शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 07:14 IST

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत.

अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उडी घेत इराणच्या फोर्डो, नतान्झ व इस्फहान येथील आण्विक स्थळांवर भीषण हल्ले चढवल्याने, मध्य पूर्व आशिया मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यापूर्वी इराण अण्वस्त्रे बनविण्याच्या नजीक पोहोचल्याचा आरोप करत, इस्रायलनेही इराणची राजधानी तेहरान आणि आण्विक स्थळांवर जोरदार हवाई हल्ले केले होते. इराणने अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार सोमवारी दुपारी सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर मोर्टार डागत हल्ला केल्याचे वृत्त आहे. 

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. इराणने त्या तळांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होताच! इस्रायलनेही सोमवारी पुन्हा एकदा फोर्डोला लक्ष्य केले आणि तेहरानमधील तुरुंगावरही हल्ला केला. 

इराणनेही सोमवारी इस्रायलवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. दुसरीकडे रशिया आणि चीन या महासत्ता अमेरिकेला इशारे देऊ लागल्या आहेत. त्यामुळे मोठे युद्ध पेटण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता ही केवळ एक लष्करी बाब राहिलेली नाही, तर ती ऊर्जा, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्थैर्याच्या दृष्टीनेही अतिशय संवेदनशील बाब बनली आहे. 

इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम कायमचा संपविण्याचा अमेरिका-इस्रायलचा उद्देश स्पष्ट दिसत आहे. इराण अण्वस्त्रसज्ज झाल्यास आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, असा इस्रायलचा युक्तिवाद आहे, तर कोणत्याही बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे नकोच, ही अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिका आणि इस्रायलला इराणमधील विद्यमान राजवटच नकोशी झाली आहे. 

इस्रायलने तर इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खामेनेई यांना संपविणे, हेच आपले ध्येय असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेने खामेनेई यांच्या हत्येची भाषा वापरली नसली, तरी त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेपाठोपाठ इराणलाही 'पुन्हा महान' बनवण्याचे वेध लागले असून, त्यासाठी इराणमधील राजवट बदलण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली आहे. 

या पार्श्वभूमीवर, इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केल्याने, तसेच इस्रायल व इराणचे परस्परांवरील हल्लेही सुरूच असल्याने केवळ मध्य पूर्व आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. इराण पोसलेल्या हमास, हिजबुल्ला किंवा हौती बंडखोरांचा वापर करून अमेरिका-युरोपात दहशत माजविण्याचा पर्यायही निवडू शकतो. 

त्यातच अमेरिकेच्या हल्ल्यांत इराणच्या आण्विक स्थळांचे फार नुकसान झाले नसल्याच्याही बातम्या येत आहेत. बहुधा त्यामुळेच इस्रायलने पुन्हा फोर्डोवर हल्ला चढविला आहे. दुसरीकडे अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक थांबविण्याचा इशाराही दिला आहे. 

जगातील खनिज तेलाची तब्बल २० टक्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. त्यामुळे इराणने खरेच असे पाऊल उचलल्यास, तेलाचा प्रचंड भडका उडणे निश्चित आहे. जे. पी. मॉर्गन या सुप्रसिद्ध वित्त संस्थेच्या अंदाजानुसार, त्या स्थितीत खनिज तेलाच्या दरांत सुमारे ७० टक्क्यांची वाढ संभवते. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भयंकर हाहाकार माजेल आणि तो टाळण्यासाठी पाश्चात्त्य देश इराणवर हल्ले करू शकतात. 

एकूणच युद्धाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता दिसत आहे. खनिज तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास जरी पोहोचले, तरी प्रचंड महागाई भडकून आर्थिक स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि प्रत्यक्षात ते १२५ डॉलरपर्यंत पोहोचण्याची आशंका आहे. त्यामुळेच मोठे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ, तसेच जपानसारख्या देशांनी युद्धबंदी आणि नव्या आण्विक करारासाठी वाटाघाटींचा आग्रह धरला आहे; परंतु जोपर्यंत इस्रायल हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणतीही चर्चा नाही, असा इराणचा ठाम पवित्रा आहे. दुसरीकडे, इराणच्या अण्वस्त्र उद्दिष्टांना कायमचा चाप लावणे आवश्यक असल्यावर अमेरिका-इस्रायल ठाम आहेत. 

हे युद्ध थांबते की अधिक पेटते, हे सध्या निश्चित नाही; परंतु संघर्ष आता केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक जागतिक संकटबिंदू ठरत आहे आणि होर्मुझच्या खाडीतून प्रारंभ होऊन जगभर त्याचे परिणाम लवकरच जाणवू शकतात ! 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धEconomyअर्थव्यवस्थाAmericaअमेरिका