गोव्यात ठिय्या मांडून बसलेल्या ‘भायल्यां’ची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 08:59 IST2025-08-02T08:58:10+5:302025-08-02T08:59:45+5:30

काही विदेशी नागरिक गोव्यात आल्यावर आपला पासपोर्ट जाळून इथेच मुक्काम ठोकतात. अशा विदेशी नागरिकांना गोव्यात राहावेसे का वाटते?

expulsion of the outsiders who live in goa | गोव्यात ठिय्या मांडून बसलेल्या ‘भायल्यां’ची हकालपट्टी

गोव्यात ठिय्या मांडून बसलेल्या ‘भायल्यां’ची हकालपट्टी

सदगुरू पाटील, संपादक ‘लोकमत’, गोवा

गोव्यावर पोर्तुगीजांची दीर्घकाळ राजवट होती. काही तालुके तर साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली राहिले. इतका प्रदीर्घ काळ गोवा पोर्तुगीजांची वसाहत बनून राहिल्याने साहजिकच युरोपियन संस्कृतीचा मोठा प्रभाव गोव्यावर पडला. पोर्तुगीज काळात बार्देश, तीसवाडी, सासष्टी, मुरगाव या चार तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धर्मांतरे झाली. ख्रिस्ती लोकसंख्या वाढत गेली, तरी गोव्यात धार्मिक सलोखा कायम राहिला, म्हणूनच जगभरातील लोकांना या प्रदेशाचे आकर्षण आहे. गोव्याची खाद्यसंस्कृती, इथला पाहुणचार, आदरातिथ्य, हिरवागार निसर्ग, रूपेरी वाळूचे किनारे, पांढरीशुभ्र चर्चेस, पोर्तुगीजकालीन घरे याचे आकर्षण विदेशी नागरिकांना कायम राहिले आहे. 

सत्तरच्या दशकाच्या आरंभी गोव्याने हिप्पी संस्कृती अनुभवली. फ्ली मार्केट कल्चर किनारी भागात रुजले. खा, प्या, मजा करा, असा संदेश देणाऱ्या कार्निव्हलसारख्या उत्सवांनी विदेशी पाहुण्यांचे आकर्षण वाढवले. सूर्य अस्ताला जातानाच्या कातरवेळी मांडवी नदीत किंवा मीरामारला  होणाऱ्या बोटीतील सफरी, त्यातले संगीत, खाण्यापिण्याची लयलूट  यामुळे गोव्याची लज्जत आणखी वाढते. 

१९६१ साली म्हणजे उर्वरित भारतापेक्षा चौदा वर्षे उशिरा गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. १९६१ सालापूर्वी जन्मलेले गोंयकार अधिकृतरीत्या पोर्तुगीज नागरिक! आजदेखील वार्षिक सरासरी पाच हजार गोमंतकीय व्यक्ती भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगालचे नागरिकत्व प्राप्त करतात.  नोकरी-धंद्यासाठी जाऊन युरोपमध्ये कुठेही स्थायिक होणे सोपे जाते; हा अर्थातच यामागचा हेतू!

या प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे गोव्यात येणारे आणि (बेकायदेशीररीत्या) इथेच राहून जाणारे विदेशी नागरिक. गोव्याच्या संस्कृतीशी काहीही संबंध नसलेल्या बाहेरच्या लोकांना गोव्यात ‘भायले’ असे म्हटले जाते. बेकायदा पद्धतीने निवास करणाऱ्या या विदेशी नागरिकांना शोधून त्यांची परत पाठवणी करण्याची ‘ऑपरेशन फ्लशआउट’ मोहीम गोवा पोलिसांनी हाती घेतली आहे. यावर्षी जूनअखेरीस एकूण ७७ विदेशी नागरिकांना शोधून काढले गेले. रशिया, बांगलादेश, युगांडा, युक्रेन, अर्जेंटिना इथून आलेले हे लोक व्हिसाची मुदत कधीची उलटून गेल्यावरही गोव्यात छुप्या पद्धतीने राहून वर विविध व्यवसाय करत होते. ४५ विदेशी महिलांची गोव्याहून नुकतीच मायदेशी परत पाठवणी केली गेली.

काही विदेशी नागरिक गोव्यात आल्यानंतर मुद्दाम आपला पासपोर्ट जाळून टाकतात. गोव्याहून परत जाण्याचा मार्ग ते स्वत:हूनच बंद करून टाकतात. सगळी कागदपत्रे नव्याने तयार करून त्यांना परत पाठवणे पोलिसांनाही शक्य होत नाही. त्यांच्यासाठी डिटेन्शन सेंटरची निर्मिती गोवा सरकारने केली आहे.  जे गोमंतकीय लोक अशा विदेशी व्यक्तींना घरे भाड्याने देतात किंवा जे व्यावसायिक हॉटेलच्या खोल्या देतात, त्यांच्यावरही कारवाई सुरू झाली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतर विदेशी नागरिकांनी गोव्यात राहू नये हा सरकारी यंत्रणेचा हेतू आहे; पण बेकायदा पद्धतीने पर्यटक गोव्यात राहतातच. ‘ऑपरेशन फ्लशआउट’ अंतर्गत विदेशी नागरिकांना शोधून काढून गोव्याहून परत त्यांच्या मायदेशी पाठवले जाण्याच्या या प्रक्रियेला आता वेग येतो आहे.

काही विदेशी नागरिक गोव्यात रेस्टॉरंट व्यावसायिक बनले आहेत. मूळ गोमंतकीयांच्या नावावर असलेली रेस्टॉरंट्स हे विदेशी नागरिक उपकंत्राटावर घेतात. त्यापोटी वार्षिक ठराविक रक्कम मूळ गोमंतकीय मालकाला देतात. काही रशियन नागरिक गोव्यात टॅक्सी व्यवसायातही घुसले आहेत. ते पर्यटकांची वाहतूक करण्याचे काम करतात. ड्रग्ज व्यवसायात शिरलेले परदेशी नागरिक अंमली पदार्थविरोधी विभागाकडून पकडलेही जातात. काही विदेशी नागरिक गोव्यात योगाचे प्रशिक्षकही बनले आहेत. गोव्यात पर्यटन धंदा चहूबाजूंनी वाढीस लागल्याचा लाभ या विदेशी नागरिकांनी लगोलग उचलला. काही विदेशी गोव्यात गेस्ट हाउसेस चालवतात, तर अनेक जण जलक्रीडा व्यवसायातही आहेत.  स्पा, वेलनेस सेंटर्स, इव्हेन्ट मॅनेजमेंट करणे ही कामेही विदेशी नागरिक करतात.

पर्यटक म्हणून येऊन इथेच राहून जाणारे आणि दीर्घकाळच्या बेकायदा वास्तव्यामुळे शिरजोर झालेले विदेशी लोक स्थानिकांना सलू लागले, त्यालाही काळ लोटला.  रशियन नागरिकांची वस्ती असलेल्या काही भागांमध्ये स्थानिकांना जायला मज्जाव झाल्याचे अनुभवही गोवेकरांना नवीन नाहीत. आता ऑपरेशन फ्लशआउटच्या निमित्ताने गोवा सरकारने या प्रश्नाच्या  मुळाशी हात घातला आहे. त्याला किती यश येते हे पाहायचे. 
    sadguru.patil@lokmat.com

Web Title: expulsion of the outsiders who live in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.