Frustration from the King | राजाकडून निराशा
राजाकडून निराशा

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. सोमवारी ते नंदुरबारला येत आहेत, तर धुळ्यात १६ फेब्रुवारीला त्यांची सभा झाली होती. याचा अर्थ काय काढावा? जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच्या दृष्टीने जिंकण्याच्या गटात आहेत काय? याचे उत्तर जो तो आपापल्या पध्दतीने देईल. पण ‘राजा’ने जळगावकडे पाठ फिरविल्याने जिल्हावासीय मात्र निराश झाले आहेत. कारण गेल्यावेळी मोदी यांची सभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एरंडोल, जळगाव याठिकाणी सभा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मतदारांना मोठे स्वप्न दाखविले होते. त्यातील एक टेक्सटाईल पार्कचे होते. ते म्हणाले होते, जळगाव जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो. परंतु, प्रक्रिया उद्योग नसल्याने तो आमच्या गुजराथमध्ये येतो. म्हणून आमचे सरकार आल्यावर याठिकाणी प्रक्रिया होईल, असे उद्योगांचे जाळे उभारु. पाच वर्षात काय झाले? जामनेरला केवळ जागा अधिग्रहित झाली. फलक लागले. एकही उद्योग सुरु झालेला नाही. कापूस गुजराथमध्ये जात आहेच.
स्थलांतर रोखण्यासााठी खान्देशात सिंचनाच्या सुविधा देऊ. म्हणजे, खान्देशातील नागरिक गुजराथ, मध्य प्रदेशात स्थलांतर करणार नाहीत. सिंचनाच्या आघाडीवर देखील निराशाजनक कामगिरी पाच वर्षांत झाली आहे. दोन केंद्रीय जलसंपदा मंत्री झाले, पण मेगा रिचार्ज प्रकल्प साकारला नाही. पाडळसरेचे काम ठप्प आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्यासाठी शेतकरी डोळे लावून बसले आहेत. अक्कलपाडाचे पाणी धुळ्यासाठी अद्याप आलेले नाही. सुलवाडे जामफळ, शेळगाव, वरखेडे-लोंढे असे अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. गिरीश महाजन हे राज्याचे तर नितीन गडकरी हे देशाचे जलसंपदा मंत्री असल्याने मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, समाधानकारक प्रगती झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील रहिवाशांचे चार-सहा महिने स्थलांतर कायम आहे.
गेल्या निवडणुकीच्यावेळी औद्योगिक विकासाचे ‘गुजराथ मॉडेल’ मोदी यांनी मांडले होते. सत्ता आल्यास तसाच औद्योगिक विकास खान्देशात करु, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र याठिकाणीही निराशा पदरी आली. नंदुरबार जिल्ह्यातील गुजराथच्या सीमेवरील गावांमध्ये उद्योग आले, पण त्यांना सोयीसुविधा मिळत नाही. नरडाण्याच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर अद्याप कागदावरच आहे. जळगाव, भुसावळचा औद्योगिक विकास ठप्प आहे. प्लास्टिक पार्कची प्रतीक्षा कायम आहे.
धुळ्यातील सभेत तर पंतप्रधानांनी निराशा केली, पण नंदुरबारात ते काय बोलतात, याची उत्सुकता राहील.
गडकरी भुसावळला येऊन गेले. महामार्ग बांधकामाच्या प्रगतीविषयी बोलले. भाजपाची मंडळी हुशार आहे. त्यांनी गडकरींची सभा महामार्गाचे काम सुरु असलेल्या भुसावळला लावली. काम ठप्प असलेल्या जामनेर, जळगाव, एरंडोल, पारोळा याठिकाणी लावली नाही. कारण १६५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी गडकरी यांनी केले. त्यापैकी केवळ तरसोद ते चिखली आणि जळगाव ते चाळीसगाव याच रस्त्याचे काम सुरु आहे. उर्वरित सर्व काम ठप्प आहे. नवापूर ते तरसोद या राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे काम तर रडतखडत सुरु आहे. कधी सुरु होते आणि कधी बंद होते, हे कळतच नाही.
गडकरी यांनी महामार्गाविषयी अधिक बोलण्याऐवजी जळगाव ते भुसावळदरम्यान डबलडेकर हवाई बस सुरु करण्याचे स्वप्न दाखविले. आता ही बस कशी असेल ? खर्च किती येईल? तंत्रज्ञान कोणते? याचा काहीही तपशील मिळाला नसला तरी स्वप्न मोठे दाखविले. मध्यंतरी जलवाहतुकीचे स्वप्न खान्देशवासीयांना दाखविले. मुळात नद्या बारमाही वाहत नसताना जलवाहतूक होणार कशी, हा प्रश्न पडतोच. पण विचारणार कुणाला?
असाच अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आला. पाडळसरे धरणाविषयी जनभावना तीव्र होत्या, त्यांनी नाबार्डकडे जाणार असल्याचे आश्वासन दिले. हुडको कर्जाविषयी पंतप्रधानांकडे जाण्याचे आश्वासन दिले. बलून बंधारे आणि मेगा रिचार्ज जणू कार्यान्वीत झाले अशा पध्दतीने त्यांनी भाषणात उल्लेख केला. सत्ताधारी मंडळींची ही आश्वासने जनतेला निराश करणारी आहेत, हे मात्र निश्चित.


Web Title: Frustration from the King
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.