सुधारणा आणि बंदोबस्त होत नाहीत तोवर हिंसेलाच अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:03 AM2019-05-03T04:03:00+5:302019-05-03T04:05:49+5:30

काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी ४० हून अधिक नक्षली मारले. त्याचवेळी ‘शहरी नक्षली’ ठरविलेल्या काही जणांना ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले. आता मारलेले १५ पोलीस लक्षात घेतले तर नक्षल्यांनीही ४० पोलिसांचा बळी घेऊन त्यांचा ‘बदला’ पूर्ण केला आहे.

Editorial on Gadchiroli Naxal Attack | सुधारणा आणि बंदोबस्त होत नाहीत तोवर हिंसेलाच अभय

सुधारणा आणि बंदोबस्त होत नाहीत तोवर हिंसेलाच अभय

Next

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा हिंसाचार अजूनही बेलगामपणे सुरू आहे. गडचिरोलीहून ५० मैल अंतरावर असलेल्या कुरखेडा या तालुक्याच्या गावाहून पुराडा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूसुरुंगाचा स्फोट करून या नक्षलवाद्यांनी १५ पोलिसांची परवा हत्या केली. हा स्फोट एवढा मोठा असतो, की त्यामुळे केवढेही वजनी वाहन आकाशात १५ ते २० फूट उंच उडविले जाते व त्याचा पार चेंदामेंदा होतो. शिवाय त्या स्फोटाने रस्त्यावरही १० फुटांचा खोल खड्डा पडतो. स्फोटात मारले गेलेल्यांचे कपडे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर अडकलेले पाहावे लागतात. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एकाच कारवाईत ४० हून अधिक नक्षली मारले. त्याच वेळी ‘शहरी नक्षली’ ठरविलेले काही जण ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले गेले. आता मारलेले १५ पोलीस लक्षात घेतले तर एवढ्या काळात नक्षल्यांनीही ४० पोलिसांचा बळी घेऊन त्यांचा ‘बदला’ पूर्ण केला आहे.

नक्षली मारले गेले की सरकार व पोलिसांनी फुशारक्या मारायच्या आणि राज्यातील पोलीस बंदोबस्त चोख असल्याच्या बाता मारायच्या आणि नक्षल्यांनी पोलिसांची माणसे मारली की साऱ्यांनी तोंडे लपवीत त्यावरची भाष्ये दडवायची हा प्रकार आता नवा राहिला नाही. त्याला ४० वर्षांचा इतिहास आहे. १९८० मध्ये नक्षल्यांनी हिंसाचाराचा अवलंब गडचिरोलीत केला. पोलिसांचे खबरे ठरवून माणसे मारली. पोलीस चौक्यांवर हल्ले चढविले. मुलांनी शाळेत जाऊ नये म्हणून घरची माणसे मारली. स्त्रियांनी जंगलांच्या कामावर जाऊ नये म्हणून त्यांना हिंसक धाक घातला. वयात आलेल्या व येणाऱ्या मुली पळवून त्यांना सक्तीने आपल्या पथकात सामील केले. तसे करतानाच त्यांना आपल्या भोगदासीही बनविले. परिणामी आदिवासी क्षेत्रातील माणसे आपल्या मुलींना घरात बंद करून व त्यांच्या गळ्यात खोटी मंगळसूत्रे घालून त्यांचे रक्षण करू लागली. हाती बंदूक आली की दुबळ्यांनाही आपण शेर झाल्याचा आव येतो. त्यामुळे गरीब व बेरोजगार मुलेही नक्षल्यांच्या पथकात सामील होऊ लागतात.

सरकार नावाची यंत्रणा याकडे लक्ष देत नाही वा तिला ते द्यावेसे वाटत नाही. शहरी माणसांच्या संरक्षणाबाबत संवेदनशील असणाऱ्या मंत्र्यांना आदिवासी मारले गेले तर त्याचे फारसे दु:खही होताना दिसत नाही. त्यातून नक्षल्यांची पथके रानावनातून हिंडतात तर पोलिसांची पथके त्यांच्या मोटारीतून वा पायी डांबरी सडकांवरून गस्त घालतात. परिणामी मरणाची वेळ पोलिसांवरच अधिक येते. लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री असताना त्यांनी नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी हेलिकॉप्टर दिली. महाराष्ट्रात आर. आर. पाटील यांनी आदिवासी मुलांना व मुलींना पुण्यात व मोठ्या शहरात शाळांत प्रवेश देऊन एका सामाजिक सुधारणेचा चांगला प्रयत्न केला. त्याच काळात चंद्रपुरात आलेल्या हेमंत करकरे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने काही नक्षल्यांनाच फितवून त्यांच्याकरवी या चळवळीचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला. आता हे सारे संपले आहे.

पोलिसांचे अधिकारी नागपूरच्या उंच टेकडीवर बांधलेल्या घरात सुरक्षित राहतात. तेथेच त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था होते. त्यांना जंगलाची माहिती नाही आणि त्यांच्या पथकांनाही ते पुरेसे माहीत नाही. जंगलाची रचना तपशीलवार माहीत नसणे अनेकदा पोलिसांच्या जीवावर बेतते. त्यामुळे ते दाट जंगलात न जाता मुख्य रस्त्यावरूनच गस्त घालतात. उत्तरेला कुरखेड्यापासून दक्षिणेला आसरअलीपर्यंत घनदाट अरण्य पसरले आहे. त्यातल्या कोणत्याही बिळात नक्षलवादी राहू शकतात. एकेकाळी ते आठ ते दहाच्या पथकांनी राहायचे. आता ते दीडशे ते दोनशेच्या जत्थ्यांनी राहतात. सरकारी स्वस्त धान्याचा माल थेट त्यांच्याकडे जातो. पोलिसांना हे सारे ठाऊक आहे. तरीही हा हिंसाचार चालू असतो तेव्हा त्याचा संबंध आदिवासींच्या दुरवस्थेशी जोडून ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न हाती घ्यावे लागतात. पण त्याची गरज कुणाला वाटत नाही आणि आहे त्यावर समाधान मानण्यात सारे प्रसन्न असतात. सुधारणा आणि बंदोबस्त या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जोवर होत नाहीत तोवर हे सारे असेच चालणार आहे व जनतेलाही ते तसेच पाहावे लागणार आहे.

Web Title: Editorial on Gadchiroli Naxal Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.