राहुल गांधी यांचा रस्ता खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 05:46 IST2024-12-05T05:46:00+5:302024-12-05T05:46:25+5:30

हरयाणापाठोपाठ महाराष्ट्रातही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागलेल्या काॅंग्रेसची पुढची वाटचाल अडथळे, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी भरलेली असेल !

Editorial Special Articles Rahul Gandhi's road is tough | राहुल गांधी यांचा रस्ता खडतर

राहुल गांधी यांचा रस्ता खडतर

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

हरयाणापाठोपाठ महाराष्ट्रातही काॅंग्रेसचा मानहानिकारक पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांची परिस्थिती सध्या काळजी करण्यासारखीच आहे. आता नव्या वर्षात फेब्रुवारीच्या प्रारंभी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत असून, तेथे काँग्रेस काही चुणूक दाखवण्याची शक्यता नाही. जून २४ मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केल्यानंतर पक्षाला स्वर्ग ठेंगणा झाला होता. हरयाणात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘आप’शी हातमिळवणी केली. दोन वर्षे तरी ही व्यवस्था चालू राहील अशी अपेक्षा होती; परंतु काॅंग्रेसने अंगचोरपणा केला आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी आघाडी होणार नाही, असे जाहीर करून टाकले.  दिल्लीत केजरीवाल यांना त्यांचा ४० कोटींचा बंगला ‘शीशमहल’ महागात पडला असून, भाजप त्याचा नक्कीच फायदा उठवेल, अशा बातम्या आहेत. राष्ट्रीय जनता दल त्याच्या स्वतःच्या कायदेशीर कटकटीत सापडला असल्याने बिहारमध्ये आपल्याला आधार मिळणार नाही, याची काँग्रेसला कल्पना आहे. पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, तेथेही एनडीएची परिस्थिती चांगली आहे. राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाशी भाजपाने जुळवून घेतले आहे.

या सगळ्यामुळे राहुल गांधी अडचणीत सापडले असून, २०२६ च्या मार्च महिन्यात आसाममध्ये होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेसची भाजपशी समोरासमोर गाठ पडेल. भाजपसमोर पक्षाची वाताहत होईल, अशी भीती आसाममधील मधल्या फळीतल्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. एकतर तेथे पक्षांतर्गत लाथाळ्या खूप आहेत; तसेच राहुल गांधी यांना निवडणूक जिंकून देणारे डावपेच आखता आलेले नाहीत. परिणामी, आसाममध्ये पक्षाच्या हाती अपयशच लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांत काँग्रेसची भाजपशी समोरासमोर गाठ पडत नाही. २०२६ सालच्या एप्रिल, मे महिन्यांत या राज्यातही निवडणुका होऊ घातल्या आहेत.

भाजपचे नवे अध्यक्ष कोण?

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी उरकल्यानंतर आता भाजप मावळते अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्या जागी नवा अध्यक्ष शोधण्याकडे लक्ष देऊ शकेल. नड्डा हे राज्यसभेतले पक्षनेते असून, केंद्रातील आरोग्य खातेही त्यांच्याकडे आहे. पुढच्या दोन महिन्यांत पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल अशी पुरेपूर शक्यता आहे.

संघ परिवारातील अंतस्थ सूत्रांचे म्हणणे असे की, पक्षाच्या नव्या अध्यक्षाने दोन महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक असला पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याच्यावर विश्वास हवा ही दुसरी अट. सरकारशी समन्वय आणि पक्षाचा कारभार नीटनेटका हाकण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने बहुमत गमावल्यानंतर भाजपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे महत्त्वाचे मानले जाईल, असे ही सूत्रे सांगतात. नड्डा यांचा उत्तराधिकारी निवडण्यास त्यामुळेच उशीर होत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपतील काही नेत्यांचा आलेख चांगलाच उंचावलेला दिसला. महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि हरयाणाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान हे ते दोन नेते होत. मोदी यांचे दुसरे निकटचे सहकारी, रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचाही निवडणुकीतील डावपेच आखण्यात सहभाग होता. परंतु, ते पक्षात नवे असल्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. झारखंडमध्ये फटका बसल्यानंतर भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेले शिवराजसिंग चौहान यांचे नाव आता मागे पडले आहे. झारखंड निवडणुकीत हिमंत विश्व सरमा यांच्याबरोबर शिवराजसिंह हे प्रभारी होते. अध्यक्ष पदासाठी दक्षिणेतला एखादा नेता शोधला जाईल, अशीही जोरदार चर्चा आहे.

बिहारमध्ये आणखी एक पुत्र-उदय?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रयत्न संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी सुरू केला आहे. पक्षात सर्वांना मान्य होईल, असा दुसरा नेता नसल्यामुळे या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. पुत्र निशांत कुमार यांना राजकारणात उतरवावे, असे मोठे दडपण नितीश कुमार यांच्यावर आणण्यात येत असल्याची जोरदार चर्चा पाटण्यात आहे. मात्र, राजकारणातील परिवारवादाला विरोध करत आल्यामुळे नितीश कुमार पेचात आहेत.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या निशांत यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले आहे. आपण  अध्यात्माचा मार्ग निवडला असून, राजकारणात आपल्याला अजिबात रुची नसल्याचे काही काळापूर्वी ४९ वर्षीय निशांत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आणखी एका राजकीय नेत्याच्या पुत्राचा राजकीय उदय अद्याप अनिश्चित आहे. मात्र, संयुक्त जनता दलापुढे दुसरा पर्यायही नाही. यापूर्वी नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग किंवा इतर कोणावर भरवसा ठेवला, त्यांनी घातच केला आहे.

केंद्रीय मंत्री लल्लन सिंह आणि पक्षाचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष संजय झा यांच्याकडे नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात नाही. अचानक विपरित परिस्थिती उद्भवल्यास दुसरेच कोणी खुर्ची बळकावून बसेल. असे होऊ नये म्हणून नितीश यांच्या मुलावर भर देण्यात येत आहे. पुढच्या वर्षी होणारी विधानसभा निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची असेल.

Web Title: Editorial Special Articles Rahul Gandhi's road is tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.