नियम पाळूया; पण लवकरच थोडे घराबाहेरही पडूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:37 AM2020-09-30T02:37:17+5:302020-09-30T02:37:41+5:30

कोरोनामुळे सर्वात आधी बंद झालेला आणि अर्थातच सर्वात उशिरा चालू होणारा पर्यटन उद्योग अजून किती काळ कळ काढणार? पर्यटनावर अवलंबून असणाºया इतरांचं काय? प्रवासी वाहनं, त्यांचे चालक,

Follow the rules; But let's get out of the house soon! | नियम पाळूया; पण लवकरच थोडे घराबाहेरही पडूया!

नियम पाळूया; पण लवकरच थोडे घराबाहेरही पडूया!

Next

आज तब्बल सहा महिने झाले, पर्यटन व्यवसायातील आम्ही सर्व मंडळी घरातच बसून आहोत. सर्वांनीच एक जबाबदार पर्यटन व्यावसायिक म्हणून ही भूमिका अतिशय उत्तम पार पाडली आहे. अनलॉक १, २, ३.. ४ झालं, आता अनलॉक ५ची चर्चा सुरू झाली आहे, तरीही सरकार पर्यटन उद्योगाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची तयारी दाखवत नाही. एक एक करत सर्व आॅफिसेस, सर्व प्रकारची दुकानं सगळं काही पूर्ववत चालू झालं. कृषी, आयटी, औद्योगिक विश्वात काम सुरू झालं, अगदी दारू दुकानंही चालू आहेत; पण भारताच्या एकंदर जीडीपीच्या ९.२ टक्के म्हणजेच जवळपास १७ लाख कोटी इतक्या मूल्याचा हातभार लावणाऱ्या पर्यटन उद्योगाबाबत सरकार एवढं निद्रिस्त का? या उद्योगातले लाखो लोक बेरोजगार झाले आहेत त्याचं काय?

कोरोनामुळे सर्वात आधी बंद झालेला आणि अर्थातच सर्वात उशिरा चालू होणारा पर्यटन उद्योग अजून किती काळ कळ काढणार? पर्यटनावर अवलंबून असणाºया इतरांचं काय? प्रवासी वाहनं, त्यांचे चालक, क्लीनर, त्यांना कर्ज देणाºया कंपन्या, मंदिराबाहेरचे हारफूलवाले, दुकानं, चहा, नास्ता, जेवण पुरवणारी हॉटेल्स, गाइड म्हणून काम करणारे गावकरी, राहण्यासाठी उभारलेल्या कॅम्प साइट, होम स्टेज, पर्यटनावर अवलंबून असलेले त्या त्या भागातले छोटे व्यावसायिक, लीडर म्हणून जबाबदारीने सहल नेणारी मंडळी, आयोजक, आॅफिस स्टाफ व त्यांची कुटुंबं, आॅफिस चालवण्यासाठी लागणारे समाजातील इतर घटक... अशा एक ना अनेक लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे... सर्व उद्योगांना सरकारतर्फे असंख्य सवलती/फंड मिळाले; पण पर्यटन उद्योगाचं काय?

सर्व प्रकारचे व्यवसाय चालू झाले; पण मग ट्रेकिंग का नाही? हॉटेल चालू; पण स्विमिंग पूल बंद, मंदिरं बंद. तसं पहायला गेलं तर जिम, ट्रेकिंग यामुळे तब्येत छान राहते, प्रतिकारशक्ती वाढते, फुफ्फुसांचा व्यायाम होतो, स्वच्छ हवा मिळते असे एक ना अनेक फायदे आहेत. अर्थातच सर्व नियम पाळून...
या काळात पर्यटनाचा व्यवसाय सुरू करण्याचं नाव काढणंही ज्यांना भलतंच त्रासदायक वाटतं, ते लोक विचारतात, पर्यटक भटकू लागले आणि दºयाखोºयात कोरोना पसरला, तर कोण जबाबदार...? या प्रश्नाला उत्तर एवढंच, की जर नियम घालून, त्या नियमांचं कठोर पालन करून अन्य व्यवसाय काही प्रमाणात सुरू करता येतात, तर मग तोच नियम पर्यटनासाठी का नाही? निदान डोंगर दºयातली भटकंती, टेÑकिंग सुरू करायला काय हरकत आहे? एक जबाबदार सहल संचालक/ट्रेक आॅर्गनायझर हा प्रत्येक गोष्ट ‘सेफ्टी फर्स्ट’ या तत्त्वानेच करतो. प्राप्त परिस्थितीत सहल संचालकांना अधिक जबाबदारी उचलावी लागेल, हे मला मान्य आहे. तशी तयारी या उद्योगातील जबाबदार घटक नक्की दाखवतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या आठवड्यात बºयाच गावात फोन झाले. खूप गावकऱ्यांचीपण इच्छा आहे की ट्रेकिंग चालू करावं... पाहिजे तर आम्ही पॅकबंद जेवण गावाबाहेर आणून देऊ, असेही उपाय ग्रामस्थ सुचवत आहेत. पर्यटकांनी गावात न येताही त्यांच्यासाठीच्या सुविधा पुरवायची व्यवस्था उभी करता येऊ शकते. टेÑकिंगसाठी येणाºयांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले ग्रामस्थ संख्येने अत्यल्प; पण त्यांची उत्कंठा मोठी. कारण त्यांचं पोट त्यावर अवलंबून आहे. ज्यांची रोजीरोटी यावर अवलंबून नाही, ते ग्रामस्थ मात्र पर्यटन सुरू करण्याच्या विरोधात, असंही एक चित्र आता गावांमध्ये उभं राहतं आहे.
मागील काही वर्षात या पर्यटन उद्योगाला अनेक संकटाना सामोरं जावं लागलं आहे. पूरग्रस्त परिस्थिती, सततच्या इंधनवाढीमुळे झालेली महागाई, साहसी पर्यटनासंबंधात सरकारने जारी केलेले जाचक निर्बंध, जागतिक मंदी... आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे कोरोना. या कोरोनामुळे तर जे पूर्णवेळ पर्यटनावर अवलंबून आहेत ते तर किमान ५ ते ६ वर्ष मागे फेकले गेले आहेत. अर्थातच हे सगळं पूर्ववत व्हायला काही वर्ष नक्कीच लागणार आहेत. पुन्हा रुळावर येताना जशी या उद्योगाला सरकारी मदतीची गरज आहे, तशीच पर्यटकांच्या सहकार्याची आणि जबाबदार वर्तनाचीही अपेक्षा आहे! सहली/ट्रेकला जाणाºया पर्यटकांना विनंती की तुम्ही ज्यांच्यासोबत जाणार, त्या कंपनीची/गटाची नीट चौकशी करा, सुरक्षिततेच्या उपायांची खात्री करून घ्या आणि कोरोनाच्या बाबतीतले सर्व नियम पाळले जातील याची खात्री करा! संपूर्ण सुरक्षितता घेऊन पुन्हा एकदा नव्या दमाने देश-विदेशात, डोंगर दºयात भटकायला आपण सगळेच सज्ज होऊया!

दत्ता भालेराव ( लेखक, कोकण पर्यटनचे संचालक आहेत )

Web Title: Follow the rules; But let's get out of the house soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.