रॉबर्ट गिल यांचे पणतू जेव्हा मधुचंद्रासाठी अजिंठ्याला येतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:25 IST2025-12-10T08:24:53+5:302025-12-10T08:25:24+5:30

अजिंठ्यातील वारसा जगभर पोहोचवणारे चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांचे पणतू डॉ. केनेथ यांनी सपत्नीक पणजोबांच्या वारशाला अभिवादन केले, त्यानिमित्ताने!

Editorial Special Articles When Robert Gill's great-grandchildren come to Ajanta for their honeymoon | रॉबर्ट गिल यांचे पणतू जेव्हा मधुचंद्रासाठी अजिंठ्याला येतात..

रॉबर्ट गिल यांचे पणतू जेव्हा मधुचंद्रासाठी अजिंठ्याला येतात..

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत

छत्रपती संभाजीनगर

अजिंठा लेण्यातील भित्तीचित्रांना जगभर प्रसिद्धी मिळवून देणारे मेजर रॉबर्ट गिल यांचे पणतू डॉ. केनेथ डुकाटेल यांनी मधुचंद्रासाठी अजिंठा लेणी परिसराची निवड करून लोककथेत वर्णिलेल्या पारो आणि गिल यांच्या अलौकिक प्रेमकथेला एक भावनिक वळण दिले आहे. केनेथ यांची ही भेट केवळ योगायोग नव्हे, तर इतिहासाशी, पिढ्यांशी आणि वारशाशी संवादसेतू बांधण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. ते भित्तीचित्रांसमोर उभे राहिले, तेव्हा आपल्या पणजोबांच्या कठोर परिश्रमांचा आणि समर्पणाचा अभिमान त्यांच्या अंत:करणात दाटून आला. ‘माझ्या पणजोबांनी हा अनमोल वारसा जगभर पोहोचवला, ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे,’ असे भावपूर्ण उद्गार आपसूकच त्यांच्या तोंडून निघाले.

अजिंठा लेणी ही केवळ पुरातन गुहा-रचना नसून भारताच्या सांस्कृतिक वैभवाची अद्वितीय संपदा आहे. बुद्धांच्या करुणाशील तत्त्वज्ञानातून साकारलेली ही दोन हजार वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे आजही  सौंदर्य, तांत्रिक प्रगल्भता आणि मानवतावादी विचारसरणीमुळे जागतिक कलाविश्वाला चकित करतात. या कलेची आंतरराष्ट्रीय ओळख प्रस्थापित करण्यात मेजर गिल यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. गिल यांनी जवळपास तीन दशके अजिंठ्यात घालवली. उष्ण हवामान, वन्यजीवांचा वावर, मर्यादित सुविधा यांच्याशी झुंज देत त्यांनी हा अनमोल ठेवा जगासमोर खुला केला.  मेजर गिल यांनी अजिंठ्यातील २९ लेण्यांतील अनेक चित्रांचे प्राणप्रतिष्ठेसारखे सूक्ष्म, जिवंत आणि भव्य पुन:चित्रण केले. त्यांच्या कुंचल्यातूनच अजिंठ्याची दुनिया लंडन, पॅरिस, रोमपर्यंत पोहोचली!

इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. सहावे शतक या कालखंडात विकसित झालेल्या अजिंठ्याने भारतीय तसेच मध्य आशियाई आणि युरोपीय कला-परंपरेवर दीर्घकालीन प्रभाव टाकला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ही लेणी झाडाझुडपांच्या आच्छादनाखाली जवळजवळ हरवून गेली होती. अशा परिस्थितीत भित्तीचित्रांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी प्रगल्भ कलासंवेदना आणि प्रशासकीय शिस्त असलेली व्यक्ती आवश्यक होती, ती जबाबदारी मेजर गिल यांनी समर्थपणे निभावली.

