‘रेल्वे फॅमिली’!
By Admin | Updated: January 1, 2015 02:43 IST2015-01-01T02:43:05+5:302015-01-01T02:43:05+5:30
दोन्ही बाजूने बघतो नंतर रस्ता ओलांडतो. रेल्वेचेही तसेच आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ बघायचा आणि भविष्याचा वेध घेत रेल्वेचा गाडा हाकायचा आहे.
‘रेल्वे फॅमिली’!
दोन्ही बाजूने बघतो नंतर रस्ता ओलांडतो. रेल्वेचेही तसेच आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ बघायचा आणि भविष्याचा वेध घेत रेल्वेचा गाडा हाकायचा आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रेल्वेचे योगदान कसे वाढेल, भारतीय रेल्वेचे भविष्य काय असेल, याचेच चिंतन करतोय. आपण इतिहास वाचणार की इतिहास होण्याचा प्रयत्न करणार, या प्रश्नाचा गुंता यंदा सुटेल. रेल्वे वर्डक्लास करायची आहे.
ररोज तीन कोटी लोक रेल्वेतून प्रवास करतात. ही संख्या आम्हाला महत्त्वाची नाही. या सर्वांकडून रेल्वे सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ‘रेल्वे फॅमिली’ व ‘ग्राहक सुविधा’ ही संकल्पना यासाठी रूढ करीत आहोत. समस्यांचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत माझी आणि रेल्वे व तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या दोन्ही विभागांची सांगड घालून रेल्वेत होणारे नवे तांत्रिक बदल हे यंदाचे वैशिष्ट्य असेल. किती लोक रेल्वेबद्दल बोलतात, किती समाधानी आहेत, किती द्वेष करतात, आनंद कसा व्यक्त करतात, त्यांचा आनंद कोणत्या समस्येच्या उच्चाटनामुळे वाढेल, असा बहुविध शोध आम्ही घेत आहोत. कामकाजात सुसूत्रता आणताना लक्षात आले, की रेल्वेकडे दररोज २५ - ५० कोटींच्या मागण्या असणारी कामे येत असतात. तोट्यातच असणाऱ्या रेल्वेमध्ये या नव्या मागण्यांचा ताळमेळ तरी कसा लावायचा? सध्याच्या अंदाजात दररोज सहा लाख कोटींची आवश्यकता आहे, तर आठ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात कृती आराखडा असेल, पण ‘आऊट आॅफ बॉक्स’ संकल्पनांवर भर देणार आहोत. व्यावसायिक क्षमता व राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित करून नियोजन करीत आहोत. देशात रेल्वे ही क्रमांक एकची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याने दिवसनिहाय सुधारणांची दिशा पक्की केली आहे. नवे वर्ष रेल्वेतील बदलीची नांदी ठरेल. रेल्वे फायद्यात आणण्याचे आजवरचे प्रयत्न, झालेला दुरुपयोग आणि विद्यमान स्थिती स्पष्ट करणारी ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध होईल.
पुढच्या वर्षाचे लक्ष्य निर्धारित केले असून, पदभार स्वीकारताच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींना सोबत घेऊन रखडलेल्या अनेक रेल्वेपुलांचे मार्ग मोकळे केले. पूर्ण अहवालासाठी अजून दोन महिने लागतील. नव्या वर्षात अनेक मोठे संकल्प तडीस न्यायचे आहेत. पण सारी भिस्त गुंतवणुकीवर आहे! मुंबई - अहमदाबाद व हैदराबाद-मुंबई या मार्गावर बुलेट ट्रेनसाठी पाहणी व नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. जपान व चीनच्या दोन कंपन्यांच्या अहवालावर निर्णय होईल. कोचमधील आसने आरामदायी करण्यासोबतच अंतर्गत रचनाही बदलण्याचा विचार आहे. रेल्वेत विविध कामांसाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरातील गळती टाळण्यासाठी जलव्यवस्थापन सुरू केलं असून, मोजक्याच सुपरफास्ट रेल्वेगाड्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर पाणीविरहित शौचालयांचा प्रयोग करू. रेल्वेचे वेळापत्रक पाळण्यासाठी ‘डेली रिपोर्टिंग सिस्टीम’ सुरू झाली. देशातील १० रेल्वे स्थानकांचा एअरपोर्टसारखा विकास, मुंबईतील लोकलच्या वाढणाऱ्या फेऱ्या, दिल्लीहून पाच हायस्पीड ट्रेन, रेल्वे विद्यापीठ, कपडे धुण्यासाठी स्वयंचलित लाँड्री, यांत्रिक पद्धतीचे स्वयंपाकघर, मोबाइलवर तिकीट, राजधानी, शताब्दीमध्ये वायफाय, सर्वच धर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांचे पर्यटन सुधारण्यावर भर, महिला सुरक्षा आणि भयमुक्त प्रवासासाठी संबंधित पदे भरायची आहेत. एकूणच रेल्वे वर्ल्डक्लास करायची आहेच, पण त्यासाठी ‘रेल्वे फॅमिली’चा प्रमुख म्हणून साऱ्यांनी मदत करायची आहे.( शब्दांकन : रघुनाथ पांडे)
देशात ११ हजार मानवरहित फाटके आहेत. त्यातील अनेकांवर फाटके, काहींवर पूल बांधण्याचे ठरवले. अंतर्गत स्वच्छतेची आखणी केली. कालमर्यादेत प्रकल्प पूर्ततेसाठी योजना आखून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांची समिती नेमून ‘भ्रष्टाचारमुक्त रेल्वे व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती’ हा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला.
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री