घटलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण ही तर दिवाळीची खरी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:20 PM2018-11-11T13:20:22+5:302018-11-11T13:24:14+5:30

अंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख.

editorial view on Pollution free diwali in mumbai | घटलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण ही तर दिवाळीची खरी पहाट

घटलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण ही तर दिवाळीची खरी पहाट

विनायक पात्रुडकर

अंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख. गेल्या काही वर्षांपासून हा सण अबालवृद्धांना त्रास देणारा ठरत आहे. ध्वनी, वायू प्रदुषणाला हा सण बळ देत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या सणाचे महत्त्व लुप्त होऊन मुजोरी, उन्माद जन्माला आला. या उन्माला निर्बंध घालणे अत्यावश्यक होते. प्रशासन व पोलीस स्तरावर हे शक्य नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या सणाला त्याचे मुळ रूप देणारा आदेश दिला. दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडू शकता, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले. गेली अनेक वर्षे पर्यावरण प्रेमी पर्यावरणपूरक दिवाळीचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला न्यायालयाच्या आदेशाची साथ मिळाली आणि यावर्षी दिवाळी सण अपेक्षापेक्षा अधिक पारंपारिक पद्धतीने व कोणालाही त्रास देता साजरा झाला. याला अपवाद म्हणून रात्री १० नंतरही फटाके फोडण्याच्या घटना घडल्या. या घटना तुरळकच होत्या. त्याच्या तुलनेत ध्वनी व वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात घटले. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीपेक्षा या वर्षी प्रदुषण खूप कमी झाले. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. यासाठी न्यायालय, पर्यावरण प्रेमी व मुंबईकरांचे कौतुकच करायला हवे. शेवटी न्यायालयाचा मान राखणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

दिवाळीत होणारा कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेनेही तयारी केली होती. फटाके सर्वाधिक फोडले जात असलेल्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्यासाठी पालिकेने खास पथक तयार केले होते. त्यामुळे सकाळपर्यंत कचरा राहिला नाही. पालिकेच्या दक्ष कारभारालाही शब्बासकी द्यायला हवी. गेल्या तीन दशकाचा काळ बघितला तर उत्सावातील उन्माद व अतिरेक झपाट्याने वाढत गेला. मिरवणुकीतील डीजे, दहिहंडीचे थर यात स्पर्धा सुरू झाली होती. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहिहंडी फोडण्यासाठी लागलेल्या थराने सर्वाधिक उंची गाठली होती. येथील ध्वनी प्रदुषणानेही उच्चांक गाठला होता. अखेर ठाण्यातीलच डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात ध्वनी प्रदुषणाविरोधात जनहित याचिका दाखल केली. दहिहंडीतील उंच थरांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने या दोन्ही याचिकांची दखल घेत उत्सवातील ध्वनी प्रदुषणाला व दहिहंडीतील थरांना निर्बंध घातले. या आदेशामुळे टेंभीनाक्यावरील ध्वनी प्रदुषण कमी झाले व त्यासोबतच राज्यभरात उत्सव मिरवुणकांतील आवाजावर निर्बंध आले. आता तर उत्सवात मिरवुणकीत डीजे नकोच अशी भूमिका राज्य शासनानेही न्यायालयात मांडली. अशा प्रकारे हळूहळू का होईना उत्सवातील उन्माद कमी होऊ लागला आहे. नागरिकांनीदेखील स्वत:हून पर्यावरणपूरक उत्सावासाठी पुढाकार घेतला आहे. गणपतीच्या मुत्या, विसर्जन या सर्व गोष्टीतून पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. होळीला पर्यावरणपूरक रंग वापरले जात आहेत. उत्सवांचे अशाप्रकारे चित्र बदलत असताना मुंबईकरांनी या वर्षी पर्यावरणपूरक दिवाळीवर अधिक भर दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस व प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढेही नागरिकांनी उत्सावाचे मुळ स्वरूप कायम ठेवत सण आणि उत्सव साजरे करायला हवेत. कारण कोणाला त्रास देऊन उत्सव साजरे करणे हे  शोभण्यासारखे नाही. येणाऱ्या पिढीलाही ते आदर्श देणारे नाही.
 

Web Title: editorial view on Pollution free diwali in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.