शरणागतीला विरोध करा, ‘डोकं’ चालवा, निर्भय व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:05 IST2025-02-22T08:03:51+5:302025-02-22T08:05:15+5:30
दिल्ली येथे सुरू असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. तारा भवाळकर यांनी केलेल्या प्रदीर्घ भाषणाचा संपादित आणि संक्षिप्त सारांश!

शरणागतीला विरोध करा, ‘डोकं’ चालवा, निर्भय व्हा!
डॉ. तारा भवाळकर, लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक
माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल विश्वामध्ये तेव्हापासून तो आपल्या भोवतालच्या वातावरणातून बऱ्याच गोष्टी शिकत आला आहे. चालीरीती, रुढी या तिथल्या निसर्गाने त्याला शिकवल्या आणि त्याच्या गरजांनी, हवामानाने शिकवल्या. त्याच्या भावना, श्रद्धा, आचरण, त्याची घरे, त्याचं बोलणं, त्याच्या देवता, त्याचं अन्न हे सारं तो जिथे होता तिथल्या निसर्गाने घडवून आणलं आणि याला आपण म्हणतो ही संस्कृती. मानववंश जन्माला आल्यापासून आजपर्यंत जी स्थित्यंतरं झाली ती निसर्गाने आणि भोवतालच्या वातावरणाने झाली. नंतरच्या काळामध्ये निरनिराळ्या संस्कृतींच्या लोकांच्या सरमिसळीमुळे, देवाण-घेवाणीमुळे झाली.. हे मानववंशशास्त्र. माणसाच्या वंशाने हे सगळं निर्माण केलं, काही स्वीकारलं. काही गोष्टी नाकारल्याही. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात, काही गोष्टीत सुधारणा करावीशी वाटते. काही गोष्टी एकदम सोडून द्याव्या वाटतात, काही थोडंसं परिवर्तन करून मग त्या वापराव्याशा वाटतात... हा सगळा माणसाचा इतिहास! मानववंश, समाजशास्त्र, त्याच्या पाठीमागचं माणसाचं मन, त्याच्या श्रद्धा, देवदेवता, भावभावना, संवेदनांच्या देवाणघेवाणीतून माणूस घडला. त्याला आपण संस्कृती म्हणतो.
निसर्गाने माणसाला मूलतः जगायला शिकवलं आहे आणि तो प्रवास आजपर्यंत चाललेला आहे म्हणून याला लोकसंस्कृती म्हणायचं आणि या धर्माला मी ‘लोकधर्म’ असे म्हणते. तुम्ही कुठलाही शिक्का मारा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन वगैरे काहीही मारा; परंतु लोकांच्या जगण्यातून जे आपोआप निर्माण झालेलं आहे, तो ‘लोकधर्म’. म्हणून रूढार्थाने इथला धर्म जरी बदलला आणि भौगोलिक परिस्थिती तीच असली तरी चालीरीती, रूढीमध्ये फारसा फरक पडत नाही आणि म्हणून धर्मांतर करूनसुद्धा संस्कृत्यंतर होतंच असं नाही. लोकसंस्कृती ही सबंध भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली आहे.
प्राचीन काळापासून चालत आलेला सर्वसामान्य माणसांच्या आचारातला, विचारातला, भावनांतला, संवेदनातला जो आचार धर्म; त्याला मी ‘लोकधर्म’ असंच म्हणते. त्यामुळे आपला धर्म हा अमुक आहे तमुक आहे अशा एकारलेपणामध्ये कधी मला अडकावंसं वाटलं नाही. फार सुदैवाने आपलं सगळं संत साहित्य, विशेषत: वारकरी मराठी संत साहित्य प्रामुख्याने अतिशय उदारमनस्क साहित्य आहे. ज्याला आपण प्रबोधन प्रबोधन म्हणतो ते लोकपरंपरेतल्या स्त्रियांनी, संतांनी, पुरुषांनी, लोककलावंतांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. लोकसंस्कृतीचा हा व्याप आपल्या सगळ्या आधुनिक संस्कृतीलासुद्धा व्यापून राहिलेला आहे.
