवर भर देतात. नारायणभार्इंचे बापूचरित्र समग्ररीत्या लिहिले आहे. बापूंचे आयुष्य ही त्यांची जीवनभरची आत्मसाधना होती. स्वातंत्र्याचा लढा असो वा भंगीमुक्तीचे आंदोलन, तो त्यांच्यासाठी आत्मशुद्धीचा व स्वत:च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होता. नारायणभार्इंची बापूकथा त्यांच्या सगळ्या चळवळींचे व आंदोलनव्यवहाराचे नाते त्यांच्या आत्मशोधाच्या चळवळीशी जोडून दाखवणारे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अनेक घटना आहेत, आव्हाने आहेत, संकटे आणि खस्ताही बऱ्याच आहेत. मात्र सगळ्या दिव्यांमधून जाणारा व बाहेर पडणारा गांधी एक आत्मसाधक आहे या विचारापासून नारायणभार्इंचे बापूचरित्र जराही कुठे ढळलेले नाही. त्यांच्या गांधीकथेत दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी काळ्या माणसांच्या अधिकारासाठी दिलेल्या लढ्यापासून १९४२ च्या संग्रामापर्यंतची सारी कहाणी तपशिलाने पण अतिशय हळुवारपणे यायची. विशेषत: कस्तुरबांच्या निधनाची हकिकत सांगताना त्यांचे व त्यांच्या श्रोत्यांचे डोळे पाणावायचे. पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबांच्या समाधीशेजारीच नारायणभार्इंच्या वडिलांची, महादेवभार्इंची समाधी आहे. ही एकच गोष्ट त्यांची गांधीजींशी असणारी जवळीक सांगणारी आहे. मृत्यूसमयी नारायणभार्इंचे वय ९० वर्षांचे होते. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते गांधीजींजवळ वाढले. गांधीजींच्या जवळ असणारी व त्यांचे निकटवर्ती अनुयायी असणारी माणसे त्यांनी जवळून पाहिली. त्यांचीही अतिशय सुरेख वर्णने त्यांच्या सगळ्या वैशिष्ट्यांसह त्यांच्या कथेत येत. मधुर वाणी, जबर स्मरणशक्ती, सखोल अध्ययन, प्रखर निरीक्षण आणि विद्यार्थ्याची विनम्र वृत्ती या साऱ्या गोष्टींचा अनुभव त्यांच्या श्रोत्यांच्या पदरात पडायचा. साबरमती आश्रमात जन्म झालेल्या आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘बापूंच्या मांडीवर वाढलेल्या’ नारायणभार्इंवर यथाकाळ सेवाग्राम आश्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. सर्वसेवासंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. गुजरातमधील गांधी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. जयप्रकाशांच्या आंदोलनात स्थापन झालेल्या तरुण शांती सेनेचे अध्वर्यूपदही त्यांच्याकडे होते. १९६० ते ७६ या काळात त्यांनी विनोबांसोबत १२ हजार कि.मी.ची पदयात्रा केली व त्यांच्या भूदान यज्ञाला तीन हजार एकर जमीन मिळवून दिली. नारायणभाई आंतरराष्ट्रीय युद्धविरोधी संघटनेचे अध्यक्ष आणि जागतिक शांती सेनेचे संस्थापक होते. सारे जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या ईर्ष्येनेही त्यांनी जागतिक व्यासपीठांवर मोठी झुंज दिली. युनेस्को या जागतिक संघटनेने त्यासाठी अहिंसा व सद््भावनेचा श्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या नारायणभार्इंचा अनेक देशी व विदेशी भाषांवर अधिकार होता आणि त्यात ते अस्खलितपणे बोलू शकत. ‘रोझ इन फायर’ हे त्यांनी लिहिलेले गांधीजी व महादेवभाई यांच्या संबंधांवरील पुस्तक इतिहासाचा एक मोठा ठेवा मानले जाते. त्यांच्या ५० वर पुस्तकांतील त्यांची भाष्येही गांधी विचारांवरील अधिकृत भाष्ये मानली जातात. ९० वर्षे ‘गांधीजीवन’ जगत राहिलेले नारायणभाई जगाचा निरोप घेताना मात्र एक व्यथा मनात घेऊन गेले. गुजरात विद्यापीठाच्या अखेरच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना ती व्यथा त्यांनी बोलून दाखविली. ‘सारे जग एक करायला निघालेले गांधीवादी स्वत:ला मात्र एकत्र आणू शकले नाहीत’ ही त्यांची वेदना होती. किमान तुम्ही तुमचे अहंकार बाजूला सारा आणि एकमेकांच्या जवळ या, गांधीजींचा विचार त्याच स्थितीत तुम्हाला पुढे नेता येईल’ असे त्यावेळी ते म्हणाले होते. त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे असलेल्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांना या मार्गातले अडसर तेव्हा समजावून सांगितले. मात्र त्यावर समाधान न झालेले नारायणभाई त्यांची ती व्यथा आपल्या सोबत घेऊन या जगातून आता रवाना झाले आहेत. यातून या देशातले स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे काही धडा घेतील तर ती त्यांची नारायणभार्इंना खरी श्रद्धांजली ठरेल.