शांत बसा. डोळे मिटा. क्षणभर आवतीभोवतीचे सगळे विसरून विचार करा. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते आठवा. बीड जिल्ह्यातील भयावह हत्याकांड व खंडणीखोरीपासून सुरुवात होईल. संतोष देशमुख, साेमनाथ सूर्यवंशी हे चेहरे नजरेसमाेर तरळतील. त्यांनी भोगलेल्या वेदना आठवून थरकाप उडेल. त्यातून काही मान्यवरांचीही आठवण येईल. संतापाला आवर घाला. संतापाने तसेही काही साध्य होणार नाही. मग, छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानावर आधारित ‘छावा’ चित्रपट देशभर प्रदर्शित होईल.
तीनशे-सव्वातीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास अनेकांच्या अंगात येईल. क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर मंचाच्या मध्यभागी येईल. ती उखडून टाकण्यासाठी त्वेषाने पेटलेले लोक दिसतील. त्यातून गाेरगरिबांची घरे पेटवून दिल्यामुळे आकाशाला भिडलेल्या ज्वाळा दिसतील. कर्फ्यूमुळे निर्मनुष्य बनलेले उपराजधानीतील रस्ते पाहून मनात खिन्नता दाटून येईल. एखाद्या निरपराधाचा बळी जाताना दिसेल. पाच वर्षांपूर्वी मरण पावलेल्या दिशा सॅलियानच्या आठवणी औरंगजेबाच्या तुलनेत खूपच ताज्या. ती येताच औरंगजेब विंगेत जाईल. मंचावर खूप दिवस थांबणे दिशाच्याही नशिबात नसेल.
कुणाल कामरा नावाचा स्टँडअप काॅमेडियन हळूच रंगमंचावर येईल. तो अर्ध्या-एक मिनिटाचे गाणे म्हणेल. त्यावरून तोडफोड होईल. दुबईचा गोल्डन व्हिसा बाळगणारा साधा कार्यकर्ता त्या तोडफोडीचे नेतृत्व करताना दिसेल. यादरम्यान राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर वगैरे लोक रंगमंचावरील प्रयोगाची गती किंचितही कमी होऊ देणार नाहीत. इतके होऊनही अख्खे राज्य दरवेशाचा खेळ बनविणाऱ्यांचे समाधान होणार नाही. दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीशेजारी चबुतऱ्यावर निवांत बसलेला वाघ्या कुत्रा मंचावर झेप घेईल. अशा रंजक चलचित्रात चुकून बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे नावाच्या पुरस्कारविजेत्या तरुण शेतकऱ्याचा चेहरा आला तर स्वत:ला चिमटा काढा. आपण पुरस्कारविजेते असल्यामुळे तरी शेतशिवाराची तहान भागविण्याची मागणी मान्य होईल, असा भाबडा विचार कैलासने केला अन् काहीही करून पाणी मिळेना तेव्हा चारपाणी चिठ्ठी लिहून त्याने विषाची बाटली स्वत:च्या घशात रीती केली, हे वाचल्याचे तुम्हाला आठवेल, आणि ‘त्यामुळे कोणाची कातडी कशी थरथरली नाही?’- असा प्रश्नही तुम्हाला पडणार नाही. कारण असे प्रश्न विचारण्याचे इंद्रिय आपल्याला असते, हे तुम्ही एव्हाना विसरून गेला असाल.
मनोरंजनाचा डोस अधेमधे थोडा ओसरला, की जरा विचार करायचा प्रयत्न करा. मग एखादा प्रश्न पडेल तुम्हालाही. आयुष्यातील सारे रंग असे भोवती पिंगा घालत असतानाही विवेक जागा ठेवायचा असतो, हे तुम्हाला आठवेल आणि तो तसा नाही याची चिंताही वाटेल. स्वत:ला सजग, सुजाण, संवेदनशील, मानवीय अन् झालेच तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे पाईक वगैरे म्हणवून घेणाऱ्या मराठी माणसांची काय ही दुर्गती? पण जरा आजूबाजूला पाहाच... जणू महाराष्ट्रातील जिवंत माणसांचे प्रश्न संपले आहेत. शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत. शेतावर मुबलक पाणी-वीज पोहोचली आहे. बेकारी संपली आहे. आरोग्य-शिक्षणाच्या सुविधा सर्वदूर पोहोचल्या आहेत. चिंता करण्यासारखे काहीच उरले नाही म्हणून इतिहास उकरून काढला जात असावा. त्यावरून डोकी फोडली जात असावीत. रोजचे जगणे जणू सर्कस बनले आहे आणि सर्वसामान्य माणूस (म्हणजे आपणच) प्रेक्षागारात नव्हे तर पिंजऱ्यात आहे, हेही कळेलच तुम्हाला. राज्यकर्ते, समाजसेवी, विचारवंतांनी एकत्र बसून चिंता करावी असे गंभीर विषय संपले म्हणून तर टाळ्या पिटून विसरून जायच्या विनोदावर विदुषकी चाळे सुरू आहेत ना? विनोदी कलाकाराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याची भाषा मान्यवर मंत्रीच करीत आहेत. ‘थांब,कोथळाच बाहेर काढतो’, असे धमकावताना ‘तमिलनाडू कैसे पोचनेका, भाई?’ असे विचारण्याचा बावळटपणा सुरू आहे... पाहताय ना तुम्ही? दिसते आहे ना सारे? कलेचे एक वैशिष्ट्य असते. कलाकार ती सादर करीत असतो तोवर ती मनोरंजन करते. विडंबन, प्रहसन, नकला, विनोद, उपहास वगैरे प्रेक्षकांच्या अंगात संचारला तर शोकांतिका बनते. पायाखाली काय जळतेय याचा विसर पडतो. या अवस्थेत भलेभले लोक भ्रमिष्टासारखे वागायला लागतात. महाराष्ट्र तसा नाही ना? इतरांपेक्षा वेगळा आहे ना?