नितीशकुमार यांना राजकीय यश प्राप्त करून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे सध्या त्यांच्यापासून दुरावले आहेत. अनेकांना सल्ले देणाऱ्या किशोर यांची उणीव जदयूला भासू शकते. बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अजून कालावधी असला तरी तेथील लढाई तुंबळ असणार, याचे संकेत प्राप्त होत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राजदने सुरू केलेल्या ‘२०२० : फिनिश नितीश’ मोहिमेला चोख उत्तर देण्याकरिता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘२०२० : फिर से नितीश’ ही प्रतिमोहीम सुरू केली आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या नितीशकुमार यांनी जाहीर सभेत जदयू रालोआसोबत जाईल, अशी ग्वाही देतानाच २०० जागा जिंकू, असा दावा केला. बिहारमधील ब्राह्मण, ठाकूर व भूमिहार यासारख्या उच्च जातींची मतपेटी भाजपसोबत आहे; तर मुस्लीम, दलित व अनेक गोरगरीब इतर मागासवर्गीय जातींची मोट बांधून नितीशकुमार यांनी गेली १५ वर्षे सत्ता ताब्यात ठेवली आहे. जदयूने सीएए कायद्याला संसदेत पाठिंबा दिला आहे. एनआरसीची अंमलबजावणी ही बिहारमध्ये होणार नाही व सीएए व एनपीआरला विरोध करण्याची गरज नाही, असा अगदी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जसा पवित्रा घेत आहेत, तसाच नितीशकुमार यांनीही घेतला आहे. घोटाळ्यांच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेले लालूप्रसाद यादव हे वैद्यकीय कारणास्तव दिल्लीत मुक्काम हलवण्याची व इस्पितळातून निवडणुकीची सूत्रे हलवण्याची दाट शक्यता दिसत आहे. लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव हेच सध्या पक्षाची धुरा वाहत असले, तरी लालू यांचे सक्रिय होणे याचा अर्थ पुन्हा विधानसभा निवडणुकीत लढत नितीशकुमार विरुद्ध लालूप्रसाद अशीच होण्याची शक्यता आहे. यादव व मुस्लीम ही व्होटबँक राजदच्या मागे उभी करण्यात लालू व तेजस्वी यांना किती यश मिळते, यावर जशी बरीच समीकरणे अवलंबून आहेत, तशीच ती अनेक छोट्या इतर मागासवर्गीय जाती किंवा त्यांच्या पक्षाचे नेते यांची मोट कोण कशी बांधतो, यावर अवलंबून असतील. कन्हैयाकुमार हा फॅक्टरही बिहारच्या निवडणुकीत प्रभावी राहणार आहे.
फिनिश नितीश अन् फिर से नितीश, बिहारमध्ये कोणती मोहीम यशस्वी ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 05:05 IST