आता अभियंत्यांसमोर तंत्रज्ञानाबरोबरच ‘नैतिक’ आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:46 IST2025-09-15T05:45:40+5:302025-09-15T05:46:16+5:30
आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख शिल्पकार सर विश्वेश्वरय्या यांच्या गौरवार्थ आज देशभर ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने..

आता अभियंत्यांसमोर तंत्रज्ञानाबरोबरच ‘नैतिक’ आव्हान!
डॉ. दीपक शिकारपूर
अभियंता व माहिती तंत्रज्ञान अभ्यासक
जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्राचे स्वरूप सतत बदलत आहे. विसाव्या शतकात अभियांत्रिकीने जगात मोठी क्रांती घडवून आणली. सुरुवातीला, हेन्री फोर्डच्या असेम्ब्ली लाईनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यामुळे गाड्या आणि इतर वस्तू स्वस्त झाल्या. यानंतर, नागरी अभियांत्रिकीने मोठे पूल, धरणे आणि गगनचुंबी इमारती बांधल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनाला गती मिळाली.
मानवाला चंद्रावर पाठवणे, हे एक मोठे यश होते. शतकाच्या उत्तरार्धात, ट्रान्झिस्टर आणि मायक्रोप्रोसेसरच्या शोधाने डिजिटल युगाचा पाया रचला. २०००च्या दशकात, भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीच्या आगमनाने या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. भारताने सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. आयटी क्षेत्रात प्रचंड रोजगार संधी निर्माण झाल्या आणि इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या नवीन शाखांचा विकास झाला. पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमध्येही आधुनिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढला. कामाची गती आणि गुणवत्ता सुधारली. या काळात, भारताने अनेक प्रकल्पांमध्ये (उदा. मेट्रो रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ) आपली तांत्रिक क्षमता दर्शविली.
सध्या, अभियांत्रिकी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ड्रोन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या नवीन शाखांचा उदय झाला आहे. यामुळे केवळ पारंपरिक उद्योगांमध्येच नव्हे, तर आरोग्यसेवा, वित्त, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रातदेखील अभियंत्यांची मागणी वाढली आहे. पारंपरिक अभियांत्रिकीच्या कल्पनाही बदलत आहेत. उत्पादन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे स्मार्ट कारखाने स्वायत्त रोबोट्स, डेटा ॲनालिटिक्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसह सुसज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे केवळ उत्पादकता वाढली नाही तर मानवी चुका कमी झाल्या आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली.
याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि क्लाउड कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानांनी उत्पादनांना आणि सेवांना जोडले. दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधले जात आहेत. यामुळे, अभियंत्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर व्यवस्थापन, संवाद आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यदेखील आवश्यक झाले आहे.
भविष्यात, अभियांत्रिकी क्षेत्र अधिक वैयक्तिकृत आणि शाश्वत बनणार आहे. क्वांटम कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा विश्लेषण आणि गणना (Computation) अधिक वेगाने शक्य होईल. बायोइंजिनिअरिंग आणि नॅनो टेक्नॉलॉजी या शाखांचा प्रभावी वापर मानवी आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केला जाईल. २०४० पर्यंत, रोबोटिक्स आणि ॲटोमेशन अनेक उद्योगांमध्ये मानवी श्रमाची जागा घेतील, ज्यामुळे अभियंत्यांचे काम अधिक संशोधनात्मक आणि धोरणात्मक बनेल. ग्रीन एनर्जी आणि सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या संकल्पनांमुळे पर्यावरण अनुकूल उत्पादने आणि प्रक्रिया विकसित करण्यावर भर दिला जाईल. भविष्यातील अभियंत्यांना सायबर सुरक्षा आणि नैतिकता यांसारख्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनावर थेट परिणाम करणार आहे.
भारतीय अभियांत्रिकी क्षेत्राचा प्रवास पारंपरिक ते आधुनिक आणि स्थानिक ते जागतिक असा राहिला आहे. भविष्यात, हे क्षेत्र केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीपुरते मर्यादित राहणार नाही, तर मानवी जीवनातील आव्हानांवर नावीन्यपूर्ण आणि नैतिक उपाय शोधण्याचे केंद्र बनेल. अभियंते हे तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या नवनवीन शोध व निर्मितीमुळे समाजाचे जीवनमान सुधारते. बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या, नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा ऊर्फ ‘हटके’ विचार करणाऱ्या अभियंत्यांना कायम ‘अच्छे दिन’ येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची. आजच्या अभियांत्रिकी दिवसाचा हाच संदेश आहे.