‘जनरल इलेक्शन्स’ की ‘जनरल्सचे इलेक्शन’?

By Admin | Updated: May 21, 2015 23:21 IST2015-05-21T23:21:24+5:302015-05-21T23:21:24+5:30

विख्यात लेखक अल्डस हक्सले १९६१ मध्ये भारतभेटीवर आले असता त्यांना येथील चित्र अत्यंत निरुत्साहजनक जाणवले होते.

Generals' Elections of 'General Elections'? | ‘जनरल इलेक्शन्स’ की ‘जनरल्सचे इलेक्शन’?

‘जनरल इलेक्शन्स’ की ‘जनरल्सचे इलेक्शन’?

विख्यात लेखक अल्डस हक्सले १९६१ मध्ये भारतभेटीवर आले असता त्यांना येथील चित्र अत्यंत निरुत्साहजनक जाणवले होते. प्रचंड लोकसंख्या, बेरोजगारी, वाढता असंतोष पाहून त्यांनी त्यांच्या भावाला जे पत्र लिहिले, त्यात असे म्हटले की, ‘नेहरूंच्या नंतर इथे लष्करी राजवट येईल व तेच सर्वोच्च सत्तेचे केंद्र बनेल’.
हक्सले येथे येऊन गेल्यानंतर तीन वर्षातच नेहरूंचे निधन झाले, पण भारताने तेव्हां वा त्यानंतरही प्रजासत्ताकाच्या तत्वाचा त्याग केला नाही. या बाबतीत आशिया आणि आफ्रिका खंडांमधील म्यानमार, घाना, नायजेरिया व इंडोनेशिया यांच्यापेक्षा भारत वेगळा ठरला आहे. कारण त्या सर्व देशांमध्ये लष्कराने नेहमीच वरचढ आणि प्रभावी भूमिका निभावली आहे.
विशेषत: भारत आणि पाकिस्तान यांची याबाबत तुलना केली जाते, तेव्हां तर भारताचे या संदर्भातले यश अधिकच लक्षवेधी ठरते. एकेकाळी दोन्ही देश जसे ब्रिटीश सत्तेखाली होते तसेच त्यांच्यात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक साधर्म्यही आहे. तरीही भारतातील लष्कर जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर राहिले. पण पाकिस्तानी लष्कराने मात्र नेहमीच तिथल्या राजकारणात सक्रीय हस्तक्षेप केला आहे. अमेरिकेतल्या येल विद्यापीठातील राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक स्टीव्ह विल्किन्सन यांनी त्यांच्या ‘आर्मी अ‍ॅन्ड नेशन’ या नव्या पुस्तकात या दोन देशांच्या भिन्न वाटचालीचा अन्वयार्थ प्रभावीपणे मांडला आहे. त्यांनी या पुस्तकात भारत आणि पाकिस्तानच्या विभिन्न वाटचालीची बरीच कारणे स्पष्ट केली आहेत.
पहिले कारण म्हणजे उभय देशांमधील प्रमुख राजकीय पक्षांचा जनाधार. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला भारतभरातील शेतकरी आणि मध्यमवर्गाचा मोठा आधार लाभला होता. काँँग्रेसचा कल नेहमी संघराज्य पद्धतीच्या बाजूनेच राहिला. देशात भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य असतानाही काँग्रेसने सर्वांचेच प्रतिनिधित्व केले. दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगला लाभलेला आधार मर्यादित अभिजन वर्गाचा होता. त्यात बडे जमीनदार आणि व्यावसायिक यांचा मोठा भरणा होता. पाकिस्तानी लष्करासमोर लीग नेहमीच दुर्बल राहिली. पण भारतीय लष्कराच्या दृष्टीने समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली काँग्रेस आव्हानाच्याही पलीकडे होती.
दुसरे कारण, लष्करातील अंतर्गत प्रभावाचे. पाकिस्तानी सैन्यात एका विशिष्ट प्रांताचे वर्चस्व राहिले असले तरी भारतात तसे नाही. इंग्रजांनी दोन्ही महायुद्धांच्या काळात पंजाब प्रांतातून मोठी सैन्य भरती केली होती. फाळणीनंतर सैन्याचीसुद्धा विभागणी झाली, त्यावेळी पंजाबी मुसलमान मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले. त्यांचे पाकिस्तानी सैन्यातले प्रमाण ७२ टक्के इतके जबर होते. भारतीय सैन्यातही पंजाबी शीख आणि हिंदू मोठ्या प्रमाणात असले तरी त्यांची संख्या २० टक्केच असल्याने त्यांना प्रभावी म्हणता येत नाही. सैन्यात संतुलन राहावे यासाठी भारत सरकारनेही देशाच्या इतर भागातून सैन्य भरती केली. शिवाय सैन्याचा भार थोडा कमी व्हावा म्हणून अर्धसैनिक बलांचीही स्थापना केली.
