भारताने गप्प राहण्याचे दिवस आता संपले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:32 IST2025-07-01T08:32:07+5:302025-07-01T08:32:50+5:30
पश्चिमेकडील मुत्सद्दी आणि माध्यमांशी भारताचा संवाद असला पाहिजे. गप्प राहिलो तर अपप्रचार करणाऱ्यांचे फावते, बोलत राहिलो तर हा प्रचार रोखला जातो.

भारताने गप्प राहण्याचे दिवस आता संपले !
शशी थरूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार
पहेलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने त्याला दिलेले उत्तर याच्या नंतरच्या कवित्वाने देशाच्या परराष्ट्र धोरणाला सटिक वळणावर आणून ठेवले आहे. तत्काळ झालेली लष्करी कारवाई निर्णायक होतीच; त्याचप्रमाणे नंतरची कूटनीतीही तितकीच महत्त्वाची होती. आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविणे आणि जगाचा या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार करणे आवश्यक होते. गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिका या पश्चिमेकडच्या पाच देशांत सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना मला खूप काही शिकता आले. विविध राजकीय पक्षांचे, विविध राज्यांतून आलेले, भिन्नधर्मीय खासदार आमच्या शिष्टमंडळात होते. दहशतवादाशी लढा आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रश्न असेल तर भारत एका आवाजात बोलतो, हे त्यातून अधोरेखित झाले.
देशातील राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन भारताचा सामूहिक निर्धार एकमुखाने व्यक्त झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’मागचे प्रमुख उद्दिष्ट, दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यामागील भूमिका, ते करताना पाळलेला संयम, नागरिकांना त्रास होणार नाही, इतकेच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याच्या यंत्रणेला कुठे धक्का लागणार नाही याची घेतली गेलेली काळजी हे सगळे आम्हाला जगाच्या निदर्शनास आणून द्यावयाचे होते. सीमेपलीकडून सातत्याने होत असलेल्या दहशतवादाविरुद्ध भारताने वैध अशी कृती कशी केली हे आम्ही विशद केले. अनेक देशांच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात त्यातून बदल झाला. वस्तुस्थिती शांतपणे आणि नेटाने मांडली तर गैरसमज दूर होतात; सहेतुकपणे केलेला अपप्रचार पुसला जातो हेच यातून दिसले. पाकिस्तान दहशतवादाला कायम पाठिंबा देत आलेला आहे याकडे या शिष्टमंडळांनी लक्ष वेधले. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या भेटीगाठी यासंदर्भात महत्त्वाच्या ठरल्या. पाकिस्तानचे शिष्टमंडळही त्यावेळी तेथे होते. त्यांना भेटलेले अमेरिकेचे अधिकारी तसेच अमेरिकेचे अन्य प्रतिनिधी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेशी सहमत होते असे आम्हाला आढळले.
ट्रॅडिशन, टेक्नाॅलॉजी आणि ट्रेड अशा तीन ‘टीं’चा मी पुरस्कार करतो. नवा भारत जगासमोर न्यायचा असेल तर या तीन गोष्टी एकत्र आणायला हव्यात. माहिती तंत्रज्ञानातील भारताची कुशलता मान्यता पावली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा वापर आपल्या राजनैतिक स्वरूपाच्या प्रयत्नात झाला पाहिजे. हा मुद्दा केवळ आर्थिक वाढीशी निगडित नसून भारत प्रतिभावंतांचा, प्रश्नांची उत्तरे शोधून देणारा, जगाच्या प्रगतीला हातभार लावणारा देश आहे हे आपण दाखविले पाहिजे. राजनैतिक पातळीवरील प्रयत्नात आर्थिक संधींची सांगड सुरक्षिततेविषयी वाटणाऱ्या चिंतेशी घातली गेली पाहिजे. भारत आपल्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करतो. दहशतवाद तसेच युद्ध हे त्यात अडथळा आणणारे पण टाळता येणारे घटक आहेत असे आम्ही मानतो. पाकिस्तानने आम्हाला आमच्या लोकांचे भले करू द्यावे एवढेच आम्हाला हवे आहे. मात्र त्यांनी खोडी काढली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. प्रत्येक हल्ल्याची किंमत मोजायला लावू, हाच आपला संदेश असला पाहिजे.
स्वतःहून पुढाकार घेऊन साधलेल्या राजनीतीचे महत्त्व या दौऱ्यातून समोर आले. ज्या ज्या देशांमध्ये आम्ही गेलो तेथे आमचे स्वागत झाले आणि अधून- मधून खासदारांची शिष्टमंडळे अशीच पाठवत जा अशी विनंतीही केली गेली. कायदा करणारे आणि सरकारचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही विचारवंत, धोरणांवर प्रभाव टाकणारे लोक आणि राष्ट्रीय माध्यमांशी बोललो. माध्यमातून मिळालेली चांगली प्रसिद्धी, विदेशी प्रतिनिधींशी संवादाचा दर्जा यातून जगाला भारत समजून घेण्याची इच्छा आहे दिसले. पश्चिमेकडील आणि महत्त्वाच्या माध्यमांशी आपला खोलवर आणि सतत संवाद असण्याची गरज त्यातून अधोरेखित झाली. आपण गप्प राहिलो तर अपप्रचार करणाऱ्यांचे फावते आणि बोलत राहिलो तर हा प्रचार रोखला जातो. आपले म्हणणे नेमकेपणाने मांडता येते.
या अनुभवातून काही शिफारशी कराव्याशा वाटतात. दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आपण राजनैतिक संबंध वाढवले पाहिजेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी, भाषेतील अडसर दूर करून तेथील वकिलाती अधिक बळकट करायला हव्यात. बहुराष्ट्रीय पातळीवर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आमसभेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे; विशेषत: दहशतवादाच्या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका असणाऱ्या माध्यमांशीही बोलले पाहिजे. ब्रिक्सच्या आगामी शिखर बैठकीत आपले पंतप्रधान ब्राझीलच्या पंतप्रधानांना भेटणार आहेत. उभयपक्षी नाते दृढ करण्यासाठी या भेटीचा उपयोग करून घेतला पाहिजे. पायाभूत क्षेत्राचा विकास आणि तेलसाठे नव्याने सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गयानाशीही भारताने संबंध दृढ केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्साह दाखवतात; संवाद साधतात. जागतिक व्यासपीठावर भारतासाठी ही फार मोठी जमेची बाजू आहे.
त्याला अधिक बळ मिळाले पाहिजे. आधी उल्लेखलेल्या तीन ‘टीं’चा उपयोग करून घेऊन सुयोग्य, सुरक्षित आणि प्रगत अशा जगासाठी प्रयत्न केले पाहिजेत.