शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 05:02 AM2019-11-12T05:02:58+5:302019-11-12T05:03:04+5:30

शेषन यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! ...

Eve | शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली

शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली

Next

शेषन यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! तोपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्यांना ठाऊक नसायचे! शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली.
देशातील निवडणूक प्रणालीचे चित्र आमूलाग्र बदलून टाकलेले माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचे रविवारी रात्री निधन झाले आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासास वळण देणारे आणखी एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील थिरुनेल्लई या लहानशा गावात जन्मलेल्या शेषन यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी, भारतीय प्रशासन सेवेतील सर्वोच्च असलेले ‘कॅबिनेट सेक्रेटरी’ हे पददेखील सांभाळले होते. शेषन हे किती कार्यक्षम अधिकारी होते हे त्यावरून स्पष्ट होतेच; मात्र दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होईपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक नसायचे. शेषन यांनी १९९० ते १९९६ अशी सहा वर्षे मुख्य निवडणूक आयुक्त हे पद सांभाळले. त्या अवघ्या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच अशी काही बदलून टाकली, की शेषन या नावाने सर्वसामान्य माणसाच्या हृदयातही घर केले. विशेष म्हणजे निवडणूक प्रणाली आमूलाग्रपणे बदलून टाकण्यासाठी शेषन यांनी सरकारकडे ना नव्या कायद्यांचा आग्रह धरला, ना नवे नियम केले! केवळ पूर्वीपासून अस्तित्वात असलेले कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच त्यांनी एक नवा अध्याय घडवला. आज तमाम राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना जिची सतत धास्ती वाटते ती आदर्श निवडणूक आचारसंहिता तर शेषन पदारूढ होईपर्यंत कुणाच्या गावीही नव्हती. देशातील अनेक भागांमध्ये, विशेषत: उत्तर भारतात, मतदान केंद्रांवर कब्जा करून हव्या त्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हावर शिक्के मारून मतपेट्या भरून टाकणे हा प्रकार राजरोसपणे होत असे.


गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या राजकीय पक्षांसाठी हे काम करीत असत. शेषन पदारूढ झाल्यानंतर हे सगळे चित्र बदलले. आज निवडणूक प्रणालीचा अविभाज्य भाग असलेल्या आदर्श आचारसंहिता, छायाचित्रयुक्त मतदार ओळखपत्र, निवडणूक खर्चावरील बंधनाची काटेकोर अंमलबजावणी इत्यादी बाबी ही शेषन यांचीच देणगी आहे. त्याशिवाय निवडणुकांदरम्यान दिसणारा मदिरेचा महापूर, मतांची खरेदी, प्रचारासाठी भिंती बरबटणे, कर्णकर्कश भोंग्यांचा वाट्टेल तसा वापर, प्रचारासाठी जाती-धर्मांचा आधार अशा अनेक गोष्टी बव्हंशी इतिहासजमा करून टाकण्याचे श्रेयही नि:संशयपणे शेषन यांचेच आहे. निवडणुका सर्वथा नि:पक्षपातीपणाने पार पाडण्यावर शेषन यांचा एवढा भर होता, की निवडणूक सुरू असताना सरकारी खर्चाने वर्तमानपत्रांना जाहिराती देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्य सचिवांचे त्यांनी जाहीररीत्या वाभाडे काढले होते. एवढेच नव्हे तर पदासीन असताना मुलासाठी निवडणूक प्रचार केलेल्या एका राज्यपालास त्यांनी चक्क राजीनामा देण्यास भाग पाडले होते.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांनी ‘मिरॅकल आॅफ डेमॉक्रसी : इंडियाज अमेझिंग जर्नी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, भारताच्या निवडणूक आयोगाचा इतिहास लिहायचा झाल्यास, त्याचे दोन भाग करावे लागतील - शेषनपूर्व युग, जेव्हा निवडणूक आयोग एक सरकारी विभाग म्हणून काम करीत असे आणि शेषन यांच्यानंतरचे युग, जेव्हा निवडणूक आयोग खºया अर्थाने स्वतंत्र झाला! शेषन यांच्या कामगिरीचा यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत गौरव होऊच शकत नाही. या देशात लोकशाही प्रणाली रुजविण्यात आणि वाढविण्यात अनेक थोर नेत्यांचा सहभाग लाभला; मात्र लोकशाही प्रणालीचा आत्मा असलेल्या निवडणुका खºया अर्थाने नि:पक्ष करण्यात आणि सर्वसामान्य नागरिकाचा लोकशाही प्रणालीतील विश्वास दृढ करण्याचे श्रेय नि:संशयपणे शेषन यांचेच आहे. या देशातील सर्वसामान्य माणूस त्यासाठी सदैव त्यांचा ॠणी असेल. भारतमातेच्या या थोर सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली!

Web Title: Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.