सण-उत्सव हे सामाजिक सौंदर्याचे प्रतीक

By विजय दर्डा | Published: October 7, 2019 05:20 AM2019-10-07T05:20:39+5:302019-10-07T05:28:56+5:30

वैभव, विद्या व विचारांनी तुम्ही परिपूर्ण व्हावे व तुमचे जीवन मंगलमय होवो.

The festival is a symbol of social beauty | सण-उत्सव हे सामाजिक सौंदर्याचे प्रतीक

सण-उत्सव हे सामाजिक सौंदर्याचे प्रतीक

googlenewsNext

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देवीच्या आराधनेचे महापर्व असलेल्या नवरात्रीच्या व वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो हा संदेश देणाऱ्या दसºयाच्या मनापासून शुभेच्छा. तुमचे जीवन प्रत्येक प्राकृतिक शक्तीने परिपूर्ण व्हावे, तुम्ही सन्मार्गाची कास धरावी, अशा सदिच्छा. देशातील सर्वमान्य व्यक्ती बलवान झाली तर देशाचीही शक्ती वाढेल. प्रत्येकाने सन्मार्गाचा अवलंब केला तर वाईट गोष्टींचे पारिपत्य करणे शक्य होईल. देश विकासाच्या मार्गावर आणखी वेगाने वाटचाल करेल.

बदलत्या काळानुसार या सण-उत्सवांचा झगमगाट नक्कीच वाढला आहे. परंतु भक्तीचे मूळ स्वरूप व त्यातून मिळणारा संदेश तोच कायम आहे. ईश्वराच्या खालोखाल माता पूज्य आहे. कारण आपल्याच एका अंशातून नव्या जीवाचे सृजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने तिच्यावर सोपविली आहे. त्या जगत्नियंत्याला प्रत्यक्षात कोणी पाहिलेले नाही. पण त्याची प्र्रतिनिधी असलेली आई आपण पाहिलेली असते. मातेची तुलना दुसºया कोणाशीही होऊ शकत नाही! म्हणूनच ख्यातनाम हिंदी कवी ओम व्यास ओम यांनी लिहिले आहे :
मां पृथ्वी है, जगत है, धुरी है
मां बिना
इस सृष्टि की कल्पना अधूरी है.

महालक्ष्मी, महासरस्वती व दुर्गामातेच्या आराधनेतून हाच संदेश मिळतो की, जीवनात धन-धान्य व वैभवाएवढेच विद्या व पावित्र्याला महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात याचा आपण कधी विचार करतो? खरं तर श्रीरामांनी माणसामाणसांत कधी धर्म, जातीचा भेदभाव केला नाही. त्यामुळे आपण तसा भेदभाव करणे ही श्रीरामांची खरी भक्ती होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सर्वांचेच रक्त लाल आहे व सर्वजण एकसारखे आहेत. सर्व धर्म एकतेचा संदेश देतात. राष्ट्राचा विचार एकतेचाच आहे व तो श्रेष्ठ आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज हे बंधुभावाचे प्रतीक आहे. प्रभू रामांचा उत्सव साजरा केल्याने श्रीराम प्रसन्न होणार नाहीत, हे समजून घ्यायला हवे.

ज्यांच्यावर राष्ट्राची जबाबदारी आहे त्यांनी तर हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. आपल्यालाही श्रीरामांसारखे व्हायचे असेल तर त्याच्याप्रमाणे आचरण करावे लागेल. नवरात्रीमध्ये नऊ कुमारिकांची पूजा करण्याची व त्यांना जेवू घालण्याची परंपरा आहे. याला कन्यापूजन म्हणतात. मुलींना आदराने वागविण्याचा संदेश देण्यासाठीच ही परंपरा रूढ झाली. परंतु दुर्दैवाने ही भावना कमी होताना दिसते. आजही देशाच्या अनेक भागांत व अनेक कुटुंबांत मुलींना भेदभावाची वागणूक मिळते. ही अनिष्ट सामाजिक वागणूक दूर करण्यासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांत आपण सक्रिय सहभागी व्हायला हवे. मुलींचा आदर करणे ही आपली संस्कृतीच आहे. परंतु काळाच्या ओघात वाईट गोष्टींचा पडलेला प्रभाव नष्ट करावाच लागेल. तरच नवरात्रीची आराधना सार्थकी लागली, असे म्हणता येईल.

आपण आपल्या थोर संस्कृतीचा डंका पिटतो, पण ही संस्कृती आपल्याला नेमके काय शिकविते हे समजून घ्यायला हवे. आपण पर्युषण पर्व साजरे करतो. गणेशोत्सव, महालक्ष्मी, नवरात्री, दसरा, दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, ओणम, ईद, नाताळ आणि गुरु नानकदेवांचे प्रकाशपर्व हे सर्व सण व उत्सव आपल्याला एक नवी दृष्टी, नवा विचार देत असतात. सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्यासाठी नाहीत. आपली चेतना जागृत करण्याचे, विचार श्रेष्ठ बनविण्याचे ते एक माध्यम आहे. शिवाय आपल्या सण-उत्सवांतून एक खास सामाजिक संदेशही मिळतो. आपण सण साजरा करतो तेव्हा सर्व कुटुंब एकत्र येते, समाज एकत्र येतो. आपल्यात अधिक जवळीक निर्माण होते. सर्वांनी मिळून आनंद साजरा केल्याने दु:खही वाटून घेण्याची भावना आपोआप निर्माण होते! एवढेच नव्हे या सण-उत्सवांचा एक आर्थिक पैलूही आहे. आनंदाच्या निमित्ताने सर्व लोक आपापल्या ऐपतीनुसार खर्च करतात, तो करता यावा यासाठी कष्टही करतात. यातूनच बाजारपेठांना बळकटी मिळते.

सध्या मी बडोद्यात आहे. गरबा ऐक्य व एकात्मतेचे कसे प्रतीक बनले आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. सुदैवाने येथे ‘युनायटेड वे’च्या गरबा कार्यक्रमात मला सहभागी होता आले. मातेच्या पूजनाची संधी मिळाली. येथे ४० हजार लोक एकाच वेळी गरबा खेळत आहेत. १५ ते २० हजार लोक प्रेक्षक म्हणून पाहत आहेत. अशा प्रकारे ८० हजार हात-पाय रंगीबेरंगी पोशाख परिधान करून मातेच्या भक्तीच्या तालावर गरबा करतात तेव्हा राष्ट्रीय ऐक्याचे एक अनोखे दर्शन होते. हाच आपला आशेचा किरण आहे. जगात असे अद्भुत दृश्य दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार!

तात्पर्य असे की, जीवनात सण-उत्सवांचे खूप महत्त्व आहे. ते नसतील तर जीवन नीरस होईल. आपल्याएवढे सण-उत्सव अन्य कोणत्याही देशात नाहीत, याचा खरं तर आपल्याला अभिमान वाटायला हवा. या दृष्टीने आपण जगात सर्वात भाग्यवान आहोत. पुन्हा एकदा दसºयाच्या भरपूर शुभेच्छा. वैभव, विद्या व विचारांनी तुम्ही परिपूर्ण व्हावे व तुमचे जीवन मंगलमय होवो.

 

Web Title: The festival is a symbol of social beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.