शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

जीवघेण्या बैठ्या खेळांतून मुलांना मैदानात उतरवा!

By विजय दर्डा | Published: August 28, 2017 3:04 AM

खोल समुद्रात आढळणारा ब्ल्यू व्हेल नावाचा मासा आत्महत्या करण्यासाठी पाण्याबाहेर किना-यावर येतो, अशी आख्यायिका आहे. याच सागरी माशाच्या नावावरून फिलिप बुदेकीन नावाच्या रशियन विद्यार्थ्याने ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ ..

खोल समुद्रात आढळणारा ब्ल्यू व्हेल नावाचा मासा आत्महत्या करण्यासाठी पाण्याबाहेर किना-यावर येतो, अशी आख्यायिका आहे. याच सागरी माशाच्या नावावरून फिलिप बुदेकीन नावाच्या रशियन विद्यार्थ्याने ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ नावाचा एक इंंटरनेट व्हिडिओ गेम तयार केला आहे. हा खेळ खेळणा-यास दररोज एक कामगिरी फत्ते करण्याचे आव्हान ठरवून दिले जाते. ही आव्हानात्मक कामे चित्र-विचित्र आणि धाडसी असतात. यात क्रेनवर चढण्यापासून स्वत:च्याच हातापायांवर चाकू किंवा ब्लेडने कापून घेण्यासारखी कामे सांगितली जातात.हा खेळ सन २०१३ मध्ये तयार झाला व तो इंटरनेटवर पोहोचलाही होता. पण हा खेळ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्यावर सन २०१५ पासून जगाचे लक्ष या खेळाकडे प्रकर्षाने गेले. सन २०१६ मध्ये या खेळातील आव्हान पूर्ण करण्याच्या नादात रशियातील १६ मुलांनी आत्महत्या केली आणि जग हादरले. बराच शोध घेऊन या जीवघेण्या खेळाचा जनक फिलिप यास अटक केल्या गेली. त्याने पोलिसांना सांगितले की, कॉलेजात तो मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. परंतु अभ्यासात लक्ष नाही म्हणून त्याला कॉलेजातून काढून टाकले गेले. त्यानंतर त्याने ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ हा गेम तयार केला.आज या खेळाचा एवढा अतिरेक झाला आहे की, रशियाखेरीज अर्जेंटिना, ब्राझिल, बल्गेरिया, चिली, चीन, इटली, केनिया, पोर्तुगाल, सौदी अरब, सर्बिया, स्पेन, अमेरिका व युरोपसह जगातील इतरही अनेक देशांमधील मुले या खेळातील ‘चॅलेंज’ पूर्ण करण्याच्या नादात प्राण गमावून बसली आहेत. भारतही यातून वाचलेला नाही. महिनाभरापूर्वी म्हणजे ३० जुलै रोजी मुंबईत एका १४ वर्षांच्या मुलाने उंच इमारतीवरून खाली उडी मारली. त्यानंतर १० आॅगस्ट रोजी इंदूरमध्येही सातव्या इयत्तेमधील एक विद्यार्थी अशाच प्रकारे शाळेच्या तिसºया मजल्यावरून उडी मारण्याच्या बेतात होता, पण आणखी एका विद्यार्थ्याने त्याला पकडून मागे खेचले म्हणून तो वाचला. त्याच दिवशी महाराष्ट्रात या गेमच्या वेडापायी आत्मघात करायला निघालेल्या एका १४ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी वाचविले. गेममध्ये दिलेले ‘चॅलेंज’ पूर्ण करण्यासाठी हा मुलगा घरातून निघून बसने पुण्याला यायला निघाला होता. प. बंगालच्या मिदनापूर शहरात इयत्ता १० वीच्या एका विद्यार्थ्याने याच खेळापायी आत्महत्या केली. डेहराडूनमध्येही प्राण द्यायला निघालेल्या एका मुलाला ऐनवेळी वाचविले गेले. ही सर्व मुले ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ या खेळातील ‘चॅलेंज’ पूर्ण करण्याच्या जीवघेण्या वेडाने झपाटलेली होती, असे त्यांच्या सहकारी व मित्रांनी दिलेल्या माहितीवरून दिसते.देशात एकापाठोपाठ एक अशा घटना समोर यायला लागल्यावर भारत सरकारही सावध झाले. ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ या गेमशी संबंधित सर्व लिंक तात्काळ बंद करण्याचा आदेश सरकारने गूगल, फेसबुक व याहू यांना दिला. