उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..!
By अतुल कुलकर्णी | Updated: August 10, 2025 11:49 IST2025-08-10T11:01:41+5:302025-08-10T11:49:07+5:30
उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याने महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याच्या भावना व्यक्त केल्या...

उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..!
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या इकडच्या, तिकडच्या लाडक्या भावांनो,आपले मनापासून अभिनंदन.
(इकडच्या म्हणजे सत्ता पक्षाच्या, तिकडच्या म्हणजे विरोधी गटाच्या.) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. त्यांना काँग्रेसने बसण्यासाठी सहावी रांग दिली. त्यामुळे इकडच्या, तिकडच्या लाडक्या भावांच्या भावना अनावर झाल्या. महाराष्ट्रात भलेही आपण एकमेकांच्या विरुद्ध भांडू. मात्र आपल्या नेत्याविषयी महाराष्ट्राबाहेर कोणी काही बोलले की आपल्या तळपायाची आग मस्तकात कशी जाते हे आपण यानिमित्ताने दोन्ही बाजूने दाखवून दिले. ते पाहून आमचा ऊर कौतुकाने भरून आला आहे. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दोन भावांचे छान भांडण सगळ्या महाराष्ट्राने पाहिले..! भांडण असावे तर असे...
अभिजात मराठी भाषेचा अभिमान असणारे दोन्ही भाऊ विविध उपमा, अलंकारांनी एकमेकांचे जे कौतुक करत होते, त्यामुळे मराठी भाषा किती समृद्ध आहे, याची प्रचिती सगळ्यांना येत होती... एक भाऊ दुसऱ्याला दुतोंडी गांडूळ म्हणाला... दुसरा भाऊ पहिल्याला गांजा म्हणाला... कोणी कोणाला भांडी घाश्या म्हणाले... कोणी एकाचा मेंदू काढला तर दुसऱ्याने डोक्यातली चीप काढली... तिकडच्याने इकडच्याला, “राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते...” अशी गाण्यातून शाब्बासकीची थाप दिली. या सगळ्यात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी चिमटे काढले नाहीत तर नवल... “हा तर महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे” असे ते म्हणाले. आपल्या विषयीचे हे प्रेम पाहून दिल्लीत बसलेल्या उद्धव ठाकरे यांचे डोळे भरून आलेच होते, तेवढ्यात ‘काँग्रेसने उद्धवना त्यांची जागा दाखवली’ असे शेलार म्हणताच, डोळे पुसायला काढलेला रुमाल उद्धवनी लगेच खिशात ठेवल्याचे ठाणे नरेश यांनी नाथांना सांगितल्याची माहिती आहे. उद्धवना मागे बसवल्याने महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याच्या भावना व्यक्त केल्या...
या भावना व्यक्त झाल्या हे एका अर्थाने बरेच झाले. मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षे रखडलेला आहे. ब्रह्मदेव आला तरी हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. त्यावेळी आम्हाला त्याची लाज वाटली नाही... अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचे आम्हाला काहीच वाटत नाही... नंदुरबार जिल्ह्यातल्या केलखाडी गावातली मुलं शाळेला जायला रस्ता नाही म्हणून झाडाची फांदी धरून नदी ओलांडतात... लातूर जिल्ह्यातल्या एका गावात शाळेला जाण्यासाठी थर्माकोलच्या मोठ्या शीटला नाव बनवून लहान मुलं जीव धोक्यात घालून नदी पार करतात... धाराशिव जिल्ह्यात मुलांना दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या सापडतात... आमदार लुंगी बनियान वर हॉटेलमधल्या वेटरला बडवून काढतो... भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली की लोक दोन टोकाला दोरी बांधून भर पावसातून ये-जा करतात... शहापूरच्या ग्रामीण भागातली मुलं शाळेसाठी बस द्या म्हणून पावसात भर रस्त्यावर आंदोलन करतात... टेंभुर्णा, वरखेडा या खामगाव तालुक्यातल्या गावात रेशनच्या दुकानात दिल्या जाणाऱ्या गव्हामध्ये युरिया, सिमेंट मिसळलेले असते... राज्यातल्या सर्व रस्त्यांची चाळणी झाली आहे... मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात बाळंतिणीला झोळी करून शहराला न्यावे लागते... हंडाभर पाण्यासाठी तिथल्या आदिवासींना रोज किमान चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागते... मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातून गोरगरीब रुग्ण येतात. उपचार मिळावे म्हणून ते अगतिकतेने डॉक्टरांच्या मागेपुढे फिरत राहतात... पैसे नाहीत म्हणून ॲम्ब्युलन्स मिळत नाही, अशावेळी एखादा गरीब बाप किंवा नवरा आपल्या मुलाचे किंवा बायकोचे प्रेत खांद्यावर घेऊन जातो... अशा कोणत्याही गोष्टीचे आम्हाला काहीच वाटत नाही... त्याची आम्हाला कधीही लाज वाटत नाही... यासाठी आमच्या भावना संतप्त होत नाहीत... शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन “त्यांना माफ करा” असेही आम्हाला म्हणावे वाटत नाही...
मात्र एखादा गोरगरीब टॅक्सीवाला आमच्या भाषेत बोलत नाही म्हणून आमच्या अस्मिता जाग्या होतात... आम्ही त्याला आमच्या पद्धतीने ‘समजावतो’... कोणाला, कुठे बसायला जागा दिली यावरून आम्ही संतप्त होतो... मराठी भाषेत डॉक्टरेट मिळवणाऱ्यालाही लाज वाटेल इतक्या उत्तम शब्दात इकडचे आणि तिकडचे एकमेकांचा उद्धार करतात... असे वागणाऱ्यांचा विजय असो... असे बोलणाऱ्यांचाही विजय असो... आणि दिवसभर ही सगळी करमणूक सोशल मीडिया, टीव्हीवर पाहणाऱ्यांचा तर त्यापेक्षा जास्त विजय असो...
तुमचाच, बाबूराव