अभिनयाचा झरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:43 AM2019-12-19T05:43:22+5:302019-12-19T05:43:43+5:30

डॉक्टर, उत्तम अभिनेता, साक्षेपी वाचक, सामाजिक कार्यातील कार्यकर्ता आणि आपली मते परखडपणे लिहिणारा व मांडणारा विचारवंत अशा विविध रूपांत वावरलेल्या डॉ. श्रीराम लागू यांच्यावर केवळ महाराष्ट्राने नव्हे, तर संपूर्ण देशाने प्रेम केले.

The fountain of acting is Dr shriram lagoo | अभिनयाचा झरा

अभिनयाचा झरा

googlenewsNext

नटसम्राट या नाटकात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका अनेक दिग्गज कलाकारांनी केली. तरीही नटसम्राट म्हणताच आठवतात केवळ डॉ. श्रीराम लागू. इतके की त्या नाटकामुळे नाट्यरसिक त्यांनाच नटसम्राट म्हणू लागले. त्या नाटकात त्यांनी गणपतराव बेलवलकर या काल्पनिक पात्रालाच जिवंत केले. ती भूमिका साकारताना आवाजातील चढ-उतारांतून आणि अभिनयातून त्यांनी त्या पात्राच्या भावना अगदी जिवंत केल्या.

श्रीराम लागू यांना कायम डॉक्टर अशीच हाक मारली जाई. या डॉक्टरांचे जाणे आकस्मिक म्हणता येणार नाही. वय झाले होते आणि काही काळ ते आजारीच होते. तरीही त्यांच्या आपल्यातून जाण्याने मराठी नाट्यसृष्टीच नव्हे, तर चित्रपटप्रेमी, कलावंत, साहित्यिक, विचारवंत अशा साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. आताच्या पिढीने डॉ. लागू यांची नाटके पडद्यावर पाहिलेली नाहीत. फार तर चित्रपटांमुळेच ते त्यांना माहीत असतील. डॉक्टरांनी अभिनयाला बºयाच काळापूर्वी रामराम ठोकला. पण आजही ते सर्वांच्या हृदयात आहेत, याचे कारण कधी ना कधी सर्वांनी त्यांची पाहिलेली नाटके आणि चित्रपट. ‘सिंहासन’मधील अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, ‘पिंजरा’मधील नीतिवंत, पण महिलेच्या नादाला लागलेला मास्तर, ‘सामना’ चित्रपटातील शिक्षक या साºया भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकातून त्यांनी सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान नाट्यप्रेमींपुढे मांडले. ‘काचेचा चंद्र’ नाटकातील त्यांचे कामही असेच लक्षणीय होते. ‘देवकी नंदन गोपाला’ हा चित्रपट लक्षात राहतो तो केवळ डॉ. लागू यांच्या भूमिकेमुळेच. नाटक व चित्रपटांंत त्यांनी संबंधित काल्पनिक पात्रे अतिशय जोरकस अभिनयातूनच जिवंत केली. त्या भूमिका ते जगले. लावारिस, घरौंदा, खुद्दार, मुकद्दर का सिकंदर, गांधी, कामचोर अशा १00 हून अधिक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. प्रामुख्याने त्या चरित्र अभिनेत्याच्या भूमिका होत्या. त्यांच्याआधी वा त्या काळात जे अन्य चरित्र अभिनेते होते, त्या सर्वांहून डॉक्टर खूपच सरस होते. बहुधा त्याचमुळे पंतप्रधान मोदींपासून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि परेश रावळ यांच्यापासून ऋषी कपूर आणि मधुर भांडारकर या आणि त्यांच्यासमवेत काम केलेल्या सतीश आळेकर, अमोल पालेकर या कलाकारांना डॉक्टरांच्या जाण्याने खूपच दु:ख झाले. हिंदी चित्रपटांत भूमिका करताना, मराठी रंगभूमी हीच खरी आपली कर्मभूमी आहे, हे सतत लक्षात ठेवून त्याकडे सतत लक्ष दिले आणि व्यावसायिक रंगभूमी ते प्रायोगिक रंगभूमी असा सर्वत्र त्यांचा संचार सुरू राहिला. सामाजिक कार्यातील त्यांचे योगदानही अतिशय मोठे होते.

डॉ. लागू यांनी आपली सामाजिक व राजकीय मतेही अत्यंत परखडपणे मांडली. देवाला रिटायर करा, या त्यांच्या लेखामुळे मोठे वादळ उठले. त्यांच्यावर खूप टीका झाली. पण त्यांनी आपल्या भूमिकेला कधीच मुरड घातली नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह ते त्यासाठी रस्त्यांवर उतरले. महाराष्ट्रात अनेक संस्था व व्यक्ती सेवाभावी वृत्तीने काम करतात. त्यांच्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याचे श्रेयही डॉ. लागू यांनाच जाते. केवळ आपल्या लोकप्रियतेच्या नावाने लोकांकडून देणग्या घेण्याऐवजी सामाजिक कार्यामागील भूमिका पटवून त्यांनी मोठा निधी उभारला आणि या व्यक्ती व संस्थांचे कार्य पुढे सुरू राहील, हे पाहिले. त्यामुळे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना डॉ. श्रीराम लागू अतिशय जवळचे वाटत. त्यांचे ‘लमाण’ हे आत्मचरित्र खूपच गाजले. लमाण समाज ज्याप्रमाणे येथून सामान उचलून दुसरीकडे नेतो, तसेच मी नाटकांत केले, असे ते म्हणत. म्हणजे नाटककाराने लिहिलेली संहिता तशीच्या तशी अभिनयाने आपण पोहोचवित राहिलो, असे त्यांचे म्हणणे होते.

मुलगा तन्वीर याच्या नावाने त्यांनी पुरस्कार सुरू केला. यंदाचा पुरस्कार अभिनेते नसीरुद्दिन शाह यांना पुण्यात अलीकडेच देण्यात आला. तिथे डॉ. लागू उपस्थित होते. पण तेव्हाही त्यांची प्रकृती चांगली नव्हतीच. तरीही त्यांनी जगाच्या रंगमंचावरून घेतलेल्या कायमच्या एक्झिटमुळे साऱ्यांनाच हळहळ वाटणे स्वाभाविक आहे.

Web Title: The fountain of acting is Dr shriram lagoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.