कोरोनाच्या आपत्तिकाळात महिलांवरील अत्याचाराची भर

By किरण अग्रवाल | Published: January 7, 2021 07:38 AM2021-01-07T07:38:58+5:302021-01-07T07:41:18+5:30

कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे.

Emphasis on atrocities against women during the Corona disaster | कोरोनाच्या आपत्तिकाळात महिलांवरील अत्याचाराची भर

कोरोनाच्या आपत्तिकाळात महिलांवरील अत्याचाराची भर

Next

- किरण अग्रवाल

कोरोनापासून संरक्षणासाठी अनेकविध लसी समोर आल्या असल्या तरी, अजूनही कोरोनामुक्ती दृष्टिपथात नाही, कारण काळजी व खबरदारी हा यातील महत्त्वाचा भाग आहे जो जनतेकडून तितक्याशा गांभीर्याने घेतला जाताना दिसत नाही.कोरोनाच्या महामारीने व्यवहार व वर्तनात अनेक बदल घडवून आणले आहेत, नवी जीवनशैली विकसित केली आहे हे खरे; पण यातील वर्तनात सुधारणावादी प्रयत्न अपेक्षित असताना काही कटू अनुभवही समोर येत आहेत हे दुर्दैवी म्हणायला हवे.  कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव राहिलेल्या गत वर्षात सक्तीच्या सुट्ट्या व लॉकडाऊनमुळे बहुतेकांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवावयास मिळाला याकडे कोरोनाची इष्टापत्ती म्हणून एकीकडे पाहिले जात असताना, दुसरीकडे याच काळात महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचा राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल पुढे आल्याचे पाहता आपत्तीमधील भर म्हणून त्याकडे पाहिले जाणे स्वाभाविक ठरावे.

कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे. अर्थात ही लस घेतल्यानंतरच्या परिणामांवरील चर्चांना वैद्यकीय आधाराने अगर संशोधनाच्या संदर्भाने जी काही उत्तरे द्यावयाची ती दिली जात आहेत व खुलासे होत आहेतही; परंतु कोरोनामुळे झालेल्या भल्याबुऱ्या परिणामांची जी चर्चा होत आहे व त्यात कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची जी बाब पुढे आली आहे, ती अधिक चिंतेची म्हणावयास हवी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका अहवालानुसार गेल्या २०२० या वर्षात महिलांच्या तक्रारींचे प्रमाण कमालीचे वाढले असून, ते त्यापूर्वीच्या सहा वर्षांचा आढावा घेता त्यात सर्वाधिक आहे. यातही कुटुंबातच झालेल्या छळवणुकीच्या तक्रारींचे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे.

उत्तर प्रदेश यात आघाडीवर असून, पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणारा महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. अर्थात, कुणाचा नंबर कितवा हा यातील मुद्दाच असू नये, तर कोरोना कालावधी हा वैद्यकीयदृष्ट्या अनेकांसाठी अडचणींचा ठरलेला असताना अनेक माता भगिनींसाठीही तो वेगळ्या अर्थाने त्रासदायी ठरला हे वेदनादायी आहे. हिंदीत ‘सोच बदलो, समस्या हल हो जायेगी’ असे म्हटले जाते; परंतु येथे तर समस्या कायम असतानाही सोच बदलताना दिसत नाही. समाजात वाढीस लागलेले वैचारिक अध:पतन यातून निदर्शनास यावे, कारण संकटाच्या काळातही काहींची उपद्रवी मानसिकता बदलताना दिसत नाही.

कोरोनाकाळात शासनातर्फे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सक्तीची सुटी मिळाली .त्यामुळे तो काळ कुटुंबाबरोबर घालवायला मिळाला म्हणून आपत्तीतही इष्टापत्ती घडल्याची भावना अनेक जण बोलून दाखवत आहेत. कामाच्या व्यापात मुलांकडे लक्ष देऊ न शकलेल्या पालकांनी या काळात मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घेतला, तर काहींनी वृद्ध माता-पित्यांसोबत वेळ घालवून समाधान अनुभवले. बहुतेकांनी मोबाइलद्वारे आपापल्या नातेवाईक व इष्ट मित्रांच्या ख्यालीखुशालीची विचारपूस केली, त्यातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावयास मदत झाली; पण दुसरीकडे ज्या माता-भगिनींना घरात कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत होते त्यांच्या त्रासात मात्र भर पडली. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय व बाजार बंद राहिल्याने पुरुष व शाळाही बंद असल्याने मुले घरातच होती, त्यामुळे तसाही गृहिणींवर कामाचा ताण वाढला होताच, त्यात त्यांच्या छळातही भर पडली म्हणायचे.

आपल्याकडील पुरुषप्रधानकी अशी की, काम वाढले म्हणून पुरुषांनी महिलांना घरकामात मदत केल्याचे प्रकार कमीच घडले असावेत; पण तरी अनेक भगिनींनी हा वाढीव ताण आनंदाने व सहर्ष स्वीकारला. पण याच अनुषंगाने काही भगिनींच्या वाट्याला मात्र छळवणुकीचा ताण आला, जो अन्याय, अत्याचाराचा होता हे दुर्दैवी. कोरोनाकाळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी वाढल्याची जी आकडेवारी पुढे आली ती म्हणूनच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने कोरोनाच्या भीतीपेक्षाही अधिक चिंतेत भर घालणारी म्हणायला हवी. कोरोनावरील लसी विकसित झाल्याने या विषाणूचा नि:पात घडून येईलच; परंतु समाजातील काही जणांच्या कुजक्या व सडक्या विचारांचा किंवा मानसिकतेतील बदल कसा घडून यावा, हाच खरा प्रश्न आहे.

Web Title: Emphasis on atrocities against women during the Corona disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.