‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
By यदू जोशी | Updated: December 12, 2025 06:59 IST2025-12-12T06:57:42+5:302025-12-12T06:59:57+5:30
भाजप-शिंदेसेनेला महापालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येणे सोपे नव्हे!

‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत
‘अमिताभ हा बाॅलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्र फडणवीस हे बिग डी आहेत. डी म्हणजे डिव्होशनचा, डेडिकेशनचा, डिटरमिनेशनचा अन् हा डी डेअरिंगचापण आहे. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी ते खंबीर असतात’... देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार जाहीर कार्यक्रमात आणि फडणवीसांसमोरच नागपूरच्या थंडीत काढले.
दोघांमधील संबंध गारठल्याचे चित्र असताना शिंदेंच्या वाक्यांनी अचानक ऊब दिली. गेले काही दिवस दोघांमध्ये काहीसे अंतर पडलेले दिसत असताना ही साखरपेरणी खूप काही सांगून गेली. देवेंद्र म्हणून डी हे अक्षर शिंदेंकडून आले. शिंदे हे एकनाथ.. त्या अर्थाने ते बिग ई आहेत. आपण ‘डी’च्या पुढे आहोत, असे त्यांना वाटत असावे. दुसरीकडे ‘डी’ला असेही वाटणे साहजिक आहे की मी तर ‘ई’च्या आधी आहे. त्यातून कधी कधी सुप्त संघर्ष होतात. ‘डी’ हा ‘ई’ ला जोडून आहे, असे समजून दोघेही पुढे गेले तर महायुतीची बाराखडी नीट चालेल, नाहीतर ती बिघडेल. शिंदेंनी फडणवीसांची एवढी भरभरून तारीफ का केली असावी याचे उत्तर तीन दिवसांपासून लोक शोधत आहेत. राजकारण नेहमीच ‘बिटविन द लाइन’ वाचावे लागते. गणितात दोन आणि दोन चार होतात, राजकारणात ते पाच किंवा तीनही होऊ शकतात. प्रशंसेचा अर्थ लवकरच कळू लागेल. ‘डी मोठा की ई?’ या प्रश्नाचे उत्तर अक्षरशास्त्राचे अभ्यासक वेगळे देतील; पण राजकारणाचा विचार केला तर ‘डी मोठा की ई?’ हे राजकीय अनिश्चितता ठरवत असते. तसे नसते तर फडणवीसांच्या जागी शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले नसते. राजकारण हे काटेकोर असे शास्त्र नाही.
नगरपरिषद निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेत कटुता आली हे उघड आहे. आता ती दूर करण्याचे चालले आहे. चार दिवसांपूर्वी रामगिरीवर फडणवीस, कटुतेचे मूर्तिकार शिंदे आणि कटुतेचे शिल्पकार रवींद्र चव्हाण, भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. महापालिका एकत्रितपणे लढण्याचे ठरले. ठरविणे सोपे; पण प्रत्यक्ष होणे कठीण, त्याचा प्रत्यय लवकरच येईल. शिंदे-चव्हाण, शिंदे-गणेश नाईक असे प्रत्यक्ष एकत्र येणे अवघडच. धावत्या लोकलमध्ये एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल? तेव्हा भाजप-शिंदेसेना एकमेकांना कितपत सहन करतात यावर प्रत्यक्ष निवडणुकीतील युती अवलंबून असेल.
अजित पवारांचे काय?
भाजप-शिंदेसेना नगरपरिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले. अजित पवार गटाचीही अनेक ठिकाणी वेगळी चूल होती. माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोडेंसारखे काही अपवाद होते. त्यांनी उदगीरमध्ये भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी स्वीकारला. भाजप आणि अजित पवार गटात हा ‘उदगीर पॅटर्न’ महापालिका निवडणुकीत मात्र दिसण्याची शक्यता कमीच आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार सोबत नकोत असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मोठा दबाव आहे. बावनकुळे, रवींद्र चव्हाण गेल्या आठवड्यात असे म्हणाले होते की, महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि मतभेद मिटवतील. प्रत्यक्षात अजित पवार बैठकीला नव्हते, ते नागपूरच्या बाहेर होते असे कारण दिले गेले; पण ते न पटणारे आहे. ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही बैठक घेता आली असती किंवा अजितदादांवर नियंत्रण असलेले प्रफुल्ल पटेल वा सुनील तटकरेंना बोलावता आले असते. मुळात महापालिका निवडणुकीत शक्य तिथे भाजप-शिंदेसेनेत युती करायची आणि अजित पवार यांनी वेगळे लढायचे अशी रणनीती दिसते. ती याच्यासाठी की अजित पवार वेगळे लढले तर भाजप-शिंदेसेना विरोधी मतांचे महाविकास आघाडी आणि अजित पवार गटात विभाजन करता येऊ शकेल. निवडणुकीनंतर त्यांना सोबत घेता येईल.
शिंदेसेना हवी आहे कारण...
नगरपरिषदेत वेगळे लढल्यानंतर भाजपला आता महापालिकेत शिंदेसेनेस सोबत घेण्याचे उमाळे का आले असावेत? हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये हे आदर्श कारण झाले; पण तेवढेच नाही. नगरपरिषदेत शिंदेसेना वेगळी लढल्याने अनेक ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची संधी त्यांना मिळाली. भाजपसोबत युती केली असती तर शिंदेसेनेचा त्या बाबतीत संकोचच झाला असता. महापालिकेतही वेगळे लढल्यास शिंदेसेनेला मोठ्या शहरांमध्येही विस्ताराची संधी मिळेल. शिंदेसेनेला निवडणुकीत सोबत ठेवले नाही तर ते असेच विस्तारत जातील. त्यामुळे शिंदेसेनेला वेगळे ठेवण्यापेक्षा सोबत घेणे भाजपसाठी आजतरी सोयीचे आहे.
जागावाटपाबाबत शिंदे यांचे लाड होतील आणि आपल्यांना दुखवावेही लागेल कदाचित. केंद्र सरकारच्या आकड्यांच्या खेळात शिंदेसेनेकडे आठ खासदार असल्याने शिंदेंना कुरवाळत ठेवणे अपरिहार्य आहे. मुंबईत ठाकरेंना रोखायचे तर शिंदे सोबत लागतीलच. पंजा सगळीकडे पोहोचावा म्हणून काँग्रेस स्वबळाकडे निघाली आहे नगरपरिषदेत स्वबळ वापरलेल्या भाजपला महापालिकेत शिंदे सोबत आणि आपल्या सावलीतही हवे आहेत. भाजपशिवाय आपण जगू शकतो, पण वाढायचे तर भाजप लागेलच ही शिंदेसेनेचीही अपरिहार्यता आहे.