यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
‘शिंदेंना आम्ही काय नाही दिले?- पण ते बघा कसे वागताहेत’, असे भाजपचे काही नेते खासगीत म्हणत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकांना पाठ दाखवणे, समांतर बैठका घेणे, ‘मुख्यमंत्री आरोग्य कक्ष’ असताना ‘उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष’ उभारणे असे शिंदे करत आहेत. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीसांना ‘मातोश्री’चा अन् शिवसेनेचा त्रास होताच, तेव्हा सेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊनच फिरायचे, दिला एकानेही नाही तो भाग वेगळा. आता त्यांची जागा शिंदे घेताना दिसतात. पाच वर्षे कुठे ना कुठे, काही ना काही त्रास फडणवीसांना होतच राहील.
स्वत:ला उपमुख्यमंत्रिपद अन् सोबतच्यांना मंत्रिपदे मिळाल्याने निमूटपणे सहकार्याची भूमिका घ्यायला शिंदे म्हणजे अजित पवार नाहीत. शिंदेंना भाजपशी पंगाच घ्यायचा आहे असा अर्थ लगेच काढणे चुकीचे ठरेल. मुळात त्यांचा सामना जसा ठाकरेंशी आहे तसा तो भाजपशीही आहे. भाजप, ठाकरे आणि शिंदे हे तिघे हिंदुत्ववादी मतांचे वाटेकरी आहेत. आपला वाटा वाढवायचा असेल तर शिंदेंना एकाचवेळी ठाकरेंशी पंगा आणि भाजपसमोर न झुकण्याची भूमिका घेणे अपरिहार्य आहे. खरेतर शिंदेसेना हा भाजपचा ‘नैसर्गिक मित्र’ आणि अजित पवार ही ‘राजकीय तडजोड’ ! पण सध्या ‘तडजोड’ जुळवून घेताना दिसत आहे आणि ‘नैसर्गिक मित्र’ त्रास देत आहे.
शिंदे असेच त्रागा करत राहिले तर ते सत्तेचा आनंद घेऊ शकणार नाहीत. विधानसभा निकालानंतर ते पदाची एक पायरी खाली उतरले. अशावेळी आपले आमदार, मंत्री हे फडणवीसांच्या प्रभावाखाली जाणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. ‘मित्र’ असलेल्या राष्ट्रीय पक्षामुळे आपला संकोच होण्याची भीती प्रादेशिक पक्षांना वाटतेच. शिंदे स्वत: मुख्यमंत्री असताना त्यांच्या दानतीमुळे भाजपचे अनेक आमदार त्यांच्या प्रभावाखाली गेले होते, मुख्यमंत्रिपदाची जादू ही अशी असते. फडणवीसही काही कमी नाहीत. शिंदेसेनेचे बरेच आमदार त्यांचे दिवाने आहेत, त्यांच्याकडे मोठी चुंबक शक्ती आहे. चुंबक लोखंडाला खेचून घेते, फडणवीस हे प्लॅस्टिकही खेचू शकणारे चुंबक आहेत.
फडणवीस पूर्वी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या मुखपत्रात मोदी, शहांवरही सडकून टीका व्हायची, मात्र शिंदे हे या दोन नेत्यांचे मोठे प्रशंसक आहेत हा महत्त्वाचा फरक आहे.
फरशीवर झोपणारा नेता
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन (बंटी) सपकाळ पदभार स्वीकारायला मुंबईत आले होते, गिरगावच्या सर्वोदय आश्रमात थांबले, फरशीवर झोपले. पंचतारांकित संस्कृतीत निश्चिंत झोपलेल्या नेत्यांना हा नेता उठवू शकेेल का? ‘सत्तेचे प्रयोग’ खूप करून झाले, सपकाळ ‘सत्याचे प्रयोग’ करायला निघाले आहेत. माध्यमांपैकी कोणी ते आदिवासी असल्याचे तर कोणी मराठा असल्याचे सांगितले; पण ते कुणबी म्हणजे बहुजन समाजाचे आहेत. ‘काँग्रेसची मूल्ये’ अशी थिअरी चांगली मांडत आहेत, पण थिअरीला वीसच मार्क्स असतात, प्रॅक्टिकलला ऐंशी मार्क्स असतात. अमरवेल ज्या झाडावर चढते त्या झाडाला संपवते. प्रदेश काँग्रेसमध्ये अशा काही अमरवेली आहेत, काही मुंबईत असतात तर काही नागपुरात. त्या आपल्या अंगावर चढणार नाहीत एवढे बघा बंटीभाऊ!
आर्ट ऑफ हेल्पिंग
श्रीश्री रविशंकर यांची ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही संस्था महाराष्ट्र सरकारमार्फत राज्यात अनेक लोकोपयोगी कामे करत असते. २४ जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारसाठी ते काम करताहेत, कौशल्य विकासाची ४० केंद्रे त्यांनी चालविण्यासाठी घेतली आहेत. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना तर असे चांगले काम हवेच असते. आदिवासींमध्ये काम करण्याची आर्ट ऑफ लिव्हिंगची कल्पना आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी लगेच उचलून धरली. प्रसन्न प्रभू आणि रोहन जैन हे श्रीश्रींचे दोन धडपडे शिलेदार परवा मुख्यमंत्री फडणवीस यांना मंत्रालयात भेटले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हे महाराष्ट्रासाठी ‘आर्ट ऑफ हेल्पिंग’ ठरत आहे.
जाता जाता :
धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन वीसेक दिवस झाले; पण ते अजून बंगल्याबाहेर पडलेले नाहीत. अशा ऑपरेशननंतर माणूस दोन-तीन दिवसात कामाला लागतो. मुंडेंची दृष्टी अजूनही खराब आहे की ते नजरा चुकवत आहेत? डोळ्यांचे समजू शकते; पण त्यांनी तोंडही बंद ठेवले आहे, त्याचे काय? ‘धस’मुसळेपणाला एवढे का घाबरता, धनूभाऊ? झाली नं आता साडेचार तास बैठक?
yadu.joshi@lokmat.com