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने केले. जगातील इतरही देशांत आता सावधपणे पावले उचलली जात आहेत. ब्राझिलमध्ये तर एका ग्रुपने या ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’शी लढण्यासाठी ‘पिंक व्हेल गेम’ तयार केला आहे. या पिंक व्हेल गेममध्ये खेळणाºयाला सकारात्मक कामगिरी पार करण्यास सांगितले जाते. परंतु मूळ मुद्दा असा आहे की, अशी वेळच का आली? माझ्या मते, याला मुलांचे आई-वडिलही बºयाच प्रमाणात जबाबदार आहेत. यासंदर्भात मी दक्षिण कोरियाचे उदाहरण देईन. तेथे ८० टक्क्यांहूनही जास्त मुले या इंटरनेट गेम्सच्या एवढी आहारी गेली आहेत की त्यांना आजूबाजूच्या वास्तव जगाची माहितीही नाही. त्याच वसाहतीत राहणाºया मुलांना ही मुले ओळखतही नाहीत. ही मुले मोठ्या संख्येने मानसिक आजारी होत आहेत. त्यामुळे या मुलांना मैदानावर खेळण्यासाठी घराबाहेर काढण्याची एक मोहिमच तेथील सरकारने हाती घेतली आहे. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, ही मोहीम यशस्वी व्हायला कित्येक वर्षे लागतील.भारताच्या बाबतीत बोलायचे तर आपली तरुण पिढी पाश्चात्य राहणीमानाने नको तेवढी प्रभावित होत आहे. इंग्रजी चित्रपट व इंटरनेट गेम ही त्यांची प्रमुख आकर्षणे आहेत. आई-वडिलांना वेळ नाही, त्यांचे मुलांकडे लक्ष नाही, हे याचे एक प्रमुख कारण आहे. मुलांनी अंगमेहनतीचे मैदानी खेळ खेळावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारेच कुटुंबात कोणी नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. मूल कॉम्प्युटरवर मग्न आहे व आपल्याला त्रास देत नाही, याचेच या पालकांना कौतुक आणि समाधान आहे. परंतु हा निष्काळजीपणा आपल्या पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे, हे ते विसरतात. मैदानावर खेळून मातीने माखून मुले घरी आली की नाके मुरडणारेही पालक आहेत!आमच्या पिढीच्या विद्यार्थीदशेत शारीरिक खेळ हा अभ्यासाचाच भाग असायचा व ते खेळ शाळेत आवर्जून खेळायला लावायचे. आजही शालेय अभ्यासक्रमात खेळांचा नावाला समावेश आहे. शाळेच्या वेळापत्रकात खेळासाठी ठराविक तासिका असतात. परंतु त्या तासाला मुलांना खेळायला घेऊन जाण्यासाठी किती शाळांकडे मैदाने आहेत? कागदोपत्री खेळांचे तास भरले जातात. वास्तवात मात्र मुले वर्गातच बसून असतात. देशभरात खेळाची मैदाने नसलेल्या शाळांची संख्या साडेसहा लाख असल्याची कबुली देशाचे क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच दिली आहे. खेळांच्या बाबतीत सरकारी पातळीवर एवढे औदासिन्य आहे की केंद्र व राज्य सरकारमध्ये ताळमेळच दिसत नाही. शाळांना खेळांची मैदाने असावीत, ही राज्य सरकारची जबाबदारी मानली जाते. खेळ आणि शारीरिक शिक्षण यांची शालेय शिक्षणाशी सांगड घालून एकात्मिक पाठ्यक्रम तयार करण्यासाठी एक सरकारी समिती नेमली गेली आहे. पण अशा समित्यांचे अहवाल यायला किती दिवस लागतात व अहवाल आल्यावरही ते कसे धूळ खात पडतात, हे आपण सर्वच जाणतो. मुलांना इंटरनेट गेम्सच्या आहारी जाऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी पर्याय शोधावा लागेल, मैदाने उपलब्ध करून द्यावी लागतील. मैदानी खेळांनी केवळ शरीरच तंदुरुस्त राहते असे नव्हे तर मानसिक विकास होतो, सामाजिक जबाबदारी व सांघिकभावना वाढीस लागते. एकाग्रता वाढते. जिंकण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याची जिद्द मैदानी खेळातूनच येते, हे नव्या पिढीला आणि त्यांच्या पालकांना पटवून देणे नितांत गरजेचे आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...देशाच्या अनेक भागांत आलेल्या भीषण पुरात हजारो लोकांचे प्राण वाचविणाºया राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) बहाद्दर अधिकारी व जवानांना माझा सलाम! सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस व सशस्त्र सीमा दल या अर्धसैनिकी दलांमधील अधिकारी व जवानांना घेऊन जेमतेम १० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘एनडीआरएफ’ने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. भूकंप येवो वा पूर अथवा अन्य नैसर्गिक आपत्ती येवो हे दल अल्पावधीत तेथे धावून जाते आणि जीवाची पर्वा न करता पूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य चोखपणे बजावते.

vijaydarda@lokmat.com