जे मनाला भावतं, ते चांगलं गाणं... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:33 AM2018-08-23T09:33:09+5:302018-08-23T09:34:55+5:30

प्रत्येक संगीतप्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. ते सादर करण्याचं स्थान, व्यासपीठ वेगळं असू शकतं. त्याचा श्रोतृवर्ग वेगळा असू शकतो. परंतु त्यामुळे त्याचा दर्जा ठरवणं योग्य नाही.

every music has his own strengths a column by anand bhate | जे मनाला भावतं, ते चांगलं गाणं... 

जे मनाला भावतं, ते चांगलं गाणं... 

Next

- आनंद भाटे

संगीताच्या विविध प्रकारांबाबत गायक आणि श्रोते अशा दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा. संगीतक्षेत्र हे अमर्याद आहे. जगभरात वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आहे. ढोबळमानानं पाश्चिमात्य आणि भारतीय असे संगीताचे दोन प्रकार पडतात. भारतीय संगीतातही हिंदुस्थानी संगीत म्हणजे उत्तर भारतीय आणि कर्नाटकी किंवा दाक्षिणात्य संगीत असे दोन प्रमुख प्रकार आहेत. हिंदुस्थानी संगीतामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत असे अनेक  उपप्रकार आहेत. यातला अमूक एक प्रकार चांगला आणि दुसरा वाईट, एक उच्च-नीच असा भेद करता येत नाही. प्रत्येक संगीतप्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. ते सादर करण्याचं स्थान, व्यासपीठ वेगळं असू शकतं. त्याचा श्रोतृवर्ग वेगळा असू शकतो. परंतु त्यामुळे त्याचा दर्जा ठरवणं योग्य नाही. या मुद्यावर मी भर यासाठी देतोय, की बऱ्याचदा गायक आणि श्रोते या दोघांच्या बाबतीत असा भेदाभेद होताना दिसतो. काही गायकांचा असा सूर ऐकायला मिळतो, की  मी नुसतं नाट्यसंगीत गातो. मी सुगम किंवा शास्त्रीय संगीत गात नाही किंवा शास्त्रीय गायक शास्त्रीय संगीतच श्रेष्ठ आहे त्यामुळे मी बाकीचे गायनप्रकार गात नाही. काही श्रोतेही असं म्हणतात,  की मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं. काही जणांना शास्त्रीय संगीतच आवडत नाही. ते फक्त सुगम किंवा नाट्यसंगीताला पसंत करतात. खरं तर प्रत्येक प्रकाराचं संगीतप्रकाराला त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपापल्या जागी स्वतंत्र स्थान आहे. कुठलाही संगीतप्रकार असो, जे आपल्या मनाला भावतं अन् लक्षात राहतं ते चांगलं गाणं. शास्त्रीय संगीत असलं तरी ते भावपूर्ण असू शकतं. भाव हा फक्त भावगीत किंवा भक्तिगीतात नसतो. मनाला भावणारं गाणं कुठल्याही प्रकारचं असू शकतं. 

गायकांच्या दृष्टीनं सांगायचं, तर गायकांनी मी अमुक एक प्रकार गातो कारण तो श्रेष्ठ आहे अन् दुसरा कनिष्ठ आहे. अशा सीमारेषा त्यांनी आखून घेऊ नयेत. प्रत्येक गायनप्रकाराची आव्हानं वेगवेगळी असतात. शास्त्रीय संगीत जास्त अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) आहे. एखाद्या रागाचा नुसते आरोह-अवरोह म्हणजे तो राग नसतो. नुसत्या बंदिशींनीही राग बनत नसतो. या अमूर्ताला गवसणी घालण्यासाठी त्या रागाचं वातावरण निर्माण करणं, हे शास्त्रीय गायनप्रकारातलं खरं आव्हान आहे. रागसंगीत गाताना आपण जी प्रत्येक फ्रेझ घेतो, ती संबंधित रागवाचक असली पाहिजे, असं मानलं जातं. त्यातून रागाचं स्वरूप उभं राहिलं पाहिजे. मैफलीत शास्त्रीय संगीत गाताना गायकाकडं ‘सेटल’ व्हायला बराच वेळ असतो, असा गैरसमज बऱ्याचदा असतो. तो बरोबर नाही. जरी ख्याल मांडायला तुमच्याकडे तासभराचा अवधी असला तरी सुरुवातीच्या ‘फ्रेझ’पासून तो राग उभा राहिला पाहिजे. पहिल्यापासून ते रागस्वरूप मांडलं तर त्याचा खरा परिणाम साधला जातो. नाट्यसंगीताची वेगळी आव्हानं आहेत. नाटकात ते नाट्यपद कुठे येतं?  कुठल्या प्रसंगात येतं? त्यातून कुठला भाव श्रोत्यांसमोर पोहोचवायचा आहे, याचं भान असणं महत्त्वाचं आहे. बरीच नाट्यगीतं ही बंदिशींवर आधारित आहेत. तरीही बंदिश आणि नाट्यगीत सादर करणं, यात फरक आहे. नाट्यसंगीत लालित्यपूर्णरीतीने सादर केल्यास ते श्रोत्यांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचतं. काही नाट्यगीतं एकदम वरच्या सुरांपासून सुरू करावी लागतात. खालच्या सुरांपासून वरच्या सुरांपर्यंत सावकाश विस्तार करण्यासाठी वेळ नसतो. हे एक स्वतंत्र आव्हान असतं. 

