केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:39 AM2021-12-07T08:39:23+5:302021-12-07T08:39:56+5:30

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते

Editorial on Nagaland firing incident, killing 14 civilians | केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते

केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते

Next

नागालँडमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या १४ निरपराध नागरिक भारतीय सैन्याच्या गोळीबारात हकनाक बळी पडले. या घटनेचे केवळ दुर्दैवी, घोडचूक वा तत्सम शब्दांत वर्णन करून चालणार नाही. जे घडले ते अक्षम्य आहे! या अत्यंत दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार असलेल्या आसाम रायफल्सने अधिकृतरीत्या खेद प्रकट केला आहे आणि चौकशीचा आदेशही दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नागालँडमध्ये जे घडले त्याबद्दल सोमवारी लोकसभेत खेद प्रकट केला आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यास सेनादलांना बजावण्यात आले असल्याची मखलाशी केली. ओळखण्यात झालेल्या चुकीमुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. शहा यांच्या वक्तव्यात नवे असे काहीच नव्हते. त्यांचे वक्तव्य अपेक्षितच होते. अशी घटना घडली, की भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते आणि तरीही अशा घटना घडतच राहतात.

सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास कवडीमोल मानण्याची जी मानसिकता गणवेशधारी संस्थांमध्ये भिनली आहे, तीच अशा घटनांसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. अशा घटनांमुळे त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबांचे तर अपरिमित नुकसान होतेच; पण देशालाही त्याची जबर किंमत चुकवावी लागते. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आधीच अन्यायाची भावना रुजलेली आहे. त्याचा फायदा घेऊन त्या राज्यांमध्ये फुटीरतावादी चळवळींनी त्यांची पाळेमुळे रुजवली आहेत. चीन आणि पाकिस्तान हे आपले शेजारी देश अशा संघटनांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पाकिस्तान काश्मीरचा आणि चीन ईशान्य भारताचा घास घेण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत देशाची खूप मोठी ऊर्जा आणि शक्ती जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरतावादी संघटनांशी लढा देण्यात खर्ची पडत आली आहे. त्यातच अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा फुटीरतावाद्यांच्या हाती आयतेच कोलीत लागते.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते; कारण त्यांच्या प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. गोपनीयतेच्या नावाखाली सुरक्षा दलांच्या संदर्भातील सर्वच माहिती उजेडात येत नाही. गत काही वर्षांत समाजातील एका घटकाने सुरक्षा दलांना देवत्व बहाल करून टाकले आहे. त्यांच्या हातून चूक घडूच शकत नाही, अशी त्यांची भाबडी श्रद्धा आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. शेवटी सुरक्षा दलांमध्ये कार्यरत मनुष्यबळ काही आभाळातून पडलेले नाही. तेदेखील समाजाचाच एक भाग आहेत. त्यामुळे समाजाच्या इतर घटकांमधील गुणदोष कमीअधिक फरकाने त्यांच्यातही असणारच! नागालँडमधील घटना अपरात्री नव्हे, तर दिवसाढवळ्या घडली आहे. घटनेचे जे तपशील समोर आले आहेत, त्यानुसार कोळसा खाणीत कार्यरत कामगार काम संपवून घरी परतत असताना, ते ज्या वाहनातून प्रवास करीत होते, त्या वाहनावर आसाम रायफल्सच्या जवानांनी अंदाधुंद गोळीबार केला. हे अत्यंत अक्षम्य आहे. त्या रस्त्याने अतिरेकी येत असल्याचा सुगावा सुरक्षा दलाला लागला असेलही; पण याचा अर्थ त्यांनी संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येक वाहनावर अंदाधुंद गोळीबार करावा असा होत नाही.

नागालँड पोलिसांनी या प्रकरणी आसाम रायफल्सच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा दले समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलैमध्ये आसाम पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये झडलेल्या सशस्त्र संघर्षाची यानिमित्ताने आपसूकच आठवण झाली. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळींना आळा घालण्यात बऱ्यापैकी यश लाभले आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामेही होत आहेत. दुर्दैवाने अशा घटना घडतात तेव्हा त्या चांगल्या कामांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण होते. सुरक्षा दलांचे नेतृत्व करणाऱ्यांनी ही बाब ध्यानी घेतली पाहिजे आणि खालपर्यंत तसा संदेश झिरपवला पाहिजे. त्याशिवाय अशा घटनांना आळा घालणे शक्य होणार नाही.

Web Title: Editorial on Nagaland firing incident, killing 14 civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.