तिसरे कारण म्हणजे, सैन्याला त्याचे स्थान दुय्यम असल्याचे जतवून देणारे राजकीय नेतृत्व. १९४७ साली नेहरूंनी ब्रिटिश सैन्यप्रमुखाला लिहिलेल्या एका पत्राचा दाखला विल्किन्सन आपल्या पुस्तकात देतात. या पत्रात नेहरू लिहितात की, ‘सैन्यदल असो अथवा अन्य कोणत्याही विषयातील धोरणाची अंमलबजावणी करायची, तर केवळ भारत सरकारचा दृष्टीकोन आणि धोरण हेच महत्वाचे असेल. जर एखाद्या लष्करी अधिकाऱ्याला या धोरणाची अंमलबजावणी अशक्य वाटत असेल तर त्याला सैन्यात किंवा संघराज्यपद्धतीत जागा नसेल’.
चौथे कारण म्हणजे सैन्यातील अधिकाराची पारंपरिक उतरंड. इंग्रजी राजवटीत सैन्यप्रमुख ही दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची व्यक्ती होती. व्हाईसरॉयनंतरचे नवी दिल्लीतले दुसरे मोठे निवासस्थान त्याचेच होते. स्वातंत्र्यानंतर नेहरुंचा मुक्कामही तिथेच होता. स्वातंत्र्यानंतर सेनाप्रमुख संरक्षण मंत्र्यांना जबाबदार, तर संरक्षणमंत्री स्वत: संसद, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला जबाबदार होते. दरम्यान राजशिष्टाचाराचा प्राथम्यक्रम निर्धारित करताना, सेनादलाच्या प्रमुखाचे स्थान थेट २५ व्या क्रमांकावर आणि केंद्रीय मंत्री, राज्यपाल, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या सर्वांचे स्थान त्याच्या पुढे ठेवले गेले.
विल्किन्सन यांनी दिलेल्या या चार कारणांखेरीज आणखी दोन कारणे आहेत. पहिले आहे इतिहास आणि भूगोल. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान हे महत्वाचे ठिकाण म्हणून उदयास आले. १९५० च्या दरम्यान जेव्हा सोविएत रशिया अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पोहोचला, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवून आपल्या बाजूला ओढले. १९७० च्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने अमेरिकेला मदत करत चीनशी अंतर ठेवले. १९८० साली सोविएतव्याप्त अफगाणिस्तानच्या मुद्यावरून पाकिस्तान रशियाविरोधी लढाईत सक्रीय झाले. त्या राष्ट्राला दरम्यान अमेरिकेकडून डॉलर्स आणि शस्त्रात्रांचा ओघ सुरु झाला होता.
पाकिस्तानातील बुद्धिवादी आणि विचारवंत नेहमीच लष्कराच्या बाजूने राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला भारतातील खुले राजकीय वातावरण आणि गतिमान अर्थव्यवस्था यामुळे इथले हुशार आणि महत्वाकांक्षी तरुण यशस्वी वकील, डॉक्टर, व्यावसायिक किंवा राजकारणी होऊ शकले आणि कालांतराने हे व्यवसाय सैनिकी पेशापेक्षा अधिक आकर्षक झाले. पण पाकिस्तानातील तरुण केवळ सैन्यातील कारकिर्दीकडेच पर्याय म्हणून बघतात.
सैन्याच्या तांत्रिक गरजांच्या बाबतीत दाखवलेल्या अनास्थेमुळे नेहरू आणि त्यांचे संरक्षणमंत्री व्हि.के.मेनन यांना चीनकडून पराभव पत्करावा लागला. पण त्या नंतरच्या संरक्षण मंत्र्यांनी सैन्याच्या कार्यक्षमतेवर आणि मनोबलावर परिणाम करीत वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रि येत हस्तक्षेप केला.
एकूणात, आपण भारतीयांनी स्वत:ला भाग्यवान समजावे, कारण हक्सले यांनी पन्नास वर्षापूर्वी वर्तविलेल्या भविष्यातून व आपल्याविषयी रंगविलेल्या चित्रातून आपण बाहेर पडलो. आशिया आणि आफ्रिकेतील बऱ्याच देशातले अर्थकारण आणि राजकारण मात्र तिथल्या सैन्याच्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे आज खंगलेल्या अवस्थेत आहे.

रामचन्द्र गुहा
( इतिहासाचे ज्येष्ठ भाष्यकार)

Web Title: Generals' Elections of 'General Elections'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.