मैफलीतलं आणि रंगभूमीवरील नाटकातलं नाट्यपद याचेही वेगळे पैलू आहेत. प्रत्यक्ष नाटकात काम करून नाट्यपदं गाताना वेगळी आव्हानं असतात. प्रत्यक्ष नाटकात गाताना बरंच भान बाळगावं लागतं. मुख्य म्हणजे नाटकात वेळेची काटेकोर मर्यादा असते. संपूर्ण नाटकाचा नाट्यपद एक भाग असतो. संगीत नाटकात पूर्वी खूप नाट्यगीतं असायची. आम्ही ‘संगीत सौभद्र’ करतो. त्यात पूर्वी शंभरावर नाट्यपदं होती. त्या वेळी पाच-सहा तास त्याचा प्रयोग चालत असे. आता संपादित स्वरूपात जे ‘सौभद्र’ आम्ही सादर करतो, त्यातही ३०-३२ नाट्यगीतं आहेत. त्यातली सर्वच गीतं रंगवून गात बसलो तर त्या नाटकाला काहीच अर्थ उरणार नाही. नाट्यगीत सादर करताना शेजारी कोणाला उद्देशून हे गाणं सादर करतोय, त्याचं भान असावं लागतं. संवादाचं वाक्य संपल्यानंतर ऑर्गनचा सूर मिळाल्याक्षणी गाणं सुरू करणं महत्त्वाचं असतं. या आव्हानांना सामोरे जाण्यातली मजा वेगळीच आहे. नाट्यसंगीतासह सुगमसंगीतात शब्दांना जास्त महत्त्व असतं. शास्त्रीय संगीतातही शब्दांना महत्त्व असलं तरी भावसंगीतात सुरांसह शब्दांचा भाव श्रोत्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचणं महत्त्वाचं असतं. भक्तिसंगीत-अभंग गाताना त्यातला भक्तिभाव लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. याचं भान गायकांनी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायक जेव्हा वेगवेगळे गायनप्रकार गातात तेव्हा त्यात त्या विविध प्रकारांची सरमिसळ करता कामा नये. नाट्यसंगीत गाताना त्यात बंदिशीसारख्या आलाप व ताना घेत बसलो तर ते नाट्यसंगीत राहणार नाही. शास्त्रीय संगीत गाताना तुम्ही कशी सुरावट घेता, कसा राग विकसित करता हे महत्त्वाचं असतं. ख्यालगायन करताना ठुमरीसारख्या नजाकतीनं जागा घेऊन चालणार नाही. या सीमारेषा पाळणं गायकासाठी महत्त्वाचं असतं. जो गायक सर्व प्रकार गातो, त्याच्या बाबत ही शक्यता असते. त्यानं हे भान बाळगलं पाहिजे. 

श्रोत्यांच्या दृष्टीनं सांगायचं तर संबंधित गाणं आपल्याला आवडतंय का, मनाला भिडतंय का, याचा विचार करावा. त्यासाठी शास्त्र कळणं गरजेचं नाहीये. याबाबत खूप गैरसमज आढळतात. विशेषत:  शास्त्रीय संगीतातलं शास्त्र कळत नाही म्हणून ते न ऐकणारे श्रोते असतात. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी व ते आवडण्यासाठी त्यातलं शास्त्र कळणं गरजेचं नाहीच. आपण पुरणपोळी खातो. ती करायला कठीण असते म्हणून आपण ती खायचं थांबवत नाही. आपल्याला ती आवडतेच. तिचा आस्वाद घेण्यासाठी ती कशी केलीये, हे समजणं गरजेचं नाही. तसंच शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजून उमजून रियाज तयारीनं सादर करणं, हे गायकांचं काम आहे. श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. श्रोत्यांच्या मनात एक प्रकारचा पूर्वग्रह असतो. त्यामुळे श्रोते शास्त्रीय संगीतापासून दूर राहून एका मोठ्या आनंदापासून वंचित राहतात. यासंदर्भात मी माझे गुरुवर्य आदरणीय भारतरत्न पं. भीमसेनजींचं उदाहरण देतो. त्यांनी शास्त्रीय संगीत अशा प्रकारे मांडलं, की शास्त्र कळणाऱ्या व न कळणाऱ्या श्रोत्यांनाही ते तितकंच भावलं. पूर्वी राजदरबारातील छोट्या मैफलींपुरते रागसंगीत सीमित असायचं. आता हजारो श्रोते या संगीताचा आनंद घेतात. अभिजनांपासून बहुजनांपर्यंत (क्लासेस टू मासेस) संगीत पोहोचणाऱ्या गायकांत पं. भीमसेन जोशी यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी ज्या प्रकारे शास्त्रीय संगीत सादर केलं त्यातून दोन मुद्दे प्रकर्षानं अधोरेखित होतात. एक म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकताना शास्त्र कळण्याची गरज नसते. दुसरा मुद्दा म्हणजे भावपूर्णता ही शास्त्रीय संगीतातूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकते. शास्त्रीय संगीत ऐकताना थोडा संयम बाळगावा लागतो हे खरं आहे. नाट्य किंवा सुगमसंगीत ज्याप्रमाणे पटकन आकर्षून घेतं, तसं शास्त्रीय संगीताबाबत नसतं. पण जर थोडं संयमानं शास्त्रीय संगीत ऐकलं तर त्या रागाचं वातावरण निर्माण होणं म्हणजे काय, त्यातली मजा काय आहे, सुरांची ताकद काय आहे, त्यातली अमूर्तता हळूहळू कळू लागते. त्यातली मजा काही औरच आहे, हे आपल्याला उमगू लागतं. 

Web Title: every music has his own strengths a column by anand bhate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.