संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:13 IST2025-12-22T07:09:57+5:302025-12-22T07:13:09+5:30
Nagar Parishad, Panchayat Election Results Maharashtra: राज्य पातळीवरील बड्या नेत्यांनी त्यांचे बालेकिल्ले टिकवून ठेवले, तर काहींचे ढासळले. विशेषत: वर्षभरापूर्वी आमदारकी मिळविलेल्या काहींना धक्का बसला.

संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत राज्य पातळीवरील बड्या नेत्यांनी त्यांचे बालेकिल्ले टिकवून ठेवले, तर काहींचे ढासळले. विशेषत: वर्षभरापूर्वी आमदारकी मिळविलेल्या काहींना धक्का बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरचा गड राखला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेसेनेचा प्रभाव असलेले टापू जिंकलेच, शिवाय पूर्वी जिथे शिंदेसेनेचा खूप प्रभाव नव्हता, अशा राज्याच्या विविध भागांतील नगराध्यक्षपदे जिंकून विधानसभेतील यशाची पुनरावृत्ती केली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्याचा बालेकिल्ला सांभाळून ठेवला. उत्तर महाराष्ट्रातही बऱ्यापैकी यश मिळविले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मोठे यश मिळविले, तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यात भाजपच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे. त्यांच्या वऱ्हाडात काँग्रेसला थोडे का होईना यश मिळाले, हे महत्त्वाचे.
महाराष्ट्राचा प्रदेशनिहाय विचार करता राज्याच्या सर्वच प्रदेशांमध्ये दणदणीत यश मिळविणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला, तर शिंदेसेनेने काेकणात व दक्षिण महाराष्ट्रात मुसंडी मारली. विदर्भाने पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांना दूर ठेवताना भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांवर विश्वास व्यक्त केला. मराठवाड्याने संमिश्र काैल दिला, तर उत्तर महाराष्ट्राने भाजपसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या झोळीत मतांचे दान टाकले. सत्ताधारी महायुतीचा विचार करता नगरपालिका व पंचायतींमधील यश किंवा अपयश हे पूर्णपणे पक्षांचे आहे. भाजप, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्रितपणे लढली नाही. उलट शक्य तिथे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्याची आणि त्यातून विरोधी महाविकास आघाडीकडे सरकारविरोधी मते जाऊ न देण्याची रणनीती अवलंबिण्यात आली. त्यामुळेच प्रचारादरम्यान तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध जहरी टीका केली. हा महायुतीमधील अंतर्गत वाद मतदारांना वाटले जाणारे एकमेकांचे पैसे पकडून देण्यापर्यंत पोहोचला. विशेषत: एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या पक्षांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा, शिवाय काही ठिकाणी दोघांपैकी कोणीतरी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. याउलट पक्षफुटीने जर्जर झालेली उद्धवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या स्थानिक पक्षांना जेमतेम यश मिळाले. हादेखील सत्तेचा परिणाम म्हणता येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा काैल तसाही नेहमी सत्ताधारी पक्षांकडेच जातो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हा निकालदेखील तसाच आहे. तरीदेखील या निवडणुका व निकाल, नऊ-दहा वर्षांनंतर झालेल्या निवडणुका, मतदार यादीतील घोळ, अनेक ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्याच्या निमित्ताने निवडणूक आयोगाची धरसोड वृत्ती, निकालाबाबत न्यायालयाचा हस्तक्षेप, तसेच निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचा घाऊक प्रवेश, निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर अशा अनेक कारणांनी आठवणीत राहतील. हा पैसा काही ठिकाणी जिंकला तर काही ठिकाणी जनतेने पैशाचा वापर उधळून लावला. याच कारणाने विरोधकांच्या दृष्टीने ही सत्ता-पैसा विरुद्ध जनमताची लढाई होती आणि सत्ताधाऱ्यांना सिद्ध करायचे होते की, विधानसभेचे अभूतपूर्व यश हा निव्वळ योगायोग नव्हता. महाराष्ट्र विधानसभेच्या जागा २८८ आणि निवडणूक झालेल्या पालिका व पंचायतींची एकूण संख्याही २८८ या सांख्यिकी योगायोगाच्या पार्श्वभूमीवर या निकालाचा अर्थ स्पष्ट आहे - भाजप हाच राज्यातील क्रमांक एकचा पक्ष आहे. दुभंगलेली शिवसेना आणि दुभंगलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीर गटांना पुन्हा मूळ गटांपेक्षा अधिक यश मिळाले आहे. मूळ पक्षातून बाहेर पडलेले गट सत्तेत असण्याचा हा परिणाम म्हणता येईल.
काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत आहे, हे या निकालाचे आणखी एक निरीक्षण. अर्थात, विदर्भाबाहेर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षचिन्हावर निवडणूक लढविण्याचे टाळले आणि त्यामुळे हा पक्ष प्रामुख्याने विदर्भामुळे जिवंत असल्याचे चित्र समोर आले. अर्थात, पालिका व पंचायतींची निवडणूक ही शहरी जनादेशाची सेमीफायनल आहे. राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक ही त्याची फायनल असेल. त्या निवडणुकीची अधिसूचना परवा मंगळवारी, २३ डिसेंबरला निघेल. महापालिकांच्या रूपाने सत्ताधारी व विरोधी पक्षांपुढे नवे मैदान व नवे आव्हान असेल. ते पेलताना महायुती व महाविकास आघाडी पुन्हा स्वबळ अजमावतात की या निकालाचा संदेश घेऊन मैत्रीच्या प्रयत्नांना गती देतात, हे पाहावे लागेल.