१८४४ मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीने मेजर गिल यांच्यावर या संपूर्ण कार्याची जबाबदारी सोपवली. दमट आणि अंधाऱ्या गुहांमध्ये तेलदिव्यांच्या अपुऱ्या प्रकाशात, शतकानुशतकांच्या बुरशीच्या थरांशी झुंज देत त्यांनी भित्तीचित्रांच्या पुनर्रचनेचे महान कार्य पार पाडले. दगडी संरचनेतील सच्छिद्रता, ओलावा, हवामानपरत्वे होणारे रंगदोष या सर्वांचे त्यांनी केलेले सूक्ष्म वर्णन आजही संवर्धनशास्त्रातील मान्यताप्राप्त संदर्भ मानले जाते. त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे इंग्लंडमधील प्रदर्शन युरोपमध्ये अजिंठ्याबद्दल अभूतपूर्व आकर्षण निर्माण करणारे ठरले.  १८६६ मधील क्रिस्टल पॅलेस येथील आगीत त्यांच्या अनेक कलाकृती नष्ट झाल्या, तरीही त्यांची जिद्द अबाधित राहिली आणि त्यांनी हे कार्य नव्याने सुरू करण्यासाठी पुन्हा अजिंठ्यात प्रस्थान केले.

जवळपास २७ वर्षे ते अजिंठ्याजवळ राहून काम करत होते. तप्त उन्हाळा, कोंदट वातावरण, वन्यप्राण्यांचा सामना, साहित्य मिळविण्याच्या अडचणी अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी एकाग्रतेने काम केले. त्यांनी  विशाल आकारमानाची तैलचित्रे तयार केली. काही चित्रे तर २० फूट लांबीची! गिल यांची चित्रे केवळ अजिंठ्यातील भित्तीचित्रांची प्रतिकृती नव्हती, तर ती प्राचीन भारतीय कला आणि सौंदर्याची अत्यंत अचूक पुनर्रचना होती. त्यात जातक कथांचे प्रसंग, बोधिसत्त्वांचे सुसंस्कृत चित्रण, पौराणिक काळातील दरबारी जीवनवैभवाचे सूक्ष्म चित्रण आहे. त्यांच्या चिकाटीने, कलात्मक गुणवत्तेने आणि समर्पणाने अनेक मौल्यवान भित्तीचित्रे इतिहासाच्या पडद्याआड जाण्यापासून वाचवली.

अजिंठ्यातील सांस्कृतिक वारसा जतन करत असतानाच गिल यांच्या कलासक्त मनाला हळुवार प्रेमाची पालवी फुटली. अजिंठ्यातील दीर्घ वास्तव्यामध्ये त्यांच्या आयुष्यात हळुवारपणे  स्थानिक आदिवासी समाजातील एका तरुणीचा प्रवेश झाला. पारो तिचे नाव. पारोची निरागसता, स्वाभाविक कष्टाळुपण आणि निसर्गाशी जुळलेली तिची सहजसंवादी वृत्ती याकडे गिल आकृष्ट झाले. भाषा, वर्ण, परंपरा यांचे भेद त्यांच्यात कधीच अडथळा ठरले नाहीत. ब्रिटिश अभिलेखांमध्ये या संबंधांचा औपचारिक उल्लेख नसला तरी अजिंठ्याच्या परिसरातील लोककथांमध्ये या प्रेमसंबंधांची स्मृती आजही जिवंत आहे. अजिंठ्याच्या दऱ्या-खोऱ्यात आजही लोककथेतील या विलक्षण प्रेमककथेचा दरवळ अनुभवता येतो. अजिंठ्यात पारोचा चबुतरा बांधून आदिवासी समाजाने रॉबर्ट गिल आणि पारोच्या स्मृती जतन केल्या आहेत. मेजर गिल यांचे पणतू डॉ. केनेथ डुकाटेल यांच्या अजिंठा भेटीने या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

                nandu.patil@lokmat.com

Web Title : रॉबर्ट गिल के परपोते हनीमून के लिए अजंता आए: एक प्रेम कहानी

Web Summary : मेजर रॉबर्ट गिल के परपोते डॉ. केनेथ डुकाटेल ने अपने पूर्वज की विरासत और पारो और गिल के प्रेम की स्थानीय किंवदंती का सम्मान करते हुए अजंता में हनीमून मनाया। उन्होंने अजंता की कला को संरक्षित करने में अपने परदादा के समर्पण को स्वीकार किया, जो भारत की सांस्कृतिक विरासत का प्रमाण है।

Web Title : Robert Gill's Great-Grandson Visits Ajanta for Honeymoon: A Love Story

Web Summary : Major Robert Gill's great-grandson, Dr. Kenneth Ducatel, honeymooned at Ajanta, honoring his ancestor's legacy and the local legend of Paro and Gill's love. He acknowledged his great-grandfather's dedication in preserving Ajanta's art, a testament to India's cultural heritage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.