सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:41 IST2025-07-01T08:39:08+5:302025-07-01T08:41:31+5:30
आपल्या ‘कोल्हापुरी चपले’ची कहाणी आपण जगाला सांगणार नसू, तर मग तिला रॅम्पवर मिरविणाऱ्या ‘प्राडा’च्या नावाने बोंब ठोकण्याचा काय अधिकार?

सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
भूषण कांबळे, संस्थापक, ‘वहाण’
एक-दोन दिवसांपूर्वी अचानक भराभर मेसेजेस येऊ लागले, सगळे एका पाश्चिमात्य ब्रांडबद्दल बोलत होते. - Prada. इथले-तिथले फोटो आणि व्हिडीओच्या भरमसाठ लिंक्स आलेल्या. सगळ्या फोटो-व्हिडीओमध्ये एक फॅशन शो सुरू आहे इटलीच्या मिलानमध्ये. प्रकाशानं भरलेल्या रॅम्पवर मॉडेल येतो. टी-शर्टवर टोपी आणि पायात एकदम ओळखीची लेदर अंगठा-पट्टी चप्पल. तिथून सगळ्या इतक्या साऱ्या मेसेजेसचा उलगडा व्हायला सुरुवात झाली. पहिला विचार काही आला असेल, तर हाच - ‘अरे, ही तर आपली कोल्हापुरी वहाण!’
पुढे उत्सुकतेने मग इंटरनेटवर शोधाशोध सुरू झाली. एकदम भारी वाटत होतं. आपली कोल्हापुरी मिलान फॅशन शोमध्ये पोहोचली! ‘प्राडा’सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडने या कारागिरीची दखल घेतली. ऊर आनंदाने भरून आलेला. बराच वेळ आनंदाने शोधत होतो, पण कोल्हापुरी चपलेचं नावच कुठे दिसेना. हिरमोड झालाच म्हणा. ‘अरे, आमची कोल्हापुरी जगात भारी आहे, नाव घ्यायला लाजताय का?’ असं प्राडाला खडसावून विचारावंसं वाटलं. कोल्हापुरीचा उल्लेख कुठेच नाही. इंडिया नाही, कोल्हापूर तर नाहीच!
खूप मनाला लागलं. वाईट वाटलं. कारण, ते म्हणतात तसं - चामड्याची प्रत्येक फ्लॅट चप्पल म्हणजे कोल्हापुरी नसते. कित्येक वाकबगार कारागिरांच्या हाताची कसब असते कोल्हापुरी. पिढ्यान्पिढ्यांची परंपरा म्हणजे कोल्हापुरी. कुठेही पाहताच, लगेच ओळखू येते ही कोल्हापुरी. कोल्हापुरी चपलेला जीआय टॅग २०१९ मध्ये मिळाला, तिची ओळख जागतिक झाली. पण प्राडाच्या रॅम्पवर ती अजूनही बेनामी?
भारतामध्ये पहिल्यांदाच अस्सल कोल्हापुरीला ऑनलाइन जगात आणण्याचा पाया रचताना, ‘वहाण’ या संकेतस्थळामुळे जगलो आहे ते कोल्हापुरी वेड. तेव्हा अशा आपल्या मोठ्या कलेच्या वारशाला कोणी ‘बेनामी फ्लॅट’ म्हणून मांडत असेल, तर थोडा (जास्तच) त्रास होतो.
माझ्या मते प्राडा चुकलं का? - अर्थातच! एवढा मोठा फॅशन ब्रँड - त्याची एक नैतिक जबाबदारी नक्कीच होती. ज्या कलेचा आपण वापर करतोय, त्या कलेला क्रेडिट द्यायलाच हवं.
पण मग आपलं काय? आज प्राडाच्या निमित्ताने कोल्हापुरी चपलेबद्दल अचानक जागृत झालेला जिव्हाळा, ही जाणीव एरवी कधी दिसते का? दाखवतो का आपण? प्राडाने कोल्हापुरीची किंमत १.२ लाख की काही केली, ही बातमी सांगताना एक न्यूज अँकर ओरडून ओरडून म्हणत होती, ‘अरे, ही चप्पल तर आमच्याकडे १५० ते ५०० रुपयांत मिळते!’ ते ऐकताना मला वाटलं, यात कसलं कौतुक? आपल्या कारागिरांनी हाताने घडविलेल्या कोल्हापुरीची किंमत आपल्याच लोकांना नाही, याचीच तर कबुली देतोय की आपण!
आपल्या ‘साध्या’ कोल्हापुरी चपलेला प्राडाने सव्वा लाख रुपयांचा प्राईस टॅग लावला म्हणून इतकी चर्चा करणाऱ्यांना हे माहिती आहे का, की अस्सल कोल्हापुरी बनायला किती दिवस लागतात? ती मशीनमेड नाही. ती पिढ्यानपिढ्यांनी अनुभवलेली, शिकलेली आणि जपलेली असते. ती फक्त वहाण नसते, ती इतिहासाची चालती सावली असते. आता आपल्या कारागिरांची कोल्हापुरी विकली जात असेल दीड लाखाला, तर जाऊ दे की! काय मजा येईल!
आपल्या मातीतली कला म्हणून आपण मिरवायला हवीच आहे. हे वेड, ही जबाबदारी आहे आपल्या मातीच्या कलेची गोष्ट जगाला सांगण्याची. जर आपणच ती सांगणार नसू, तर मग प्राडाच्या नावाने बोंब ठोकण्याचा काय अधिकार आपल्याला?
शेवटी फक्त इतकंच : कोल्हापुरी चप्पल हा आपल्या संस्कृतीचा एक मौल्यवान वारसा आहे. आपल्या कारागिरांनी पिढ्यानपिढ्या जपलेला अमूल्य ठेवा आहे. प्राडासारखे ब्रँड जेव्हा उचलेगिरी करतात, तेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं, ‘ही आमची कोल्हापुरी आहे; जी पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या हातून दर्दी लोकांच्या हृदयावर राज्य करतेय. तेव्हा क्रेडिट हे मिळालंच पाहिजे!’
bhushankamble90@gmail.com