संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:13 IST2024-12-14T07:12:23+5:302024-12-14T07:13:20+5:30

पौगंडावस्था म्हणजे वादळी वय! कैक मोहाचे क्षण आजूबाजूला. विचलित व्हावे असे प्रसंग दररोज वाट्याला. तरीही हा मुलगा स्वप्नाचा पाठलाग करतो.

Editorial: Gukesh's world victory, a mere eighteen-year-old boy endures so much stress... | संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो...

संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो...

आयुष्याच्या रणांगणावरील युद्ध असो अथवा वातानुकूलित खोलीतील शांत वातावरणातील बुद्धिबळाचा डाव! विजयश्री खेचून आणण्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. अगदी अधिकृत निकालाची घोषणा होईपर्यंत, मी हरू शकतो, अशी पराभूत मानसिकता होऊ न देणे आणि अखेरच्या क्षणीदेखील संधी मिळताच आत्मविश्वासपूर्वक धैर्याने प्रतिस्पर्ध्यावर मात करणे. गुकेशने हेच केले आणि तो जगज्जेता ठरला. अशा पोरवयात त्याने केलेली कामगिरी भविष्यात कुणी लवकर मागे टाकू शकेल, असे वाटत नाही. अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करत खेळतो. एखाद्या योद्ध्यासारखा धीरोदात्तपणे प्रत्येक डाव टाकतो. चेहऱ्यावर फक्त संयम. विजयाची चाहूल लागल्यावर मात्र त्याचा चेहरा खुलतो. मात्र, क्षणभरच. त्यानंतर पुन्हा तोच संयम. समोर बलाढ्य देशाचा तेवढाच बलाढ्य स्पर्धक. कितीतरी डाव पाहिलेला आणि जगाचा अधिक अनुभव असलेला असा जगज्जेता समोर असतानाही गुकेश दडपण घेत नाही अथवा विजय समोर दिसू लागल्यावर तो हुरळून जात नाही. अखेर तो जिंकतो. आठव्या वर्षी  पाहिलेलं स्वप्न पूर्ण करतो.

पौगंडावस्था म्हणजे वादळी वय! कैक मोहाचे क्षण आजूबाजूला. विचलित व्हावे असे प्रसंग दररोज वाट्याला. तरीही हा मुलगा स्वप्नाचा पाठलाग करतो. अवघ्या दहा वर्षांत इथवर पोहोचतो. हा प्रवास चित्तथरारक आहे. बुडापेस्ट येथे झालेल्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत याच गुकेशच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुवर्णपदक मिळवून बलाढ्य चीनच्या वर्चस्वाला जबरदस्त धक्का दिला होता. पण भविष्यात जगज्जेतेपदही गुकेश जिंकेल, असे तेव्हा चीनच्या स्वप्नीही नसेल. खेळाचे मैदानच असे आहे की, खेळनिहाय नियम, कायदे किंवा नैतिक तत्त्व आदी अनिवार्य बाबी वगळल्या तर देश, रंग, वर्ण, जात-धर्मादी भिंती तिथे आडव्या येत नाहीत. केवळ आणि केवळ संयम, सातत्य, एकाग्रता आणि गुणवत्ता हेच इथे महत्त्वाचे. दोम्माराजू अर्थात डी. गुकेश याने आत्मविश्वासपूर्वक खेळीने आपली गुणवत्ता अधोरेखित केली. डी. गुकेशने चीनच्या डिंग लिरेन याच्यावर केलेली रोमांचकारी मात सबंध जगाचे लक्ष वेधणारी ठरली. बुद्धिबळात वेळीच अचूक पाऊल उचलण्याचे धैर्य जोखीम पत्करूनच करावे लागते. गुकेशने ते दाखवून दिले. लिरेनच्या चेहऱ्यावरचा पराभव वाचत गुकेशने केलेली खेळी त्याला चौसष्ट घरांचा राजा बनवणारी ठरली.

‘दहा वर्षांपासून मी या क्षणाचे स्वप्न पाहत आहे. स्पर्धेत आमचे चौदावे डाव ज्या पद्धतीने सुरू होते, ते विचारात घेता मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. पण मला प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दडपण टाकण्याची संधी मिळताच, त्या क्षणाचा मी त्वरेने फायदा घेतला’, ही गुकेशची प्रतिक्रिया बोलकी आहे.  जगज्जेतेपद घोषित होताच उत्स्फूर्तपणे तो हे बोलून गेला.  गुकेश-लिरेन यांच्यातील हा लक्षवेधी सामना केवळ यशापयशापुरता मर्यादित राहत नाही, इतका तो थरारक आणि अविस्मरणीय ठरला. गुकेश हा सर्वांत कमी वयाचा जगज्जेता बुद्धिबळपटू ठरला. नवा इतिहास त्याने रचला. या निमित्ताने विश्वनाथन आनंद यांची आठवण येणे अगदीच स्वाभाविक. अशाच प्रकारच्या थरारक खेळात सन २०१०मध्ये बल्गेरियाच्या व्हॅसलिन टोपालोवविरुद्ध विश्वनाथन आनंद सामना हरलाच होता. त्या सामन्यात बारा डावांच्या लढतीमध्ये शेवटच्या डावातील शेवटच्या क्षणी विश्वनाथन याने काळ्या मोहऱ्यांचा खेळ निवडून व्हॅसलिन टोपालोव याचा आश्चर्यकारक असा पराभव केला होता. या वर्षात गुकेशदेखील पहिल्या डावात पराभूतच झालेला होता, पण चौदा डावांच्या लढतीमध्ये शेवटच्या डावामध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळून त्याने चीनच्या डिंग लिरेन याच्यावर सपशेल मात केली.

लिरेनच्या चालीत डगमग किंवा हयगय दिसताच तत्क्षणी गुकेशने अगदी विश्वनाथ आनंदप्रमाणे काळ्या मोहऱ्यांनिशी चाल करत मोठ्या आत्मविश्वासाने बाजी मारली. गुकेशने जे केले आहे, ते अफाट तर आहेच, पण त्यामुळे भारतीय क्रीडासृष्टीला नवी उमेद मिळाली आहे. असे गुकेश शोधणे आणि संधींचा अवकाश त्यांना उपलब्ध करून देणे आता आवश्यक आहे. क्रिकेटच्या तथाकथित ‘वर्ल्ड कप’च्या धुंदीत आपण ऑलिम्पिकसह सगळ्याच जागतिक स्तरावरील खेळांकडे एवढे दुर्लक्ष करतो की मानहानिकारक कामगिरीला आपल्याला तोंड द्यावे लागते. चिमुकले देश पदकांची लयलूट करत असताना, आपण मात्र मागच्या बाकांवर बसतो. गुकेशने हे मळभ दूर केले आहे. नवी प्रकाशवाट दाखवली आहे. गुकेशचे अभिनंदन करतानाच, या वाटेने जाण्याचा संकल्प करावा लागणार आहे.

Web Title: Editorial: Gukesh's world victory, a mere eighteen-year-old boy endures so much stress...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.