सुंदर हास्यही पुरून उरते.. जीवनविद्या जगायची असते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 07:14 IST2025-07-10T07:13:55+5:302025-07-10T07:14:11+5:30

ज्येष्ठ निरुपणकार, जीवनविद्या मिशनचे नेते प्रल्हाद वामनराव पै यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवनकार्य आणि तत्त्वज्ञानाबद्दल..

Even a beautiful smile remains buried.. The science of life is to live! | सुंदर हास्यही पुरून उरते.. जीवनविद्या जगायची असते!

सुंदर हास्यही पुरून उरते.. जीवनविद्या जगायची असते!

प्रा. नयना रेगे, जीवनविद्या मिशन साधक

तुम्ही आनंद वाटता की दुःख 
हे तुम्हीच ठरवायचे असते,
लक्षात ठेवा, जीवनविद्या ही जगायची असते...

‘यू-ट्यूब’वर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे  प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून स्फुरलेली गुरुकिल्ली आहे.  जीवन युक्तीने कसे जगायचे याचे उत्तम मार्गदर्शन  प्रल्हाददादा गेली अनेक वर्षे करीत आहेत. हा युक्तियोग समजण्यासाठी  सद्गुरू वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान अभ्यासणे जरुरी आहे. सत्तर वर्षांहून अधिक कालावधी जीवनविद्या तत्त्वज्ञान केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात स्वीकारले जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जीवनविद्या हे केवळ अध्यात्मशास्त्र नसून ती जीवन जगण्याची कला आहे.  

सर्वसामान्य माणसाला मनःस्थिती बदलून परिस्थिती बदलण्याचा, सुखी जीवन जगण्याचा राजमार्ग सद्गुरूंनी दाखविला. लाखो लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली. वर्ष २०१२ मध्ये सद्गुरूंचे महानिर्वाण झाले. त्यानंतर प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनविद्येची धुरा समर्थपणे सांभाळली. आजमितीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी अशा विविध देशांमध्ये प्रल्हाददादा अनमोल मार्गदर्शन करीत आहेत.

प्रल्हाददादांनी आयआयटी पवई येथून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केले; तसेच जमनालाल बजाज या प्रतिष्ठित संस्थेमधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. जपान येथून टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंटदेखील त्यांनी पूर्ण केले आहे. कॉर्पोरेट जगात उच्च पदांवर कार्यरत राहून ते निवृत्त झाले. जीवनविद्येचे तत्त्वज्ञान त्यांनी सद्गुरूंकडून आत्मसात केले.  हे तत्त्वज्ञान रोजच्या जीवनामध्ये युक्तीने कसे वापरता येईल, याचे सखोल चिंतन केले. परमार्थातील ‘सच्चिदानंद स्वरूप’ हा कठीण विषय सर्वांत सोपा करून श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारे ते सांगतात.

गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात विविध कोर्स फॅकल्टीज तयार करून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा उपक्रम यशस्वी रीतीने राबविला जातो. आजवर अनेक विद्यार्थ्यांनी या कोर्समुळे सुंदर रीतीने आपले जीवन घडविले आहे. वृद्धापकाळात परमार्थाकडे माणसे  वळलेली आपण नेहमीच पाहतो; परंतु  प्रल्हाददादांच्या आजूबाजूला पाहिल्यास लक्षात येते की, जास्तीत जास्त तरुण मुले प्रभावित झालेली आहेत. कारण प्रल्हाददादा कर्मकांडात अडकवून न ठेवता युवकांच्या बुद्धीला पटणारे, रुचणारे विचार देतात. विवेक आणि विज्ञान यांची जोड करून विकास कसा साधता येईल यासाठी ‘यू-ट्यूब’वरून ‘प्रल्हाद पै स्पीक्स’ नावाचे वेबिनार, पॉडकास्टही त्यांनी सुरू केले आहे. या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण मुले त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी होत आहेत. आपल्या देशात उच्चशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत; परंतु ते ज्ञान योग्य रीतीने वापरून यशस्वी होण्याची युक्ती प्रल्हाददादा देतात. त्यामुळे ते ‘युथ मेन्टॉर’ म्हणून प्रसिद्ध आहेत.  प्रपंचाच्या अंगानेही ते अप्रतिम मार्गदर्शन करतात.

८ जुलै रोजी वयाची ७५ वर्षे त्यांनी पूर्ण केली. ‘जीवनविद्या’ या ॲपद्वारे आपले जीवन सर्वांगाने सुखी, समृद्ध करण्याची खात्री नक्कीच देता येते. हे ॲप  प्रल्हाददादांनी समाजाला समर्पित केले आहे. ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांती’ची असे त्यांचे घोषवाक्य आहे. कृतज्ञता केवळ शब्दांतून व्यक्त न करता आपल्या कृतीमधून कशी व्यक्त करावी, याची सुंदर युक्ती ते नेहमी देत असतात. कृतज्ञतेच्या विविध युक्त्या शिकून अनेक युवकांनी स्वतःची प्रगती साधली, चांगली नोकरी मिळविली, तर काहींनी व्यवसायात उत्तम प्रगती केली आहे. ही कृतज्ञता घरातील, घराबाहेरील विविध लोकांना जोडण्यासाठी, कौटुंबिक सौख्य टिकविण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. दादांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, ‘आनंद वाटण्यासाठी फार काही करायचे नसते, एक सुंदर हास्य पण पुरून उरते. लक्षात ठेवा, जीवनविद्या ही जगायची असते.’
    naynarege8jvm.@gmail.com

 

Web Title: Even a beautiful smile remains buried.. The science of life is to live!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.