‘वन मॅन आर्मीच्या’ दिशेने वाटचाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 04:41 AM2019-05-04T04:41:20+5:302019-05-04T04:42:10+5:30

सध्या देशावर राज्य करणारा सत्तारूढ पक्ष प्रत्यक्षात ‘वन मॅन आर्मी’ आहे का? सध्या तरी तसेच दिसून येते आहे. त्यांच्या एकाच नेत्याच्या डोळे दीपवून टाकणाऱ्या प्रकाशात अन्य सारे नेते झाकोळले गेले आहेत.

Editorial on Way towards 'One Man Army'? | ‘वन मॅन आर्मीच्या’ दिशेने वाटचाल?

‘वन मॅन आर्मीच्या’ दिशेने वाटचाल?

Next

डॉ. एस. एस. मंठा

सध्या देशावर राज्य करणारा सत्तारूढ पक्ष प्रत्यक्षात ‘वन मॅन आर्मी’ आहे का? सध्या तरी तसेच दिसून येते आहे. त्यांच्या एकाच नेत्याच्या डोळे दीपवून टाकणाऱ्या प्रकाशात अन्य सारे नेते झाकोळले गेले आहेत. वास्तवात लोकशाहीचा आभास दिसत असला, तरी प्रत्यक्षात अध्यक्षीय राजवट देशाचा ताबा घेत असून, सांसदीय लोकशाही पाठीमागे पडते की काय, असे वाटू लागले आहे. आपल्या देशातील संगीत, टेलीव्हिजन, चित्रपट, मीडिया आणि किरकोळ विक्रीच्या बाजारपेठा ज्या पद्धतीने उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्याचप्रकारे आपला देश राजकीय भूकंपाने ग्रस्त असल्याचे दिसत आहे, ते पाहता केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातही नवे कलाकार पदार्पण करताना दिसत आहेत आणि कुणाच्या लक्षात जरी येत नसले, तरी ते सगळे वरच्या पातळीवर असलेल्या शिल्पकाराकडून नव्या विचारांच्या प्रभावाखाली आलेले आहेत. लोकांचा इगो नष्ट करण्याचे काम सुरू असून, सत्तेचे केंद्र उत्तरेकडे सरकत असताना, ते केंद्र अजेय असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या बदलाच्या झंझावातामुळे सामान्य माणसे बाजूला फेकली गेली आहेत.


मानव समूहाच्या केंद्रभागी आणि त्याला वेढणाऱ्या बाह्य भागात चार प्रकारच्या माणसांचे वास्तव्य पाहावयास मिळते. कार्यक्षम, अतिकार्यक्षम, प्रतिक्रियावादी आणि कृतिशून्य हे ते चार प्रकार आहेत. त्यात परिस्थितीचे निर्माते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारे यांच्यापासून तर परिस्थितीचे परिणाम भोगणारे कृतिशून्य लोक अशी सलग एक स्थिती पाहावयास मिळते. या दोहोंमध्ये असलेली ९० टक्के पोकळी प्रतिक्रियावाद्यांकडून भरली जाते. राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत, त्याला तंत्रज्ञान हेच एकमेव कारण नाही, तर त्याला कारण लोक आणि त्यांची स्थानिक बुद्धिमत्ता ही जशी आहे तशीच या सर्वात उभे असलेले एक व्यक्तिमत्त्वही कारणीभूत आहे.
सध्या होत असलेल्या निवडणुकांची धूळ खाली बसल्यावर, टी.व्ही. चॅनेल्सकडून सध्याच्या निवडणुकीचे मूल्यमापन केले जाईल. या निवडणुकीच्या सफलतेचे श्रेय लोकांना, त्यांच्यातील विद्वतेला, लवचिकपणाला आणि संयमाला ते देतीलच, पण लोकशाहीलाही देतील, तसेच ईव्हीएम मशिन्सच्या यशाला, तसेच डिजिटल साधनांच्या वापरालाही ते देतील, पण या निवडणुकीची खरी हीरो एक व्यक्ती असेल, जिने सतत दोन महिने या खेळात रंगत आणली, मोकाट बैलांच्या दोन्ही शिंगांना पकडून त्याने त्याला नियंत्रणात ठेवले आणि तसे करताना प्रत्येक पक्षाच्या नेत्याला कस्पटासमान दूर फेकून दिले. त्याने निर्माण केलेला उन्माद सर्वांनीच बघितला आहे.


