गृहपाठाअभावी फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:20 PM2018-10-13T13:20:58+5:302018-10-13T13:21:45+5:30

‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक

Fuzzy due to lack of homework | गृहपाठाअभावी फजिती

गृहपाठाअभावी फजिती

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
जळगाव महापालिका निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून भाजपाने भीमपराक्रम केला. प्रस्थापितांविरुध्द सुप्त लाट असल्याने ७५ पैकी ५७ जागा भाजपाला मिळाल्या. खासदार, आमदार आणि महापौर अशी तिन्ही महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने मोठा दबदबा निर्माण झाला. त्यातच जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना महापौरपद दिल्याने आता जळगावच्या विकासाची गाडी सुसाट धावेल, असा विश्वास नागरिकांना आहे. परंतु घवघवीत यश, अनुभवी नगरसेवक, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांचे मार्गदर्शन अशा प्रबळ बाजू असतानाही महापालिकेच्या पहिल्या महासभेत भाजपाची फजिती झाली. सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकांमध्येच भूसंपादन, गाळेप्रश्न अशा विषयांवरील मतभिन्नता, ठोस भूमिकेचा अभाव असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार सुरेश भोळे, माजी सभापती कैलास सोनवणे यांना सभागृहाकडे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक आहे.
भगत बालाणी यांच्यासारखा अनुभवी नगरसेवक हा गटनेता, डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारखा तरुण तडफदार आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले उपमहापौर, मावळते महापौर ललित कोल्हे यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद अशी वजनदार आणि परिपक्व नगरसेवकांची फळी भाजपाकडे असताना पहिल्याच महासभेत हे घडले, याचा अर्थ पक्षात विचारमंथन करणारी फळी अद्याप तयार झालेली नाही.
निवडणुकीच्या विजयानंतर आमदारांनी ‘थिंक टँक’ बनविणार असल्याचे जाहीर केले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा या समितीत समावेश करुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जळगाव शहराच्या विकासासाठी केला जाणार असल्याचा त्यांचा मानस आहे. परंतु महिना उलटला तरी अद्याप ही समिती अस्तित्वात आली नाही. परिणामी १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन पहिल्या महासभेत मंजुरीसाठी येणे अपेक्षित असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे हित जपणारा भूसंपादनाचा विषय पटलावर आला, याचा संदेश योग्य गेलेला नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकाच जर सध्याची मंडळी करीत असेल तर मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय असे नागरिकांना वाटू शकते. भाजपाच्या धुरिणांनी ही काळजी घेणे अपेक्षित आहे. स्विकृत सदस्यांची निवड होणे बाकी आहे. त्यात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समाविष्ट करुन भाजपा महापालिकेतील फळी मजबूत करु शकते. भाजपा असे करते काय, की राजकारणाचा भाग म्हणून पुन्हा राजकीय मंडळींचे पुनर्वसन यानिमित्ताने करते, यावर भाजपाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

Web Title: Fuzzy due to lack of homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.