संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:43 IST2025-05-06T07:42:12+5:302025-05-06T07:43:32+5:30
दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते.

संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
दहावी असो की बारावी, परीक्षेत नापास झालेल्यांना शिक्षणाचा वीट यावा, अशी व्यवस्था अवतीभवती आहे. ज्यामुळे विद्यार्थी प्रवाहातून बाहेर पडतात. तसे घडू नये यासाठी शिक्षक अन् पालकांना सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल. केवळ हुशारी म्हणजे जीवनात यश हे पूर्ण सत्य नाही. शिक्षण अभ्यासक ॲन्जेला ली डकवर्थ यांनी तीन हजार हुशार अन् तीन हजार चिकाटी असणाऱ्या मुलांसोबत एक महत्वाचा प्रयोग केला. जी मुले केवळ हुशार होती त्यापेक्षा ज्यांच्याकडे दृढनिश्चय, ध्येयवेडेपणा आणि चिकाटी होती ती मुले ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी ठरली. अर्थात परीक्षांमधील १०० टक्क्यांचे गुणपत्रक म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग नाही. तितके गुण मिळवूनही दहा वाक्ये आत्मविश्वासाने बोलता येत नसतील, जगण्यासाठीची कौशल्ये आत्मसात केली नसतील तर त्या पैकीच्या पैकी गुणांचा उपयोग तरी काय? २१ व्या शतकात एकमेकांना सहकार्य करून सहयोगाने पुढे जाण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र आपण आजही स्पर्धेत अडकलो आहोत. त्यामुळे परीक्षेतील अधिक गुणांमुळे फाजिल आत्मविश्वास बाळगू नका अन् कुठे कमी पडलात म्हणून खचूही नका, हे शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले पाहिजे. त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा विद्यार्थी नैराश्यात अडकून वेगळ्या वाटेने तरी जातात अथवा टोकाचे निर्णय घेतात. दहावी, बारावीचा निकाल लागला, नीट, जेईईमध्ये यश मिळाले नाही की, मुलांना जणू सगळे काही संपले आहे, असे का वाटावे? ही मानसिक अवस्था निर्माण करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांपेक्षा पालक अधिक जबाबदार आहेत.
दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते. अगदी प्राथमिक वर्गातील चाचणी परीक्षांमधील एकेका गुणासाठी आई-वडील शिक्षकांना भंडावून सोडतात. खाजगी, जिल्हा परिषद अशा सर्वच शाळांमध्ये हल्ली हे असे चित्र दिसते. ही पालकांची जागरूकता आहे की, स्बत:च तयार केलेली स्पर्धा जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न? ‘परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे’ हे आधी पालकांच्या ध्यानी आले तर मुलांवरचा ताण कमी होईल. त्याला जे आवडेल ते तो करू शकेल. दहावी, बारावी बोर्डाचे महत्त्व कमी झाले असे कितीही म्हटले तरी ज्या घरातील मुले दहावी- बारावीत जातात तिथे अनेक बंधनांची सनद तयार केली जाते. या पलीकडे जात विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेणारे शिक्षक, पालक त्यांच्या पुढच्या पिढीला मोकळा श्वास देत आहेत. अर्थात, त्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. नवे शैक्षणिक धोरण त्यात बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. यापुढच्या काळात परीक्षा होणारच आहेत. त्यात लेखी परीक्षा हा एक भाग असेल. परंतु, विद्यार्थी वर्गात कसा वागतो, वर्गमित्रांचे सहकार्य कसे घेतो, त्यांना सहकार्य किती करतो, त्याचा स्वाध्याय किती दर्जेदार आहे आणि तो स्वयंप्रेरणेने किती शिकतो, यावर मूल्यमापन करणारी शालेय व्यवस्था आपल्याकडे निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निरीक्षण शिक्षक, वर्गातील सहकारी विद्यार्थी आणि स्वत: विद्यार्थी करतील. हे बदल पुढच्या काही वर्षात दिसतील.
सिंगापूर, जपान, चीन हे देश शालेय शिक्षणामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये कसे आले, याचा विचार केला जात आहे. सिंगापूरच्या आश्चर्यकारक प्रगतीमागची प्रेरक शक्ती ही शिक्षणपद्धतीच आहे. जपानमध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही तिथे वर्गात तंत्रज्ञानाचा वापर कमी होतो. २०१८ च्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात जपान शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. शालेय शिक्षणातून प्रत्यक्ष होणारे संस्कार हे जपानी लोकांच्या वर्तनातून दिसतात. त्यामुळे शाळेत तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा, यावरही आपल्या देशात चिंतन, मंथन करण्याची गरज आहे. परीक्षा आणि गुण इतकेच मूल्यमापन न करता शालेय शिक्षणात बदल घडविण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याला शिक्षकांनी, किंबहुना पालकांनी साथ दिली तरच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे.