हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ तथा ‘मागा’ टीमचे प्रमुख इलॉन मस्क हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय संदेश देऊ पाहत होते? याविषयी राजनीतिज्ञांच्या वर्तुळात बऱ्यापैकी आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदी आणि मस्क यांची भेट झाली त्यावेळी एस. जयशंकर, अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तेथे उपस्थित होते. वॉशिंग्टन डीसीमधील ब्लेअर हाऊसमध्ये या भेटीच्या वेळी मस्क यांच्याबरोबर त्यांचे सल्लागार, पत्नी, तीन मुले आणि त्यांची आया असा सगळा गोतावळा होता. ते पाहून शिष्टमंडळाला थोडे आश्चर्यच वाटले. अमेरिकेत आता विकसित होत असलेल्या नव्या संस्कृतीचा हा भाग आहे, असे अनेकजण मानत असले तरी पुष्कळांना ते खटकलेही. उभय पक्षात राजनैतिक स्तरावरची उचित अशी पद्धतशीर बैठक व्हावयास हवी होती, असे त्यांना वाटले.
डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यातली शिखर बैठकही ज्याप्रकारे झाली ते पाहून राजनैतिक वर्तुळात टिपणी झालीच. या बैठकीत केवळ पुढे कसे जायचे हेच मांडण्यात आले. त्यात भारताने आयात शुल्क आणखी कमी करावे, तेल आणि गॅसची खरेदी वाढवावी, एफ ३५ विमाने भारत खरेदी करण्याची शक्यता अशा गोष्टी त्यात होत्या. ट्रम्प मोदी यांना ‘आपला महान मित्र’ असे संबोधतात. दोघांनी एकमेकांना आलिंगनही दिले. ‘तुम्ही जेवढे आयात शुल्क घेता तेवढेच आम्हीही लावू’ अशी धमकी अमेरिकेच्या व्यापारी मित्रांना देणाऱ्या आदेशावर या बैठकीपूर्वी काही तास आधी ट्रम्प यांनी सही केली होती. या मित्रात भारतही येतो.
मोदी यांची ही भेट घडवून आणण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बार्द यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एस. जयशंकर यांनीही परिश्रम घेतले, असे सांगण्यात येते. ट्रम्प मोदी यांच्यावर कशावरून तरी नाराज होते, असेही बोलले गेले. बाह्यत: सगळे ठीकठाक दिसले तरी व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमधून मोदी यांच्या स्वागतासाठी ट्रम्प बाहेर आले नाहीत. मोदी यांनी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, त्यावरही त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही, हेही खरेच!
आयआयसीवर भाजपचा डोळा
राजधानी दिल्लीत आणि इतरत्र असलेल्या स्वतंत्र अशा महत्त्वाच्या संस्था आणि क्लब्सवर नियंत्रण मिळविण्याचा उद्योग भाजपने गेल्या काही काळापासून चालविला आहे. एवढी वर्षे या संस्थांवर एक तर काँग्रेसचे किंवा धर्मनिरपेक्षतावाद्यांचे प्रभुत्व होते. परंतु २०१४ साली मोदी यांची सत्ता आल्यानंतर गोष्टी बदलल्या. भाजपने दिल्ली गोल्फ क्लब ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते तेवढे सोपे नव्हते, म्हणून सोडूनही दिला. परंतु दिल्ली जिमखाना क्लब मात्र भाजपच्या छत्राखाली आला. कारण तेथील व्यवस्थापकीय समितीत अंतर्गत कुरबुरी होत्या. हा क्लब पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद करावा किंवा दुसरीकडे न्यावा, असा प्रस्ताव आला होता. परंतु नोकरशहांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आणि मग या प्रश्नातून मार्ग काढण्यात आला. आता सरकारने दिल्ली जिमखाना क्लबवर प्रशासक नेमला असून तो कारभार पाहत आहे. क्लबची समिती बरखास्त करण्यात आली.
इंडिया हॅबिटॅट सेंटरही मुरब्बी निवृत्त राजनैतिक अधिकारी भासवती मुखर्जी यांच्याकडे सोपविण्यात आले. त्या भाजपच्या निकटवर्तीय असून सध्या इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या अध्यक्षा आहेत. आता पाळी इंडिया इंटरनॅशनल सेंटरची आहे. पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव आणि रामजन्मभूमी मंदिर बांधकाम समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी सेंटरच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचे समजते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या अर्जावर अनुमोदन दिले. मिश्रा निवडून आले तर इंडिया इंटरनॅशनल सेंटर भाजपच्या ताब्यात जाईल. तो आजवर गेली कित्येक दशके डाव्यांचा बालेकिल्ला होता. अर्थात मिश्रा यांच्याविरुद्ध कोणी उमेदवार असेल काय? हे अद्याप स्पष्ट नाही. निवडणूक झाल्यास डावे बाजी मारतात की भाजपची सरशी होते, हे पाहणे लक्षवेधी ठरेल.
खासदारांच्या बंगल्यात पोटभाडेकरू
दिल्लीतील निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल हे शूरवीर असल्याचा आव आणत सर्व प्रकारची विधाने करत आहेत. परंतु घराच्या आत ते चेहरा पाडून असतात. त्यांची निराशा लपत नाही. त्यांना राग आवरता येत नाही आणि काय करावे हे सुचत नाही. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शीशमहल सोडला. परंतु नव्या सरकारी घरात न जाता पक्षाचे राज्यसभेतील एक खासदार एन. डी. गुप्ता यांच्या फिरोजशहा रोडवरील घरात ते राहायला गेले. आपल्यासाठी हे घर खाली करून द्या, असे त्यांनी गुप्ता यांना सांगितले होते.
गुप्ता यांनी वेळ न घालवता मालकांचे म्हणणे ऐकले. खासदारांच्या बंगल्यात अशाप्रकारे पोटभाडेकरू ठेवता येतो काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.