क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:49 IST2025-04-22T06:49:13+5:302025-04-22T06:49:45+5:30

पारंपरिक विचारधारेला कवटाळून बसलेल्यांना पोप फ्रान्सिस यांच्या सुधारणा पचनी पडल्या नाहीत. धर्मांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल

Editorial on the death of Pope Francis, A voice of the most tender and unwavering faith has been silenced forever. | क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला

क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला

विभाजन आणि संवेदनशून्यतेने विदीर्ण झालेल्या जगातील अत्यंत मृदू आणि तेवढ्याच अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला आहे.  अमेरिका खंडातून पोपपदावर पोहोचलेले पहिले आणि रोमन कॅथोलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु, पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी सकाळी व्हॅटिकनमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने नम्रता, करुणा आणि क्षमाशीलतेच्या अथक प्रयत्नांनी ओतप्रोत अशा एका युगाचा अस्त झाला. अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्समध्ये, इटालियन स्थलांतरितांच्या घरात जन्मलेल्या आणि होर्गे मारिओ बेर्गोलिओ, असे नामकरण झालेल्या पोप फ्रान्सिस यांच्यात एक अजब मिश्रण होते.

एकीकडे कॅथोलिक परंपरेची खोली, तर दुसरीकडे स्थलांतरितांच्या कष्टांची आणि आकांक्षांची जाणीव! ब्युनोस आयर्सच्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी गरिबांसोबत जीवन समजून घेतले. तिथेच त्यांना एक गोष्ट उमगली, वेदनांपासून दूर राहणे नव्हे, तर त्यांच्यासह चालत राहणे, हाच खरा मार्ग आहे. पोप होण्याआधी त्यांनी ब्युनोस आयर्सचे आर्चबिशप म्हणून सेवा दिली, तेव्हा त्यांनी पदासोबत येणाऱ्या सुख-सोयी नाकारल्या होत्या. प्रासादाऐवजी छोटेसे अपार्टमेंट, वैयक्तिक गाडीऐवजी बस आणि स्वतःचे जेवण स्वत: रांधणे, अशी जीवनशैली त्यांनी अंगीकारली होती. त्यांच्या संदर्भात एकदा एक स्थानिक पाद्री म्हणाले होते, ‘तो स्वतःच्या उदाहरणाने मार्ग दाखवतो. तो असा मेंढपाळ आहे, जो त्याच्या मेंढरांच्या गंधात न्हालेला असतो!’

आजपासून सुमारे एक तपापूर्वी, १३ मार्च २०१३ रोजी, व्हॅटिकनमधील सेंट पीटर चौकात जेव्हा शुभ्र धुराचा लोट उठला अन् नवीन पोपच्या निवडीची घोषणा झाली, तेव्हा फार थोड्यांना कल्पना होती, की ही निवड चर्चमध्ये सौम्य, पण व्यापक क्रांती आणणारी ठरणार आहे. त्यांनी ‘फ्रान्सिस’ हे नाव घेतले, गोरगरीब आणि निसर्गाचे रक्षक मानले जाणाऱ्या सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या स्मरणार्थ! निवड होताच त्यांनी एक संकेत दिला. त्यांनी बाल्कनीत उभे राहून जनतेकडून आशीर्वाद मागितला. तो राज्याभिषेक नव्हता, तर सहभागितेच्या नव्या पर्वाची नांदी होती. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ एक धर्मगुरू म्हणून नव्हे, तर एका युगाचा नैतिक दिशादर्शक म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कैद्यांचे पाय धुऊन समरसता दाखवली, विकलांगांना मिठी मारली आणि विस्मरणात गेलेल्यांची कपाळे प्रेमाने चुंबली!

जगभरातील रोमन कॅथोलिक चर्चसाठी पोप जी औपचारिक पत्रे जारी करतात त्यांना ‘एनसायक्लिकल’ म्हणतात. `लाऊडाटो सी’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या पोप फ्रान्सिस यांच्या दुसऱ्याच ‘एनसायक्लिकल’मधून अत्यंत परखड धर्मोपदेश करताना, त्यांनी पृथ्वीला ‘आपले समान घर’ संबोधले आणि पर्यावरणाचा नाश हे निर्मितीविरुद्धचे पाप असल्याचे ठाम मत मांडले. त्यांनी पोप केवळ धर्मगुरु असल्याच्या धारणेला छेद दिला. पोप फ्रान्सिस हे ‘ऐकणारे’ पोप होते. त्यांनी श्रद्धा आणि शंकेच्या सीमारेषा ओलांडल्या. मुस्लीम, ज्यू आणि नास्तिकांशीही संवादाचे दरवाजे उघडले. बारा सीरियन मुस्लीम शरणार्थींना व्हॅटिकनमध्ये आणून त्यांनी अत्युच्च मानवी संवेदनांचे दर्शन घडविले होते. देवाला नव्या गोष्टींची भीती नाही, असे ते एकदा म्हणाले होते. ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तींविषयी चर्चची भूमिका सौम्य करताना त्यांनी थेट विचारले होते, ‘मी कोण आहे, न्याय करणारा?’ व्हॅटिकनच्या परंपरेला छेद देणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळे त्यांना वेळोवेळी टीकेचे धनीही व्हावे लागले.

पारंपरिक विचारधारेला कवटाळून बसलेल्यांना पोप फ्रान्सिस यांच्या सुधारणा पचनी पडल्या नाहीत. बाललैंगिक अत्याचार प्रकरणांतील चर्चच्या भूमिकेबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. अर्थात, ते सगळ्याच समाजसुधारकांचे प्राक्तन असते.  पोप फ्रान्सिस परिपूर्णतेचे प्रतीक नव्हते, तर सखोल मानवीपणाचे मूर्त रूप होते. ओठांवरील सहज हास्य आणि स्वतःच्या उणिवा मान्य करणारी सौजन्यशीलता, त्यांना त्यांच्या पूर्वसुरींपासूनच नव्हे, तर धर्मगुरू या समुदायापासूनच वेगळे करते. त्यांचे स्मरण केवळ एक पोप म्हणून होणार नाही. त्यांच्या शांत क्रांतींनी अंतःकरणे हेलावून सोडली, त्यांच्या मौनाने ग्रंथ लिहिले आणि या जगातून निघून जाताना, कायमस्वरूपी बदललेले जग ते मागे सोडून गेले आहेत! धर्मांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

Web Title: Editorial on the death of Pope Francis, A voice of the most tender and unwavering faith has been silenced forever.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Popeपोप