नाट्यसंमेलनासाठी पहिली घंटा
By Admin | Updated: April 16, 2016 04:08 IST2016-04-16T04:08:49+5:302016-04-16T04:08:49+5:30
साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील राजकीय मंडळींच्या सहभागाविषयीचा वाद तसा नवा नाही. त्याबरोबरच सर्वशक्तिमान मानल्या गेलेल्या राजकीय मंडळींच्या पाठबळाशिवाय संमेलने होत

नाट्यसंमेलनासाठी पहिली घंटा
- मिलिंद कुलकर्णी
साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील राजकीय मंडळींच्या सहभागाविषयीचा वाद तसा नवा नाही. त्याबरोबरच सर्वशक्तिमान मानल्या गेलेल्या राजकीय मंडळींच्या पाठबळाशिवाय संमेलने होत नाहीत, हा अनुभवदेखील नवा नाही. राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नाट्य परिषदेच्या ग्रामीण शाखेतर्फे २०१७ च्या नाट्यसंमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे संकेतदेखील नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिल्याने ही चर्चा आता काही दिवस सुरु राहील.
जळगावात १९४४ मध्ये नाट्यसंमेलन झाले होते. त्यानंतर ७२ वर्षांत संमेलन झाले नाही. गेल्या १५ वर्षांत तीन वेळा निमंत्रणे देण्यात आली. परंतु यश आले नाही. नाट्य परिषदेच्या शहर शाखेचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र हे संमेलन जळगावात व्हायला हवे, अशी रंगकर्र्मींची प्रबळ इच्छा आहे. त्यातून आणखी एका शाखेचा जन्म झाला. एकनाथराव खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी स्वत:कडे अध्यक्षपद घेत मुक्ताईनगर (जळगाव ग्रामीण) ही नवीन शाखा स्थापन केली. या शाखेच्या उद्घाटनाला नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, सदस्य मधु कांबीकर, विभाग प्रमुख सुनील ढगे, दिलीप दळवी ही दिग्गज मंडळी उपस्थित राहिली. या कार्यक्रमात २०१७ चे संमेलन जळगावात घेण्यासाठी अधिकृत निमंत्रण जोशी यांना देण्यात आले. जळगावातील तयारी पाहून येथे संमेलन व्हावे, अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. परंतु नियामक मंडळात यासंबंधी निर्णय होणार असून यापूर्वीच अन्य तीन-चार ठिकाणचे प्रस्तावदेखील आल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
एकनाथराव खडसे यांनी पुत्र स्व.निखील खडसे यांच्या नावाने पुरुष व महिला कलावंतांना ५१ हजारांचा जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी नाट्य परिषदेकडे देण्याची घोषणा केली. जळगावातील शासकीय नाट्यगृह जानेवारी २०१७ पर्यंत पूर्ण होईल आणि अकलूजसारखा राज्य लावणी महोत्सव जळगावात घेण्याचे सूतोवाच खडसे यांनी केले. एकंदरीत जळगावच्या नाट्यचळवळीला सुगीचे दिवस येतील, असे चित्र या कार्यक्रमामुळे निर्माण झाले. अर्थात जळगावची नाट्यपरंपरा जुनी आहे. बालगंधर्वांचे बालपण जळगावात गेले. त्यांच्या स्मृती त्यांच्या नावाचे नाट्यगृह आणि वार्षिक संगीत महोत्सवाद्वारे जतन केल्या जात आहेत. ग्रामीण भागात म्हणजे शेलवड आणि मुक्तळ या ठिकाणी १८६५ पासून बालाजी सांस्कृतिक मंडळ व श्रीराम नाट्य मंडळाच्या माध्यमातून नाटके सादर होत असत. आजही भुसावळ येथे अंतर्नाद प्रतिष्ठान, रसिक कला मंडळ, उत्कर्ष कलाविष्कार, नुपूर अकादमी, स्वरनिनाद तर चाळीसगावला रंगगंध यासारख्या संस्था रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, बालगंधर्व संगीत महोत्सव, विद्यापीठाचा युवारंग हा युवक महोत्सव अखंडपणे सुरु आहे. अधिकृत प्रस्ताव देऊन नाट्यसंमेलनाची पहिली घंटा तर वाजली. यंदा चंद्रपूर, कोल्हापूरदेखील स्पर्धेत असल्याची चर्चा आहे. जळगावला संमेलन होण्यासाठी स्वत: खडसे प्रयत्नशील असल्याने बहुदा अडसर येणार नाही. संमेलन निश्चित झाल्यास स्थानिक पातळीवर रंगकर्र्मींचे गटतट एकत्रित करण्याचे मोठे आव्हान ग्रामीण शाखेपुढे राहणार आहे. १५-२० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहर शाखेच्या मंडळींना विश्वासात घ्यावे लागेल. नवीन शाखा ग्रामीण असली तरी निम्म्याहून अधिक मंडळी शहरातील आहेत. शहर आणि ग्रामीण असे संतुलन राखावे लागेल. ७२ वर्षांनंतर जळगावात नाट्य संमेलन होणार असेल तर या निमित्ताने जळगावात नाट्यगृह, सक्षम संस्था अशा पायाभूत सुविधा तयार होतील, ही सकारात्मक बाब आहे.