अग्रलेख: जोहरान ममदानींच्या विजयाचा अर्थ! स्थलांतरित युवकाच्या विजयामुळे जगात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:58 IST2025-11-06T10:57:43+5:302025-11-06T10:58:20+5:30
अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहराच्या महापौरपदाची माळ ममदानींच्या गळ्यात

अग्रलेख: जोहरान ममदानींच्या विजयाचा अर्थ! स्थलांतरित युवकाच्या विजयामुळे जगात चर्चा
एखाद्या शहराच्या महापौरपदाची निवडणूक हा सर्वसाधारणत: केवळ त्या शहरवासीयांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय असतो; पण निवडणूक जर अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहराच्या महापौरपदाची असेल, एखाद्या स्थलांतरित, प्रगतिशील विचारांच्या मुस्लीम युवकाने दंड थोपटले असतील आणि येनकेनप्रकारेण त्याचा पराभव करायचाच, असा चंग हेकेखोर राष्ट्राध्यक्षाने बांधला असेल, तर ती निवडणूक जागतिक औत्सुक्याचा विषय होते! त्या स्थलांतरित युवकाच्या विजयामुळे तर आता तो जागतिक चर्चेचा विषय बनला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या जोहरान ममदानींच्या विजयाने केवळ न्यूयॉर्कच्या सत्ताकेंद्रात बदल घडवला नाही, तर अमेरिकन राजकारणाला नवी दिशा दिली आहे. कोणी सांगावे, कदाचित तो जागतिक राजकारणालाही कलाटणी देणारा क्षण ठरू शकेल. न्यूयॉर्कच्या महापौरपदासोबतच न्यू जर्सी आणि व्हर्जिनियाच्या गव्हर्नरपदीही डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे निकाल डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षासाठी स्पष्ट इशारा आहे. पाश्चात्य देशातील महापौर आपल्यासारखे नामधारी नसतात. त्यांना खूप अधिकार असतात. पोलिसही त्यांच्या अखत्यारीत असतात. ममदानींच्या विजयाचे महत्त्व, केवळ ते भारतीय वंशाचे किंवा मुस्लीम असल्यामुळे नाही; तर त्यांनी अमेरिकन महानगरांच्या राजकारणात कामगार, स्थलांतरित, तरुण, अल्पसंख्याक या वर्गांच्या भावना आणि आकांक्षा एकवटण्यात यश मिळवल्यामुळे आहे.
अर्थात त्यांचा विजय केवळ या वर्गांच्या बळावर झालेला नाही, तर त्यामध्ये सारासार विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बहुसंख्याकांचाही मोठा वाटा आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या नावाखाली जे काही चालवले आहे, ते देशाच्या भल्याचे नसल्याचे भान बहुसंख्याकांमधील बहुसंख्यांना आल्याचा संकेत, ममदानींच्या विजयाने दिला आहे. तो केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीही शुभ संकेत म्हणावा लागेल! जोहरान ममदानी हे पहिल्या पिढीतील स्थलांतरित पालकांचे मूल! त्यांचे वडील प्रसिद्ध आफ्रिकन विद्वान आणि विचारवंत महमूद ममदानी, तर आई जागतिक ख्यातीची भारतीय चित्रपटनिर्माती मीरा नायर!
घराण्यात राजकारणाची परंपरा नसतानाही त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. राजकारण म्हणजे सत्तेचा अधिकार नव्हे, तर जनसामान्यांच्या आवाजाला संस्थात्मक रूप देणे, ही त्यांची भूमिका! त्या बळावरच त्यांनी न्यूयॉर्कच्या कामगार, स्थलांतरित आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांनी ‘सर्वांना परवडणारे न्यूयॉर्क’ हा नारा दिला, वाढत्या घरभाड्याविरोधात, सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यासाठी आणि शहरी दारिद्र्याशी लढण्यासाठी ठोस धोरणे मांडली. त्यामुळे तरुण मतदार, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आकृष्ट झाले. गेल्या दशकातील अमेरिकन राजकारणावर नजर टाकल्यास, एक स्पष्ट प्रवाह दिसतो आणि तो म्हणजे स्थापित व्यवस्थेविरोधातील उठाव! बर्नी सँडर्स यांच्या प्रगतिशील विचारसरणीचा प्रभाव, अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझसारख्या तरुण नेत्यांचा उदय आणि आता ममदानींचा विजय, हे त्या प्रवाहाचेच पुढील टप्पे आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात गेल्या काही वर्षांपासून मध्यममार्गी आणि पुरोगामी या दोन प्रवाहांमध्ये संघर्ष चालू आहे. ममदानींच्या विजयानंतर या संघर्षात पुरोगामी विचारसरणीचे पारडे जड झाले आहे.
ताज्या निकालांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वप्नांपुढे मात्र प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांच्या धोरणांच्या विरोधात नाराजी वाढत आहे. अमेरिकेतील शहरी भागात, विशेषतः विविधतेने नटलेल्या महानगरांत, मतदारांना आता कट्टर राष्ट्रवादापेक्षा सामाजिक न्याय, समान संधी आणि पर्यावरणीय शाश्वती महत्त्वाची वाटू लागली आहे. अमेरिकन समाज केवळ गोऱ्या मध्यमवर्गीयांच्या हिताचे राजकारण मान्य करणार नाही; स्थलांतरित, कृष्णवर्णीय, आशियाई, लॅटिनो आणि इतर समुदाय आता त्यांची राजकीय ओळख ठामपणे पुढे नेत आहेत, हे ममदानींच्या विजयाने स्पष्ट केले आहे. हा विजय अमेरिकन भारतीयांसाठीच नव्हे, तर सर्व स्थलांतरित समुदायांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेच्या इतिहासात विविध वांशिक समुदायांना राजकारणात प्रवेश मिळवण्यासाठी दशके झगडावे लागले.
आता ममदानींच्या यशामुळे `स्थलांतरितांचे राजकारण’ हा नव्या राजकीय ऊर्जेचा स्रोत बनला आहे. हे परिवर्तन केवळ अमेरिकेतील सामाजिक न्याय चळवळीलाच नवा आयाम देणार नाही, तर जागतिक व्यवस्थेलाही नवी कलाटणी देण्यासाठी उत्प्रेरक सिद्ध होईल, अशी आशा वाटू लागली आहे!