१९७५ मध्ये स्त्रीमुक्ती वर्ष नावाची भानगड आली आणि त्यावेळेला लोक सांगायला लागले की हे पाश्चिमात्यांकडून आलेलं आहे. मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. मी म्हटलं, हे पाश्चिमात्यांकडून आलेलं नाही, आमच्या बायका फार जबऱ्या होत्या हो! जी बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्रीमुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली सिमोन दि बोव्हा माहिती नव्हती. ती काय म्हणते? ‘‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी॥ उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी॥’’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे.. त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु त्याचा भंडाफोड या आमच्या संत, कवयित्रींनी तेराव्या-चौदाव्या शतकामध्ये केलेला आहे.
आज माणसांचं जीवन कसं चाललेलं दिसतं? - जुनं ते जाऊद्या सगळं, आता नवीन काय ते पाहा.. असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचाही प्रयत्न करायचा. त्यासाठी लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. लोक स्वतःला पदवीधर म्हणवतात, उच्चशिक्षित म्हणवतात परंतु आपण हे कर्मकांड का करतो आहोत, याचा साधा विचारही करत नाहीत असे दिसते. नुसतं करत राहायचं... ते अमुक करा, तमुक करा, तमुक करा आणि मग त्याला ‘सायंटिफिक रिझन देण्याचा प्रयत्न करायचा.’ ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, व्याज विज्ञान/खोटं विज्ञान’ ते हेच! मग या खोट्या विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवायच्या, आणि मग हे वैज्ञानिक सत्यच कसं आहे, हे ठासून सांगायचा उद्योग चालू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ‘तथाकथित’ शिक्षित समाज याला बळी पडतो आहे, हा उलटा प्रवास चिंताजनक आहे.
आपण ज्याला ‘सायंटिफिक रिझन’ देतो म्हणतो, वैज्ञानिक सत्य म्हणतो, त्याच्या पाठीमागच्या अप्रबुद्धपणाकडे आमचं लक्षच नाहीये. अपवाद आहेतच, पण असे बहुसंख्य आहेत ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे; पण त्यांचे मेंदू काम करीत नाहीयेत. त्यांचे मन आणि मेंदू मोकळे करायला पाहिजेत, चिमटीएवढे मेंदू असलेली माणसं आंधळे आचरण करत आहेत, कर्मकांडामध्ये गुंतून त्याचे समर्थन करीत आहेत, यांना सुशिक्षित का म्हणायचं? हे साक्षर आहेत फक्त!
कारण ज्ञानाने धीर यायला पाहिजे, ज्ञानाने धाडस यायला पाहिजे, ज्ञानाने भीती वाढता कामा नये, उलट भीती गेली पाहिजे! ज्ञानाने भीती जायच्या ऐवजी वाढत असेल तर या लिहिता-वाचता येणाऱ्यांना ज्ञानी म्हणायचं का? ज्ञानामुळे माणूस निर्भय व्हायला पाहिजे आणि या देशातले लोक जर जास्त निर्भय व्हायचे असतील तर त्यांनी या सगळ्या कोंडाळ्यातून बाहेर यायला पाहिजे, आणि लोकसंस्कृतीचा, लोकविज्ञानाचा सर्वांगाने नीट धांडोळा घ्यायला पाहिजे. शहाणी माणसं असतात ती विचार करतात आणि जुन्यातलं टाकाऊ काय आणि टिकाऊ काय याचं विवेकाने ग्रहण करत असतात. स्वतः परीक्षण करतात. स्वतःचं डोकं चालवतात... आणि मूर्ख जे असतात ते दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून असतात.
अमुकतमुक महाराजांनी सांगितलंय, व्हा शरणागत! या शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे, ज्ञानाने माणसाला निर्भय बनवलं पाहिजे.