त्याने एखाद्या पंथ प्रमुखाचा दर्जा या काळात प्राप्त केला. त्याला पर्सनॅलिटी कल्ट म्हणणे म्हणजे त्याला नकारात्मक स्वरूप देणे झाले. त्याला लोकांचे स्वातंत्र हिरावून घेतल्याचा वास येतो. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा उदोउदो करताना खूप नियोजन आवश्यक असते. मग त्याला आत्मपूजन म्हणायचे की, आत्यंतिक आदराचे प्रदर्शन म्हणायचे? त्या व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक कार्य करण्याची कला आहे आणि कसेही करून विजय संपादन करण्याची अभिलाषा आहे. प्रत्येक प्रसंगाचा स्वत:साठी लाभ करून घेण्याची कला त्यांना साधली आहे. आपल्या एकपात्री प्रयोगाने ते देशाचा राजकीय इतिहास नव्याने लिहिण्याची तयारी करीत आहेत. तसे करताना मार्गात येणाºया प्रत्येकाचा विध्वंस करताना त्यांच्या विरोधकांची ते दमछाक करताना दिसत आहेत! एखाद्या मर्यादित क्षेत्रातील रोड शो असो की, विरोधकांच्या टीकेला तेवढ्याच प्रखरतेने तोंड देणे असो, ते स्वत:च सर्व आघाड्यांवर कार्यरत असलेले दिसतात. त्यांची ज्यांच्यासोबत स्पर्धा सुरू आहे, ते त्यांच्या आवाक्याने चकीत झालेले दिसतात. त्यांच्याकडून पुढे कोणती खेळी खेळली जाईल, याचा ते अंदाज करू शकत नाहीत.

त्यामुळे परिस्थितीचे लगाम हे सतत त्यांच्याच हातात दिसले. त्यांच्या विरोधकांना त्यांच्याशी स्पर्धा करताना अधिक स्मार्टपणा दाखविण्याची गरज आहे, अन्यथा त्यांची गणना ‘दे आल्सो रॅन’ या गटात होण्याची शक्यताच अधिक आहे. विरोधकांकडून बोलला जाणारा शब्द हा त्यांच्या स्पर्धकावर मात करणारा असण्यासाठी विरोधकांना आपल्या धोरणातच बदल घडवून आणावा लागेल. आपल्या लोकशाहीचे यश पंथनिष्ठा वाढविणाऱ्या नेत्यांचा प्रभाव कमी करण्यातच सामाविलेले आहे. या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना ‘जगा, काम करा, विकास करा, संघर्ष करा आणि एकजूट दाखवीत विजयी व्हा’ हा मंत्र दिला आहे, पण ही एकजूट कशी निर्माण होईल? अन्य पक्षांचा द्वेष करीत असताना, त्याचे रूपांतर पक्षाच्या नेत्यांचा द्वेष करण्यात होऊ शकते. राष्ट्रभक्तीच्या भावनेने झपाटलेल्या नेत्यांचे अनुयायी स्वत:ची युक्तिवाद करण्याची क्षमता गमावून बसण्याची शक्यता अधिक असते. त्यांना मग त्या एका नेत्यातच संपूर्ण राष्ट्राचे दर्शन घडू लागते. त्या नेत्याला सत्तेत राहण्यासाठी सतत लोकप्रियता संपादन करावी लागते, तेव्हा कुठे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी त्यांना मिळू शकते. अलंकारिक भाषेने वाहून जाण्याइतकी भारताची लोकशाही लेचीपीची तर नाहीच, पण देशभक्तीच्या भुलाव्याला तोंड देण्यासाठी ती बलाढ्यसुद्धा आहे, पण या सर्वांना अपयश आले, तरी अंतिमत: जनशक्तीचाच विजय होईल!

(लेखक बंगळुरू येथील एनआयएएस माजी चेअरमन, प्रोफेसर आहेत)

Web Title: Editorial on Way towards 'One Man Army'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.